खानदेशात केळीच्या दरात सुधारणा

खानदेशात केळीच्या दरात सुधारणा
खानदेशात केळीच्या दरात सुधारणा

जळगाव ः खानदेशात केळीचे दर जवळपास अडीच महिन्यानंतर १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. उत्तरेकडून जशी मागणी वाढली, तशी मागील आठवड्यातच दरात सुधारणा झाली. पुढे दर टिकून राहतील तसेच केळीची आखातातील निर्यातही फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होईल, असे संकेत मिळत आहे. 

रावेर बाजार समितीने जाहीर केल्यानुसार, जिल्ह्यात नवती केळीचे दर सोमवारसाठी (ता. २८) १००० रुपयांपर्यंत होते. तर कांदेबाग केळीसाठी ९९५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाहीर झाले. अर्ली नवती केळीची काढणी यावल, रावेरमध्ये सुरू आहे. या केळीला या दरांचा लाभ होईल, अशी स्थिती आहे. यावल, रावेर व मुक्ताईनगरात केळीचा पुरवठा हवा तसा नसल्याने दरात वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

मागील आठवड्यात नवती केळीचे दर ९९० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. त्यात पाच रुपयांनी वाढ होऊन ते एक १००० रुपयांपर्यंत पोचल्याने केळी उत्पादकांना हायसे वाटले आहे. कारण थंडीचा विपरित परिणाम झाल्याने केळीचे नुकसान झाले. त्याचवेळी दरात सतत चढउतार सुरू होते. बॉक्‍समध्ये पॅकिंगची केळी फारशी उपलब्ध होत नव्हती. यावल व रावेरातही दर्जेदार केळी उपलब्ध होत नसल्याने उत्तरेकडील मोठ्या खरेदीदारांनी मागणी कमी केली होती. परंतु ही मागणी वाढू लागली आहे. बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग करून फैजपूर, सावदा येथून केळीची पाठवणूक बऱ्यापैकी सुरू आहे. 

चोपडा, जळगाव भागांत कांदेबाग केळीची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. शहादा व तळोदा (जि. नंदुरबार) या भागांत मार्चमध्ये अधिक केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. सध्या यावलमधील सातपुडा पर्वतालगतचा भाग आणि मध्य रावेरमधील वाघोदा, तांदलवाडी व तापी काठावरच्या काही गावांमध्ये नवती केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. केळीचा पुरवठा यावल, रावेर व मुक्ताईनगर भागांत प्रतिदिन १८० ते १८५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढा आहे. 

जळगाव, पाचोरा व चोपडा भागांतील केळीचा पुरवठा प्रतिदिन १०० ते ११५ ट्रकपर्यंत आहे. तर बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारातही लिलावासाठी मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी २१० ट्रक केळीचा पुरवठा झाला. बऱ्हाणपुरात केळीला लिलावात प्रतिक्विंटल कमाल ११०० रुपये दर मिळाल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com