पाण्याचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी प्रयत्न आवश्यक

जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक वातावरण व पाणी’ घोषित केले आहे. या वर्षातील २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन, तर २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून ६९ वर्षांपासून साजरा केला जातो. यावर्षी ‘वातावरण आणि पाणी’ अशी संकल्पना घेतली असून, या निमित्ताने जनजागृतीचे विविध कार्यक्रम केले जात आहेत.
fig. 1 Natural disasters and drought area in India, fig. 2 Natural water cycle
fig. 1 Natural disasters and drought area in India, fig. 2 Natural water cycle

जागतिक हवामान संघटनेने २०२० हे वर्ष ‘जागतिक वातावरण व पाणी’ घोषित केले आहे. या वर्षातील २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन, तर २३ मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून ६९ वर्षांपासून साजरा केला जातो. यावर्षी ‘वातावरण आणि पाणी’ अशी संकल्पना घेतली असून, या निमित्ताने जनजागृतीचे विविध कार्यक्रम केले जात आहेत. पाण्याचे महत्त्व आपल्याला त्याच्या कमतरतेच्या वेळी म्हणजेच दुष्काळामध्ये जाणवते. दुष्काळ हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या पाचवीला पुजलेला आहे. तो पुन्हा–पुन्हा (जवळपास दर तीन वर्षांनी) येतो. दुष्काळामुळे भारताचा जवळपास ७० टक्के भाग बाधित होतो. (आकृती-१). दुष्काळाची व्याख्या अनेक प्रकारे करता येते. परंतु सर्व समावेश, साधी सोपी व्याख्या आपण पाहू. दुष्काळ म्हणजे मानव, प्राणी, पीक, झाडे-झुडपे यांच्या चयापचय क्रियेस पुरेल एवढे (दैनंदिन वाढ व विकास होण्याइतपत) पाणी सतत काही दिवस (आठवडा, महिना इत्यादी) उपलब्ध न झाल्यास, अशा परिस्थितीस आपण दुष्काळ म्हणतो. थोडक्यात सर्व सजीवांच्या दैनंदिन क्रियेस पाण्याचा तुटवडा जाणवला तर त्याला दुष्काळ मानले जाते. विसाव्या शतकात जगभरात पाण्याच्या कमतरतेमुळे ७० दक्षलक्ष लोक मरण पावल्याची नोंद स्टिफन डेरिक्स यांनी आपल्या ‘फिमाईन इन द टेवेन्टीएथ सेंचुरी’ या संशोधनामध्ये केली आहे. पृथ्वीवरील जवळपास २० टक्के लोकांना आणि १५ टक्के पशुधनाला (भारतीय लोकांना व पशुधनास) एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त २ टक्के क्षेत्र आणि १.५ टक्के वनकुरण व जंगल वाट्याला आले आहे. भारतात शेतीखाली असणाऱ्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्र हे दुष्काळ प्रवण आहे. ही बाबच भारताच्या दृष्टीने पाण्याचे मोल अधोरेखित करणारी आहे. भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी शेतीखाली असणाऱ्या क्षेत्रापैकी ६७ टक्के क्षेत्र पावसावर आधारीत (कोरडवाहू) शेतीचे आहे. शेतीमधील एकूण अन्नधान्य उत्पादनातील याचा वाटा ४४ टक्के आहे. भारताची ४० टक्के लोकसंख्या व ६५ टक्के पशुधन यावर अवलंबून आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा हाही पाण्याच्या उपलब्धीवर ठरतो. तो कमी असल्यामुळे १९६१ मध्ये ५७ टक्के, तर १९८७-८८ मध्ये ३५ टक्के आणि २००२ मध्ये आणखी घसरून २२ टक्के वर आला होता. सद्यःस्थितीत तो आणखी कमी झाला आहे. सन १९५१ मध्ये शेतीचा एकूण भारतीय सकल उत्पादनातील वाटा ५६ टक्के होता. तो २७ टक्के कमी होऊन सन २००१-०२ मध्‍ये २५ टक्क्यांवर आला. तर सन २००१ च्या जनगणनेनुसार एकूण कामगाराच्या जवळपास ६० टक्के कामगार हे शेतीत राबणारे होते, असा अहवाल ‘सुसाइड ऑफ फार्मर्स इन महाराष्ट्र’ हा श्रीजीत मिश्रा यांनी सन २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाला सादर केला आहे. निसर्गतः: उपलब्ध असणारे पाणी (आकृती २) जपण्यासाठी स्वतः जागृत राहण्याची व एकूणच समाजाची जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे. निसर्गामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणात बदलाची प्रक्रिया वेगाने घडत आहे. प्रामुख्याने तापमान, कार्बन डायऑक्साइडचे वाढते प्रमाण, मुसळधार पावसांच्या घटना व वादळांच्या संख्येत वाढ, बर्फ वितळण्याचे वाढते प्रमाण या टोकाच्या बाबी दिसत आहेत. त्याबरोबरच पर्जन्य दिवसात घट आणि बाष्पोत्सर्जनातील वाढ ही जागतिक आणि भारतीय स्तरावर दिसून येत आहे. हे बदल मानवासाठी हानिकारक असल्याचे आता सर्वमान्यच झाले आहे. गतवर्षी एकाचवेळी काही भागांत पूर तर दुसरीकडे दुष्काळ, हे चित्र भारतात पाहायला मिळाले. कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तापी नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती तर गोदावरीच्या खोऱ्यात, विदर्भात दुष्काळ ही महाराष्ट्राची स्थिती झाली होती. हे हवामान बदलाचे अपत्य मानायला हरकत नाही. जागतिक तापमानातील वाढ

  • जागतिक तापमानात गेल्या शंभर वर्षांत ०.७४ अंश सेल्सिअसने वाढ झाली, तर भारतीय तापमानात सुमारे अर्धा अंश (०.४८ अंश) सेल्सिअसने वाढ झाली. हवामान बदलावर उपाय योजना न केल्यास २०५० पर्यंत १.५ ते ३.० अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. उपाय योजले तर ही वाढ अर्धा ते एक अंश सेल्सिअसने कमी राहणार असली तरी परंतु १ ते २ अंश सेल्सिअसने वाढेल. वाढत्या तापमानामुळे भारताचा जीडीपी २.८ टक्क्याने कमी होईल. राहणीमानात अर्धा टक्क्याने घट होईल असा दावा जागतिक बँक समूहाच्या जून २०१८ मध्ये केला आहे. म्हणजेच जागतिक आणि भारतीय स्तरावर आधीच शुद्ध आणि ताज्या पाण्याची कमतरता आहे. ती अधिक तीव्र होत जाईल. यामुळे निसर्गतः: उपलब्ध शुद्ध पाणी आणि ताजे पाणी याचा आढावा घेणे गरजेचे आहे.  
  • पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या शुद्ध पाण्यापैकी ७५ टक्के पाणी हे ध्रुवीय बर्फाच्छादनामध्ये बंदिस्त आहे, तर २ टक्के हे भूपृष्ठावर (तलाव, नदी, ओढे आदी) मध्ये उपलब्ध होते. अत्यल्प प्रमाणात कोरड्या जमिनीत (मृदबाष्पस्वरूपात) धरून ठेवले जाते. जवळपास २२ टक्के पाणी हे भूपृष्ठाखालील जमिनीत आणि सच्छिद्र खडकांमध्ये साठलेले असते. यास भूपृष्ठाखालील पाणीसाठा असे संबोधतो. या पाण्याचा वापर प्रामुख्याने पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, पशुधनाकरिता, शेतीसाठी अथवा उद्योगांसाठी केला जातो. जागतिकस्तरावर एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र हे भूपृष्ठाखालील पाण्याने सिंचित केले जाते. बदलते शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे शुद्ध पाण्याचा सन २०२५ मध्‍ये सुमारे ७८ टक्क्यांपर्यंत तुटवडा जाणवेल, तर सन २०५० मध्ये शेतीकरिता उपलब्ध पाण्यामध्ये सुमारे ७० टक्के घट होऊ शकते.
  • पाण्याची उपलब्धी कमी झाल्यामुळे मानवी जीवनास प्रामुख्याने खालील संकटाचा सामना करावा लागतो.

  • भूगर्भातील पाणी पातळी खालावते.
  • जल विद्युतनिर्मिती ऊर्जा उपलब्धता कमी होते.
  • शेती उत्पादनात घट होऊन सकल राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्नात घट येते. राष्ट्राचा विकास दर (जीडीपी) घटतो.
  • विपणन आणि दळणवळण व्यवसाय, उद्योगधंद्यात मंदी येते. पर्यायाने आर्थिक मंदीचे सावट घोंगावते.
  • सामाजिक आणि राजकीय विसंवादाची शक्यता वाढते.
  • दुष्काळाचे विश्लेषण, विवरण आणि अनुमानानंतर समायोजन किंवा उपाययोजना

  • दुष्काळाचे समायोजनासाठी पाण्याचा योग्य वापर करणे.
  • छतावरील पावसाचे पाणी उत्पादन घेणे, साठवण करणे आणि त्यांच्या वापराचे नियोजन करणे.
  • गाव शिवारात पडलेल्या पावसाचे पाणी शिवारातच जिरविण्याचे सुव्यवस्थापन (माथा ते पायथा) करणे.
  • यातून राहिलेल्या पाण्याची नैसर्गिक साठवण क्षेत्रात (नदी, ओढे, तळे आदी) साठवण करणे. जिथे जिथे शक्य आहे, तिथे त्याचे एकत्रीकरण (नदी जोड प्रकल्प) करून वापराचे सुव्यवस्थापन करणे.
  • भूजल पाणीसाठ्याचे सुक्ष्मतम पद्धतीने पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेती अथवा उद्योगासाठी वापराचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे.
  • दैनंदिन वापर काटकसरीने करण्याचे सर्व तंत्रज्ञान वापरून घरगुती पाणी वापरात, उद्योगधंदे वापरात, बचत करणे.
  • उद्योगधंद्यात पाण्याचा पुनर्वापर, घरगुती वापराचे पाणी शुद्ध करून त्याचा वापर करणे.
  • पाणी उपलब्ध करण्याच्या विविधस्त्रोताबरोबरच पाणी बचतीसाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा समावेश दैनंदिन जीवनात करणे.
  • पिकातील पाणी बचत

  • वास्तविक वनस्पतीच्या वाढीसाठी प्रत्यक्षात अतिशय कमी पाणी लागते. जमिनीतून एकूण शोषलेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी हे वातावरणात वनस्पती सोडते, त्याला बाष्पोत्सर्जन म्हणतात.
  • जलसिंचनाचे पाणी बचत करणाऱ्या पद्धतींचा वापर करण्यासाठी आवश्यक त्या बाष्पोत्सर्जन कमी करणाऱ्या तंत्रांचा वापर केला पाहिजे. या दोन्ही तंत्रामुळे ५० टक्क्यांपर्यंत पाणी बचत करणे शक्य होते. यातून किमान दुप्पट क्षेत्र ओलिताखाली येऊन भूपृष्ठावरील पर्णसंभार वाढेल. याचा फायदा तापमान वाढ रोखण्यासाठी होऊ शकेल.
  • संपर्क- डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (साहाय्यक प्राध्यापक (कृषिहवामानशास्त्र), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com