केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट; खानदेशात दरात सुधारणा

केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट; खानदेशात दरात सुधारणा
केळीच्या मध्य प्रदेशातील आवकेत घट; खानदेशात दरात सुधारणा

जळगाव : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील केळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे दरात चांगली सुधारणा झाली आहे. यामुळे खानदेशात रावेर व जळगाव भागांत नवती केळीचे दर अनुक्रमे १३६० व १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. दरात मध्यंतरी सुरू झालेली पडझडही थांबली आहे. 

उत्तरेकडील श्रावणमास संपल्यानंतर मागील महिन्यातच दरात काहीशी घसरण होऊन १३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर खाली आले होते. परंतु मध्य प्रदेशातील केळीची आवक कमी झाली आहे. तेथील बऱ्हाणपूर येथील बाजारात मागील पंधरवड्यात प्रतिदिन २५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी आवक राहिली. तेथे रोज किमान ३०० ट्रक केळीची मागणी आहे. शिवाय मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व लगतच्या भागात फारशी केळी काढणीवर नाही. 

जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर येथील अनेक शेतकरी अधिक दरांसाठी तेथे केळी पाठवीत आहेत. यामुळे तेथे केळीची आवक २५० ट्रक एवढी टिकून आहे. आवक हवी तशी नसल्याने तेथे केळीला मागील आठवड्यात कमाल १७५० रुपये प्रतिक्विंटल, तर किमान ८७५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. कमी दर्जाच्या केळीलाही तेथे उठाव आहे. सध्या जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर या भागांत फारशी केळी काढणीवर नाही. नवती व पिलबाग केळी यावल, रावेर, मुक्ताईनगर या भागातच कमी अधिक प्रमाणात आहे. 

जळगाव जिल्ह्यात प्रतिदिन ३०० ट्रक केळीची आवक मागील आठवड्यात झाली. फैजपूर (ता. यावल) व सावदा (ता. रावेर) येथील एजंट, खरेदीदारांकडून उत्तरेकडील मोठ्या व्यापाऱ्यांनी केळीची बऱ्यापैकी मागणी केली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडे मागणी आहे. यामुळे नवती केळीच्या दरात मागील आठवड्यात क्विंटलमागे सुमारे ३० रुपयांची सुधारणा झाली. सध्या रावेरातील घामोडी, ऐनपूर, निंबोल, केऱ्हाळे, निंभोरा, रसलपूर, चिनावल या भागात, मुक्ताईनगरमधील अंतुर्ली, नायगाव, चांगदेव व तापी काठावरील इतर गावांमध्ये केळीची काढणी सुरू आहे. 

यावलमध्ये केळीची फारशी आवक नाही. कारण उन्हाळ्यात यावलमधील न्हावी, हंबर्डी व मोर प्रकल्प भागातील गावांमध्ये दुष्काळाचा मोठा फटका नवती बागांना बसला होता. या भागातील निसवणीवरील ३० ते ३५ टक्के केळी पीक मोडण्याची वेळ आली होती. परिणामी आवक वाढलेली नाही. पुढेही फारशी आवक वाढणार नाही. दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com