green crops should be buried immediately after they comes in flowering stage for improving soil
green crops should be buried immediately after they comes in flowering stage for improving soil

..अशी करा चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा 

चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा समावेश करावा. शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खते जमिनीत मिसळावीत. शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके पेरून ४५ ते ५० दिवसांत फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाडावीत. चुनखडीयुक्त जमीन नैसर्गिकरीत्या उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात आणि वाळवंटी भागात आढळतात. या जमिनी तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जमिनीतील क्षारांचा निचरा होण्यासाठी लागणारा अपुरा पाऊस आणि मुक्त चुन्याचा निचरा जमिनीतून न होता तापमान वाढल्यानंतर खालच्या थरातील चुनाही वरच्या थरात येतो. 

  • महाराष्ट्रातील जमिनी काळ्या बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. या खडकांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश आणि सोडियमयुक्त खनिजांचे प्रमाण अधिक असते. यांचे विदारण होऊन चुनखडीचे प्रमाण वाढते. यामध्ये चुनखडी खडे, चुनखडी पावडर असे दोन प्रकार आहेत. चुनखडी पावडर ही खड्यापेक्षा जास्त क्रियाशील असते.  
  • बऱ्याच वेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाहत जाऊन तेथे अत्यंत कठीण चुन्याचा पातळ थर तयार होतो. अशा थरामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठवून राहते. पाण्यामध्ये जर विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्‍त असेल (उदा. कूपनलिकेच्या पाण्यामध्ये जास्त चुना असण्याची शक्यता असते.) आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडीयुक्त होतात.  
  • जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण जर ३ ते ५ टक्क्यांपर्यंत असेल तर अशा जमिनी उत्पादनक्षम असतात. या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होत नाहीत. जमिनीतील चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते.  
  • एकूण धन आयन धारण करण्याच्या क्षमतेस जमिनीस विनिमय क्षमता म्हणतात. चिकण आणि पोयट्याच्या जमिनीची विनिमय क्षमता इतर जमिनीपेक्षा जास्त असते. याउलट वालुकामय जमिनीची विनिमय क्षमता अत्यंत कमी असते.
  • चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन 

  • जमिनीची खोलवर नांगरट करावी.  
  • शिफारशीप्रमाणे दरवर्षी सेंद्रिय खते जमिनीत मिसळावीत. शेणखताचा अपुरा पुरवठा असल्यास हिरवळीची पिके (ताग/धैंचा/ चवळी) पेरून ती ४५ ते ५० दिवसांत फुलोऱ्यात आल्यावर जमिनीत गाडावीत.  
  • चुनखडीयुक्त जमिनीत आंतरपीक म्हणून द्विदल पिकांचा समावेश करावा.  
  • रासायनिक खते पृष्ठभागावर फेकून न देता ती पेरून द्यावीत किंवा मातीआड करावीत.  
  • रासायनिक खतांचा वापर करताना माती परीक्षणाद्वारे नत्र हे अमोनियम सल्फेटद्वारे द्यावे, स्फुरद हे डायअमोनियम फॉस्फेटद्वारे द्यावे. पालाश शक्यतो सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे द्यावे.  
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खतांचा वापर करताना सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावीत.  
  • चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुपर फॉस्फेट देताना ते सरळ जमिनीत न मिसळता कंपोस्ट किंवा शेणखतात मिसळून साधारणपणे ३ ते ४ इंच खोलीवर चळी करून द्यावे.  
  • स्फुरद विरघळविणाऱ्या जैविक खतांचा वापर बीज प्रक्रियेद्वारे किंवा शेणखतात मिसळून करावा.  
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असताना ते जमिनीत सरळ न मिसळता शेणस्लरीबरोबर आठवडाभर मुरवून किंवा कंपोस्टमध्ये मिसळवून द्यावीत.  
  • चुनखडीयुक्त जमिनीत सहनशील पिकांची लागवड करावी. उदा. कापूस, गहू, ऊस, सोयाबीन, बाजरी, आवळा, बोर, सीताफळ, अंजीर इ.  
  • सिंचनाची सोय ठिबकद्वारे करावी. नगदी, फळपिकांना ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा.  
  • जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी कारखान्यातील मळी कंपोस्ट उन्हाळ्यामध्ये हेक्टरी ५ टन जमिनीत समप्रमाणात मिसळावे. त्यानंतर नांगरट करावी.  
  • जमिनीमध्ये मुख्यत्वेकरून फळबाग व इतर पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना त्या जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किती आहे व ती कोणत्या थरात आहे, याची प्राथमिक माहिती करून घ्यावी. हे मातीच्या परीक्षणाद्वारे कळते. त्या वेळेसच आपण चुनखडीयुक्त जमिनींचे चांगले व्यवस्थापन करून सहनशील पिकांचे अपेक्षित उत्पादन घेऊ शकतो. 
  • संपर्कः प्रियंका दिघे ९६६५५१२३५८ (कृषी महाविद्यालय, लोणी, जि. नगर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com