सेनगाव, माकोडी कृषी बाजारात शेतमालाची आवक वाढली

हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, माकोडी (ता.सेनगाव) येथील संत नामदेव कृषी बाजार येथे शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आवक वाढली आहे .
 The incoming of agriculture product  increased in agricultural market
The incoming of agriculture product increased in agricultural market

हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, माकोडी (ता.सेनगाव) येथील संत नामदेव कृषी बाजार येथे शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आवक वाढली आहे . कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून शेतमालाची खरेदी करावी, असे निर्देश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मैत्रेवार यांनी दिली. 

‘लॅाकडाऊन'मुळे जिल्ह्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक बंद आहे. त्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु, सेनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि माकोडी येथील संत नामदेव कृषी बाजारात शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अडचणी येत नाहीत. 

सेनगाव बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी सुरुच होती. परंतु लॅाकडाऊनमुळे आवक कमी होती. त्यामुळे एक दिवसाआड आवक घेतली जात होती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून आवक वाढली आहे. मंगळवारी (ता.७) सेनगाव बाजार समितीत हरभऱ्याची ३५ क्विंटल आवक होती. त्यास प्रतिक्विंटल किमान ३६०० ते कमाल ३९०० रुपये दर मिळाले.

सोयाबीनची ४० क्विंटल होऊन प्रतिक्विंटलला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळाले. तुरीची ४७९ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ५१५० ते ५३०० रुपये दर मिळाले. मंगळवारी दुपारी दोनपर्यंत एकूण ५५४ क्विंटल शेतमालाची आवक झाली, असे बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी सांगितले. 

संत नामदेव कृषी बाजारात सोमवार (ता.६) पासून शेतमालाची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता.७) एकूण ३३ वाहनांतून तूर आणि हरभरा मिळून ६४५ क्विंटल, बुधवारी (ता.८) तूर, हरभरा, सोयाबीन मिळून सुमारे ६०० क्विंटल शेतमालाची आवक झाली. तुरीला प्रतिक्विंटलला ५००० ते ५३५० रुपये, हरभऱ्याला प्रतिक्विंटलला ३८०० ते ४००० रुपये, सोयाबीनला प्रतिक्विंटलला ३५०० ते ३७०० रुपये दर मिळाले, असे कृषी बाजारचे संचालक गिरीधारीलाल तोष्णीवाल यांनी सांगितले.  खरेदी-विक्रीवेळी ‘सोशल डिस्टन्सिंग' 

सेनगाव बाजार समिती, माकोडी येथील संत नामदेव कृषी बाजारात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. शेतकरी, हमाल, व्यापाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक वाहनांवर फवारणी केली जात आहे. प्रवेशव्दारावर हात धुण्यासाठी सॅनिटायझर, हॅन्डवॅाश, साबणाची व्यवस्था आहे. देखरेख ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त आहेत. दोन व्यक्तीमधील अंतर किमान ४ फूट राखण्यासाठी वर्तुळे आखली आहेत. अन्य बाजार समित्यांनी अशी अंमलबजावणी करून शेतमालाची खरेदी सुरु केल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यास मदत होईल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे मैत्रवार यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com