राज्यात फळबाग लागवडीचा उच्चांक

चालू वर्षी मागील पाच वर्षांतील उच्चांकी फळबाग लागवड झाली आहे. सुमारे २६ हजार ४७३ हेक्टरवर फळबाग लागवड झाल्याने आगामी काळात उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.
राज्यात फळबाग लागवडीचा उच्चांक
राज्यात फळबाग लागवडीचा उच्चांक

पुणे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) फळबाग लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. योजनेच्या जाचक निकषांमुळे सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळत असला, तरी हळूहळू या योजनेकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. चालू वर्षी मागील पाच वर्षांतील उच्चांकी फळबाग लागवड झाली आहे. सुमारे २६ हजार ४७३ हेक्टरवर फळबाग लागवड झाल्याने आगामी काळात उत्पादन वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावर फळबाग लागवडीद्वारे रोजगारनिर्मिती करून आर्थिक स्तर उंचावणे, फळपिकाखालील क्षेत्र वाढवून शेती पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.  ही योजना शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून, राज्यात २०११ ते १२ पासून राबविण्यात येत आहे. मात्र योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेत जमिनीवर फळबाग लागवड करून जमिनीवर आच्छादन निर्माण केले जाते. त्यामुळे जमिनीची धूप कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो. योजनेची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांत केली जाते. योजनेअंतर्गत लागवडीचा कालावधी एप्रिल ते नोव्हेंबरअखेरपर्यंतचा आहे. मात्र चालू वर्षी डिसेबरपर्यंत लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.   योजनेतून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर फळबाग लागवडीची २४ प्रकारची फळझाडे, बांधावर २६ प्रकारची फळझाडे व पडीक शेत जमिनीवर २४ प्रकारच्या फळझाडाची लागवड निश्‍चित करण्यात आलेली आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी त्याकरिता ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने ग्रामसभेमध्ये मंजूर असलेल्या आराखड्याप्रमाणे लाभार्थ्यांची यादी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना सात दिवसांच्या आत सादर करावी. यंत्रणेकडे पात्र लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांनी जागेची निवड, अंदाज पत्रक तयार करणे अशा विविध बाबी पूर्ण करून फळबाग लागवड करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सलग तीन वर्षे टप्प्याटप्प्याने अनुदानाचा लाभ देण्यात येत असल्याने या योजनेकडे शेतकरी वळत आहेत.

मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी बहुतांशी शेतकऱ्यांनी डाळिंब, पेरू, आंबा, चिकू, सीताफळ, लिंबू अशा विविध फळपिकांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र राज्य शासनाने रोजगार हमी योजनेतून मागील दोन ते तीन वर्षांपासून अनुदान बंद केले होते. त्यामुळे या योजनेतून फारशी लागवड झाली नाही. या कालावधीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीवर (मनरेगा) भर दिला. परंतु या योजनेतील जॉब कार्डसारख्या असलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी लागवड करण्याचे सोडून दिले होते. त्यामुळे फळबाग लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने घट होऊ लागली होती. यंदा पुन्हा राज्य शासनाने या फळबाग लागवडीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिल्याने फळबाग लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

फळबागनिहाय नवी लागवड (हेक्टर) (फळबाग/ क्षेत्र) आंबा : ११,६८०, काजू : ४९८७, संत्रा : २५६९, सीताफळ : १६२७,  मोसंबी : १२४८, डाळिंब : ६७४, पेरू : ६७०, नारळ : ६४३, कागदी लिंबू : १२६२, इतर पिके १११३ वर्षनिहाय झालेली फळबाग लागवड (हेक्टर)

  • वर्ष    :  लागवड
  • २०१६ : १२,५००
  • २०१७ :  २०,०००
  • २०१८ :  १२,०००
  • २०१९ :  १७,०००
  • २०२० :  २६,४७३
  • प्रतिक्रिया... मनरेगाअंतर्गत फळबाग लागवडीचे फायदे चांगले आहेत. काही अडचणी असल्या तरी त्या सोडविण्यात येत आहेत. यामुळे शेतकरी हळूहळू लागवडीकडे वळत असून, चालू वर्षी मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. — कैलास मोते, संचालक, फलोत्पादन विभाग, कृषी विभाग, पुणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com