सोलापूरच्या 'एक जिल्हा, एक पीक'साठी ज्वारीचा समावेश 

‘एक जिल्हा एक उत्पादन’या बाबीखाली ज्वारीची निवड झाली असून, ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
एक जिल्हा एक पीक उत्पादन योजनेत ज्वारीचा समावेश Inclusion of sorghum in one district one crop production scheme
एक जिल्हा एक पीक उत्पादन योजनेत ज्वारीचा समावेश Inclusion of sorghum in one district one crop production scheme

सोलापूर : केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत पीएमएफएमई-प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन या योजनेस केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये केंद्राचा ६० टक्के तर राज्यांचा ४० टक्के हिस्सा राहणार आहे. योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’या बाबीखाली ज्वारीची निवड झाली असून, ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

ही योजना असंघटित क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबविली जाणार आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्व १०० टक्के खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. राज्यात जवळपास २.२४ लाख असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च, आधुनिकीकरणाचा अभाव, एकात्मिक अन्न पुरवठा साखळीचा अभाव आणि आरोग्य व सुरक्षितता मानांकनाचा अभाव या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन ही योजना आहे.

योजनेचा उद्देश कार्यरत असलेले सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक यांची पत मर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रॅन्डिंग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित पुरवठा साखळीशी जोडणे, देशातील दोन लाख उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांच्या बळकटीकरणावर भर देणे, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे आदी योजनेचे उद्दिष्टे आहेत.

म्हणून सोलापूरची निवड सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी  ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेत असल्याने प्रक्रिया उद्योग उभारणे फायद्याचे ठरणार आहे. ज्वारीची स्वच्छता, प्रतवारी करणे, ज्वारीवर प्रक्रिया करून रवा, केक तयार करणे, ज्वारीचे ५ किलो, १५ किलो असे पॅकेट तयार करून शहरांमध्ये मॉलसाठी पुरवठा करणे, असे प्रक्रिया उद्योग उभारू शकतात. जिल्ह्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी १६ प्रक्रिया उद्योगाचा लक्षांक प्राप्त असून, स्वयं सहायता गटासाठी १२ तर शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एकचा लक्षांक मिळाला आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  •   सन २०२०-२१ या पाच वर्षांत एक जिल्हा-एक उत्पादन या धर्तीवर राबविली जाणार आहे.  जिल्ह्यासाठी ज्वारी पीक निवडले आहे.
  •   योजनेअंतर्गत मुख्यत्वे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना सक्षमीकरणासाठी खर्चाच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाख रुपये मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे.
  •   शेतकरी उत्पादक संस्था / स्वयंसहाय्यता गट / सहकारी उत्पादक यांना कॉमन फॅसिलिटी सेंटर, फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस, कॅपिटल इन्वेस्टमेंटच्या खर्चाच्या ३५ टक्के आणि ब्रॅन्डिंग आणि मार्केटिंगसाठी खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.  स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल, सदस्यांना कर्ज किंवा गुंतवणुकीसाठी चार लाख रुपये प्रति बचत गट लाभ दिला जाणार आहे.
  •   या अंतर्गत एका गटातील कमाल १० सदस्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये म्हणून देण्यात येणार आहेत.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com