जळगाव, रावेरात मतदानास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव, रावेरात मतदानास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव, रावेरात मतदानास तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता.२३) मतदान झाले. सकाळी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी मात्र मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून आला. त्यानंतर सायंकाळी मात्र मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. जळगाव मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५८, तर रावेर मतदार संघात सुद्धा ५८ टक्के मतदान झाले. लोकशाहीच्या या उत्सवात तरुणाईने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव मतदारसंघातील जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, अमळनेर, भडगाव, धरणगाव या भागात मतदानाला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळीच मतदान केंद्रावर महिला, युवक मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आले होते. 

महिला मतदारांचा सखी मतदान केंद्रात औक्षण करून सन्मान करण्यात आला. दोन्ही मतदारसंघात असे ११ केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यांना गुलाबी कापड, रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आले होते. 

जळगाव तालुक्यातील डोमगाव येथे मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट यंत्र नसल्याने मतदान दोन तास उशिरा सुरू झाले. नंतर प्रशासनाने ही समस्या दूर केली. मतदानावेळी मदतीसाठी विविध पक्षीयांनी कार्यकर्ते मतदान केंद्रानजीक नियुक्त केले होते. मतदार यादीत नाव न सापडल्यास कार्यकर्ते मोबाईल ॲप, लॅपटॉप यांद्वारे नाव, क्रम शोधून देत होते. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात पोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी १ वाजेनंतर मतदानाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. 

जळगावातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी परिवारासह चाळीसगाव येथे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी कुटुंबीयांसोबत जळगाव शहरात, रावेरमधील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सासरे एकनाथ खडसे यांच्यासह कोथळी, ता. मुक्ताईनगर येथे, तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक जामनेर येथे मतदान केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com