नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी लागवड क्षेत्रात वाढ

आमच्या भागात यंदा केळी लागवड क्षेत्रात दुपटीने वाढ झाली. त्यामध्ये कांदे बाग केळीचे लागवड क्षेत्र जास्त आहे. - शिवाजीराव देशमुख, बारड, जि. नांदेड. जायकवाडी धरण भरल्यामुळे यंदा पाणी कमी पडणार नाही. जानेवारी महिन्यात केळी लागवड करणार आहोत. - वसंतराव कदम, सिंगणापूर, जि. परभणी. यंदा इसापूर तसेच सिद्धेश्वर कालव्याचे पाणी मिळण्याची खात्री झाल्यामुळे गावातील केळी लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली. - मारोती देमे, गिरगाव, जि. हिंगोली. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यात कमी पाऊस झाला. त्यामुळे मृग बाग केळी लागवड कमी झाली. परंतु, आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवड केली. - प्रा. आर. व्ही. देशमुख,प्रभारी अधिकारी, केळी संशोधन, केंद्र, नांदेड.
Increase in banana cultivation area in Nanded, Parbhani and Hingoli districts
Increase in banana cultivation area in Nanded, Parbhani and Hingoli districts

नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली. त्यामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा केळी लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

यंदा या तीन जिल्ह्यांत जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सिंचन स्रोतांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मृग बाग केळीच्या लागवड क्षेत्रात घट झाली. परंतु, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे विहिरी, बोअर, सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांदे बाग केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. जानेवारी - फेब्रुवारी महिन्यापासून केल्या जाणाऱ्या राम बाग केळीच्या लागवड क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे.

नांदेड जिल्ह्यातील इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रातील हदगाव, अर्धापूर, मुदखेड आदी तालुक्यातील केळी लागवड क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन, मूग, कपाशीनंतर अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवड केली. येलदरी -सिद्धेश्वर आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातही केळी लागवड सुरू आहे. 

परभणी जिल्ह्यात यंदा जायकवाडी, येलदरी-सिद्धेश्वर, माजलगाव मोठ्या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यांत, तर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर आणि येलदरी-सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यात केळी लागवड झाली आहे. 

१५ हजार हेक्टरवर लागवड

मराठवाड्यामध्ये केळीचे लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १५ हजार हेक्टरपर्यंत केळी लागवड झाली. कमी पावसामुळे सिंचनासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी केळीकडून हळदीकडे वळले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या तीन जिल्ह्यातील केळीचे क्षेत्र कमी झाले. परंतु, यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा केळी लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com