राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा 

राज्यात साधारण साठ ते सत्तर हजार कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत. दर महिन्याला चार ते साडेचार लाख कोटी कोंबड्यांचे म्हणजे नऊ ते सव्वानऊ कोटी चिकनचे उत्पादन होते.
Improvement in chicken and egg prices in the state
Improvement in chicken and egg prices in the state

नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे. मात्र गरजेइतका चिकनचा पुरवठा होत नाही. उन्हाळ्याचे दिवस असून कडक उन्हाळा यंदा लवकर सुरू झाल्याने कोंबड्यांत मरतुकीचे प्रमाण अधिक असते. शिवाय पक्ष्यांची पुरेशी वाढ होत नसल्याने सध्या महिन्याला एक ते सव्वा कोटी किलो चिकनची साधारण तूट निर्माण झाली असल्याचे पोल्ट्रीतील अभ्यासक सांगतात. अंड्यांचे उत्पादनही मागणीच्या तुलनेत कमीच असल्याने दरात वाढ झाली आहे. 

राज्यात साधारण साठ ते सत्तर हजार कुक्कुटपालन करणारे शेतकरी आहेत. दर महिन्याला चार ते साडेचार लाख कोटी कोंबड्यांचे म्हणजे नऊ ते सव्वानऊ कोटी चिकनचे उत्पादन होते. बर्ड फ्लूच्या संकटानंतर गेल्या महिनाभरात पोल्ट्री उद्योगात सुधारणा होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये पोल्ट्री उद्योगाचे दोन हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले होते. त्यामुळे आताही गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक वाढत असल्याने पुन्हा लॉकडाउनची भीती असल्याने कोबडी उत्पादन कमी झाले. 

वीकएण्ड लॉकडाउनमध्ये चिकन विक्रीला परवानगी नव्हती. आता मात्र परवानगी मिळाल्याने चिकन विक्री सुरू आहे. त्याचा फायदा दरात सुधारणा होण्याला झाला आहे. कोरोनामुळे मागणीही वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी लॉकडाउनच्या धास्तीने ठोक जिवंतमध्ये असलेल्या ८० रुपये किलोचा दर आता ११० रुपयांवर गेला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी आणि दरात वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

उन्हाळा आणि लॉकडाउनच्या धास्तीने अनेक ठिकाणी पिले टाकली नाहीत. त्यामुळे उत्पादन कमी झाल्याने सध्या दर महिन्याच्या तुलनेत साडेतीन कोटी कोंबड्यांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ५० ते ७० लाख कोंबड्यांची तूट आहे. राज्यात दररोज दीड ते पावणेदोन कोटी अंड्यांचे उत्पादन होत असते. ते सव्वा कोटीवर आले आहे. मागणी मात्र दुपटीने वाढली असून, इतर राज्यांतून एक कोटी अंडी पुरवठा होत आहे. गेल्या महिनाभराच्या तुलनेत सध्या प्रति अंड्यामागे ठोक दरात दीड ते दोन रुपये वाढ झाली आहे. 

बर्ड फ्लूच्या धक्क्यातून पोल्ट्री उद्योग सावरत असला, तरी लॉकडाउनच्या धास्तीने उत्पादन कमीच आहे. सध्या मागणी चांगली असून, मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने दरात काहीशी सुधारणा झाली आहे. मात्र खाद्याचे दर वाढल्याने नफ्यात घट झाली आहे. चिकनचे दर अजून वाढतील. ही चांगली बाब आहे. मात्र वाढते खाद्याचे दर कमी झाले पाहिजेत. रोगप्रतिकार शक्तीवाढीसाठी चिकन फायदेशीरच असल्याचे सातत्याने स्पष्ट झाले आहे.  उद्धवराव आहिरे पाटील,  सचिव, पोल्ट्री फामर्स व ब्रीडर्स असोसिएशन, महाराष्ट्र 

चिकन, अंड्याचे दर
ब्रायलर कोंबडी ९० ते ११० प्रति किलो (जिवंत, ठोक) 
चिकन विक्री २१० ते २३० प्रति किलो (किरकोळ) 
अंडी प्रति शेकडा ५०० ते ५५० (ठोक) 
अंडी प्रति शेकडा ६५० ते ७०० (किरकोळ) 

उत्पादन खर्च वाढला, नफ्यात घट  आंतराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा फटका कुक्कुट उद्योगाला बसत आहे. कोंबड्यासाठी लागणाऱ्या सोयामीलचे प्रति टन ५० हजार रुपये होते ते आता ७० हजार रुपये टनावर गेले आहेत. त्यामुळे प्रति कोंबडीला प्रति किलो ७० रुपये असलेला उत्पादन खर्च ८५ रुपयांवर गेला आहे. मक्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने नफ्यात घट होत आहे. त्यामुळे चिकन, अंड्याचे दर वाढले असले तरी उत्पादकांना पूर्वीपेक्षा नफा आता कमी झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com