पीककर्ज वाटपाचे ‘लक्ष्यांक’ सुधारा 

राज्यातील शेतकऱ्यांना ७९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पीककर्ज वाटता येऊ शकते. मात्र, क्षमता असूनही बॅंका हेतुतः कमी लक्ष्यांक (टार्गेट) ठेवतात. बॅंकांचे हेच छुपे धोरण शेतकऱ्यांच्या विकासात अडथळा आणणारे ठरते आहे.
crop loan
crop loan

पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना ७९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पीककर्ज वाटता येऊ शकते. मात्र, क्षमता असूनही बॅंका हेतुतः कमी लक्ष्यांक (टार्गेट) ठेवतात. बॅंकांचे हेच छुपे धोरण शेतकऱ्यांच्या विकासात अडथळा आणणारे ठरते आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

क्षमतेनुसार चालू आर्थिक वर्षात राज्यातील शेतकऱ्यांना ७९ हजार १९० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटता येऊ शकते. मात्र बॅंकांनी तयार केलेले नियोजन आराखडे बघता कर्जवाटपाचे एकूण लक्ष्यांक ६० हजार ८६० कोटी रुपयांपर्यंत जाते. म्हणजेच क्षमता असूनही बॅंकांनी कर्जवाटपाचा लक्ष्यांक १८ हजार ३३० कोटी रुपये कमी ठेवला आहे. 

राज्यात गेल्या हंगामात ५८ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना बॅंकांनी ४९ हजार ९७२ कोटी रुपयांचे कर्ज वाटले होते. यंदा पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या लक्ष्यांकाचे आकडे फक्त ५५ हजार ५६० कोटींपर्यंत जात होते. विशेष म्हणजे हा लक्ष्यांक गेल्या वर्षीपेक्षा ११ टक्क्यांनी कमी आहे. 

‘‘शेतकऱ्यांना कर्ज वाटण्यास राष्ट्रीयीकृत बॅंका एरवी उदासीन असतात. त्यात पुन्हा मूळ लक्ष्यांकच कमी ठेवल्याने बॅंकांचे फावते आहे. कमी लक्ष्यांकाचा मुद्दा सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक सुधारणा करण्याची सूचना केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रत्येक जिल्ह्यातील बॅंकांची एक समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवत असते. जिल्हा पातळीवरून उद्दिष्टे कमी दाखवून बॅंका पद्धतशीरपणे आपली जबाबदारी झटकत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कमी पीककर्ज मिळते. त्याचा फटका गरजू शेतकऱ्यांनाच जास्त बसतो, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

‘‘पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक ७९ हजार कोटींच्या पुढे नेण्यास वाव असल्याचा खुद्द नाबार्डचा अभ्यास आहे. मात्र कर्जवाटपाचे लक्ष्यांक ३० टक्क्यांनी कमी आहे. यात सुधारणा करण्याची आवश्यकता असून लक्ष्यांक वाढविण्यास पुरेसा वाव आहे,’’ असे सहकार आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. विशेषतः पुणे, सातारा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत क्षमतेपेक्षाही कमी लक्ष्यांक ठेवले जात आहे, असे निदर्शनास आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पीककर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्जपुरवठ्यात सामील करून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी बॅंकनिहाय लक्ष्यांक निश्‍चित करण्याची आवश्यकता आहे, असेही सहकार आयुक्तालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.  लक्ष्यांकप्रमाणे कर्जवाटप अशक्य  बॅंकिंग क्षेत्रातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्यांक कितीही दिले तरी प्रत्यक्ष गरज आणि स्थिती पाहूनच बॅंकांना कर्जपुरवठा करावा लागतो. मुळात कर्जमाफीची घोषणा कधीही करण्याची सवय लावली गेल्याने त्याचा परिणाम कर्ज वसुलीवर होतो. कर्जमाफीचा प्रकार राज्यातील बॅंकिंग व्यवस्थेला पोषक नाही. यामुळे थकीत कर्ज वाढतात व शेतकरी नवी कर्ज घेण्यास अपात्र ठरतात. त्यामुळे लक्ष्यांकाप्रमाणे कर्जवाटप करणे शक्य नाही.  नेमके काय घडतंय 

  • क्षमता ७९ हजार १९० कोटी असताना लक्ष्यांक मात्र ६० हजार ८६० कोटी रुपये ठेवले. 
  • क्षमता आणि प्रस्तावित लक्ष्यांकात २३ टक्क्यांची तफावत आहे. 
  • गेल्या वर्षीदेखील क्षमता ७४ हजार ५७५ कोटी असताना लक्ष्यांक ६२ हजार ४५९ कोटी रुपयांचे ठेवले गेले. 
  • गेल्या वर्षी पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक १६ टक्के कमी ठेवले गेले. प्रत्यक्ष वाटप फक्त ४७ हजार ९७२ कोटी रुपयांचे कर्ज वाटले गेले. एकूण
  • क्षमतेपेक्षा ३५ टक्क्यांनी कमी कर्ज शेतकऱ्यांना दिले गेले. 
  • प्रतिक्रिया  पीककर्ज वाटपाची क्षमता ही दिशादायक असते. मात्र प्रत्यक्षात वाटपाची प्रक्रिया वेगवेगळ्या स्थितीवर अवलंबून असते. जिल्हा पातळीवरील स्थिती व अभ्यासातून पीककर्ज वाटपाची ढोबळ क्षमता नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक काढतात. त्यातून राज्याची क्षमता तयार होते. दुसऱ्या बाजूला बॅंकांकडून येणाऱ्या जिल्हास्तरीय समितीमधील नियोजनातून जिल्ह्यांचे आराखडे तयार होतात. हेच आराखडे राज्यस्तरीय पातळीवर मांडले जातात. त्यात पुन्हा सुधारणा होते व शेवटी एक अंतिम आराखडा तयार होतो. त्यातील उद्दिष्ट मात्र बॅंकांवर बंधनकारक असतात. बॅंका त्यानुसार बहुतेक वेळा ही उद्दिष्टे साध्यही करतात. अर्थात, क्षमता व वाटप यात मोठी दरी असू नये. असल्यास त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात.  - उमेशचंद्र सरंगी, माजी अध्यक्ष, नाबार्ड 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com