नांदेड, परभणी, हिंगोलीत केळी लागवडीत वाढ

नांदेड :धरणांच्या लाभक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लाभक्षेत्रात यंदा मृगबाग केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. आहे.
  Increase in banana cultivation in Nanded, Parbhani, Hingoli
Increase in banana cultivation in Nanded, Parbhani, Hingoli

नांदेड : यंदा जायकवाडी, इसापूर, येलदरी, सिध्देश्वर या धरणांमध्ये मुबलक  पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे धरणांच्या लाभक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील लाभक्षेत्रात यंदा मृगबाग केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. 

पाण्याची शाश्वती झाल्यामुळे मूग, सोयाबीननंतर कांदे बाग केळीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असे जाणकार शेतकरी सांगत आहे.त्यामुळे तीनही जिल्ह्यातील केळी लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मराठवाड्यामध्ये केळी लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार हेक्टर आहे. तर, उत्पादकता ६१.२३ टन प्रतिहेक्टर एवढी आहे. मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांपैकी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात प्रामुख्याने केळीची लागवड केली जाते. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हादगाव, भोकर या तालुक्यांमध्ये गतवर्षी ७ हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. यंदा ८ हजार हेक्टरवर नवीन लागवड प्रस्तावित आहे.जून महिन्यात मृग बाग केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली.

इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा धरणातील पाणीसाठ्यावर नांदेड जिल्ह्यातील केळी लागवडीचे भवितव्य अलंबून असते. सध्या इसापूर धरणातील उपयुक्त पाणी ८९ टक्केवर पोचले आहे. त्यामुळे अर्धापूर, मुदखेड, हादगाव तालुक्यातील केळी लागवड क्षेत्रात वाढ होईल. येलदरी-सिध्देश्वर ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे नांदेड तालुक्यातील केळी लागवड वाढेल. जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ८४ टक्केंवर पोचला आहे. 

जायकवाडीचे सर्वाधिक लाभक्षेत्र परभणी जिल्ह्यात आहे. गतवर्षी जिल्ह्यात ८८७ हेक्टरवर केळी लागवड झाली होती. यंदा पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यात केळी लागवड वाढणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ४ हजार हेक्टरपर्यंत केळीचे क्षेत्र आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा तसेच परिसारत इसापूर धरणाच्या कालव्याचा, तर वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव आदी गावांना येलदरी, इसापूर धरणाच्या कालव्याचा लाभ मिळतो. त्यामुळे या भागात केळी लागवडीखालील क्षेत्रात वाढ होईल.

शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची खात्री

सिंचनासाठी पाणी उपलब्धतेचा अंदाज घेऊन अनेक शेतकरी केळी लागवड करतात. त्यासाठी सोयाबीन, मूग या पिकांची पेरणी करताना त्यात केळी लागवडीसाठी सऱ्या सोडतात. यंदा सर्वच प्रकल्पांव्दारे आवर्तने मिळण्याची खात्री झाली. त्यामुळे कांदे बाग केळी लागवड क्षेत्रात निश्चितच वाढ होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

यंदा पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे मृग बागेमध्ये केळीची रोपटे आणि बेणे पध्दतीने पाच हजार झाडांची लागवड केली. - शिवाजी देशमुख, पार्डी,ता.अर्धापूर,जि.नांदेड.

इसापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोयाबीन आणि मूगामध्ये सऱ्या मारुन ठेवलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी तयारी सुरु केली आहे. - ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com