बटाटा लागवडीचे सुधारित तंत्र

बटाटा हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बेणे निवड, प्रक्रिया या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास फायद्यात वाढ होऊ शकते.
Improved technique of potato cultivation
Improved technique of potato cultivation

बटाटा हे रब्बीतील महत्त्वाचे पीक आहे. बटाटा पिकामध्ये आधुनिक लागवड पद्धती, बेणे निवड, प्रक्रिया या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिल्यास फायद्यात वाढ होऊ शकते. भारतात २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार बटाट्याचे एकूण उत्पादन ५०१.९० लाख टन एवढे होते. भारतात बटाटा क्षेत्राचे प्रमाण रब्बी हंगामात अधिक आढळते. बटाट्याच्या एकूण उत्पादनापैकी खरीप हंगामात १०.१६ लाख टन, तर रब्बी हंगामात ४९१.७४ लाख टन बटाटा उत्पादन होते. जाती

  • कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज या महाराष्ट्रासाठी बटाट्याच्या प्रमुख जाती आहेत. 
  • कुफरी सूर्या या जातींची महाराष्ट्राच्या मैदान प्रदेशासाठी, जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेली आहे. तसेच, कुफरी भीमा, कुफरी सूर्या या जातींची शिफारस उष्णता रोधक हेतूने केली 
  • जाते. 
  • चीप्ससाठी:  कुफरी चिप्सोना १, कुफरी चिप्सोना ३.
  • फ्रेंच फ्राइज तयार करण्यासाठी:  कुफरी चिप्सोना १, कुफरी सूर्या, कुफरी फ्रायसोना व काही खासगी कंपन्यांच्या जातीही उपलब्ध आहेत.
  • जमीन  

  • बटाटा पिकासाठी मध्यम काळी, पोयटा, पोयटायुक्त-वाळूकामय जमीन सर्वांत योग्य मानली जाते. 
  • योग्य निचरा क्षमता असलेली माती आवश्यक असून, निचरा क्षमता नसलेली, सतत ओलसर राहणारी किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन बटाटा पिकासाठी योग्य मानली जात नाही. 
  • जमिनीची तयारी  बटाटा लागवडीस जमीन तयार करताना खोल नांगरणी आणि २ वखरण्या कराव्यात. यामुळे मातीतून पसरणाऱ्या रोगांचे आणि बहुवार्षिक तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते. धैंचासारखेच हिरवळीचे पीक घेऊन ते गाडल्यास रासायनिक खतांमध्ये २० ते ३० टक्के बचतीबरोबरच उत्पादनामध्ये हेक्टरी ३ टनापर्यंत वाढ होत असल्याचे संशोधनात आढळले आहे.  लागवडीची योग्य वेळ  बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि ट्युबरलायझेनच्या वेळी (बटाटा विकास  काळ) विशेष तापमानाची गरज असते. बटाटा लागवड करताना रात्रीचे तापमान १८-२२ अंश सेल्सिअस असणे गरजेचे असते. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिला आठवडा या काळात लागवड करणे हिताचे ठरते. वाढीसाठी २० ते २४ अंश सेल्सिअस आणि टयुबरलायझनसाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान उपलब्ध असेल. बियाणे निवड प्रक्रिया 

  • बटाट्यामध्ये साधारणतः ६-९ आठवडे सुप्तावस्था आढळून येते. जातीपरत्वे सुप्तावस्थेचा काळ वेगवेगळा असू शकतो. बीज कंदांची निवड करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बटाटा कंदाची साठवण कोल्ड स्टोरेज (शीतगृह) मध्ये केली जाते.
  • लागवडीआधी किमान १० दिवस बेणे कंद शीतगृहातून बाहेर काढावेत.  शीतगृहातून बाहेर काढलेले बेणे लगेचच लागवडीसाठी वापरल्यास कंदावरील ओलाव्यामुळे संघनन प्रक्रिया होऊन कंद सडू शकतात. बाहेर काढलेले बेणे कंद २४ तासांसाठी प्री-कूलिंग चेंबरमध्ये ठेऊ शकतो. बेणे प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी.बेणे कंदाचे अंकुरण होण्यासाठी सावलीमध्ये पसरून ठेवावेत.
  • कंदावरील डोळे ज्वारीच्या दाण्याच्या आकाराचे असावेत. दरम्यानच्या काळात खराब, अंकुरण न झालेले बेणे निवडून काढावेत. साधारणतः  ४० ते ५० ग्रॅम वजनाचा बटाटा बेणे लागवडीसाठी वापरणे हिताचे असते. मात्र, ४० ते ५० ग्रॅम वजनाचा बटाटा बेणे नसल्यास, आकाराने व वजनाने मोठे असल्यास त्याचे दोन अथवा चार समान भागामध्ये कापावेत.
  • कापणीनंतर बुरशीजन्य रोगापासून संरक्षणासाठी लागवडीपूर्वी बेणे मॅन्कोझेबबरोबर सुकी प्रक्रिया करून घ्यावी. कंद योग्य प्रकारे सावलीत सुकल्यानंतर (२४ तास) लागवडीसाठी वापरावेत.    
  • बेण्यासाठी वापरावयाच्या बटाट्यावर काढणीनंतर प्रक्रिया  

  • बटाटा बियाणासाठी वापरायचा असल्यास, बटाट्याची काढणी झाल्यानंतर ताजा अख्खा बटाटा ढीग लावून १० दिवसांपर्यंत ठेवतात. ढिगाचा आकार साधारणतः १.५ मीटर उंच आणि ३-५ मीटर पसरता ठेऊ शकतो. 
  • ढीग भाताच्या तुसाने किंवा गव्हाच्या भुश्शाने झाकून ठेवावा. या ढिगाचे प्रत्यक्ष सूर्यप्रकाशापासून आणि पावसापासून संरक्षण करावे.
  • नंतर बेण्याची आकारानुसार निवड करावी. प्रतवारी - छोटा (२५ ग्रॅम पेक्षा लहान), मध्यम (२५-५० ग्रॅम), मोठा (५०-७५ ग्रॅम) आणि जादा मोठा (७५ ग्रॅम पेक्षा मोठा) तसेच, कट झालेले फुटलेले बटाटे वेगळे करावेत. 
  • निवड केल्यानंतर बेणे धुवून स्वच्छ करावे. बोरिक ॲसिड ३ % द्रावणात ३० मिनिटे बुडवावेत. यामुळे पृष्ठभागावरील रोग (स्कॅब) नियंत्रण होण्यास शकतो. जर बेणे योग्य प्रकारे धुवून स्वच्छ केलेले असतील, तर बोरिक ॲसिडचे द्रावण २० वेळेपर्यंत प्रक्रियेसाठी वापरता येते. प्रक्रिया केलेले बेणे सावलीत योग्य प्रकारे सुकवावेत. असे प्रक्रियायुक्त बेणे विषारी असल्याने खाण्यासाठी कदापि वापरू नयेत. असे बेणे फक्त बियाणांसाठीच वापरावेत. हे बेणे पोत्यामध्ये बंद करून लेबल लावून ठेवावे. 
  • लागवड तंत्रज्ञान 

  • बटाटा लागवड करण्यासाठी बियाणाची मात्रा लागवड पद्धतीवर, लागवडीच्या अंतरावर तसेच बेण्याच्या आकारावर अवलंबून असते. 
  • साधारणतः एक हेक्टरसाठी सरासरी ३०-४० क्विंटल बेणे आवश्यक असते. 
  • केंद्रीय बटाटा संशोधन संस्था, सिमला यांच्या शिफारशीनुसार प्लँटरच्या साहाय्याने लागवड केल्यास ६० सें.मी. x २० सें.मी. अंतर ठेवावे. तसेच, मजुरांच्या साहाय्याने लागवड केल्यास ५० सें.मी. x १५ सें.मी. अंतर ठेवावे. बेणे साधारणतः ८-१० सें.मी. खोल टोकावे. 
  • बटाटा संशोधन केंद्र, सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, ढिसा, गुजरात यांच्या शिफारशीनुसार, एक ओळ गादी वाफा  पद्धतीने ५० सें.मी. x १५-२० सें.मी. अंतरावर लागवड करण्यासाठी २५-३० क्विंटल प्रति हेक्टरी बेण्याची गरज असते. 
  • दोन आणि चार ओळ गादी वाफा पद्धतीने लागवड ठिबक सिंचन पद्धतीसाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीत  ३५-४० क्विंटल प्रति हेक्टरी बेण्याची गरज असते. दोन ओळ पद्धतीने लागवड करण्यासाठी ७५ सें.मी. रुंदीच्या गादी वाफ्यावर दोन ओळीत लागवड करतात. दोन बेण्यामध्ये १५-२० सें.मी. अंतर ठेवतात. 
  • चार ओळ पद्धतीने लागवड करण्यासाठी १५० सें.मी. रुंदीच्या गादी वाफ्यावर चार ओळीत लागवड करताना दोन बेण्यामध्ये १५-२० सें.मी. अंतर ठेवतात.
  • बटाटा बेण्याची उगवण एक समान होण्याच्या उद्देशाने लागवडीच्या अगोदर रान ओलावून घेऊ शकतो अथवा लागवडीच्या दुसऱ्या दिवशी हलके पाणी देऊ शकतो. तसेच, दुसरे पाणी आठवड्याने देऊ शकतो. पुढील पाणी व्यवस्थापन वातावरणानुसार, जमिनीच्या प्रकारानुसार, गरजेनुसार करावे.  
  • संपर्क : डॉ. पी. ए. साबळे, ८४०८०३५७७२ (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग,  के. व्ही. के. सरदारकृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com