पीक,उत्पादनाचा ब्रँड तयार करून कारंब्याची ओळख वाढवा : सुभाष देशमुख

 Increase karamba identity by creating a crop, brand of product : Subhash Deshmukh
Increase karamba identity by creating a crop, brand of product : Subhash Deshmukh

सोलापूर  : ‘‘अवघ्या दोन वर्षात कारंब्याचा चौफेर विकास होतो आहे. विशेषतः महिला,  विद्यार्थी, मजूर, शेतकरी आदी घटकांसाठी त्यात भरीव काम होते आहे, हे कौतुकास्पद आहे, पण ही ओळख आणखी वाढण्यासाठी गावाने एखाद्या पीक वा उत्पादनाचा ब्रँड तयार करून कारंब्याची ओळख वाढवावी,’’ असे आवाहन राज्याचे माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. २२) कारंबा येथे केले.

कारंबा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि द्विवार्षिक कार्यअहवालचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पंचायत समितीच्या उपसभापती रजनी भडकुंबे, भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, लोकनियुक्त सरपंच कौशल्या सुतार, सामाजिक कार्यकर्ते नागेश कोकरे, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके, माजी सरपंच बाळासाहेब सुतार, राजशेखर तंबाके, बाजार समितीचे माजी संचालक उत्तरेश्वर भुट्टे, प्रा. विनायक सुतार, ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी बहिर्जे, स्मिता पाटील, लक्ष्मी बहिर्जे, कविता भोरे, इन्नूस शेख, अशोक बहिर्जे, श्रीकांत आदाटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब गुंड, नागनाथ बन्ने, भागवत कत्ते आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या द्विवार्षिक अहवालाचे प्रकाशन झाले.

देशमुख म्हणाले, ‘‘चांगल्या माणसाला आणि चांगल्या कामाला नेहमीच साथ मिळते. कारंब्यालाही प्रामाणिक सरपंच मिळाल्यानेच लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. त्यामुळे लोकांनीही साथ दिली पाहिजे. विरोधी पक्षाने राजकारण न करता विकासाचा दृष्टिकोन ठेवून सहकार्य केले पाहिजे. गावातील महिला आणि तरुणांनी पुढाकार घेत उद्योग वा शेतीत उतरले पाहिजे.``

’’ पवार म्हणाले, ‘‘अवघ्या दोन वर्षातील बदल निश्चितच कौतुकास्पद आहे. काही लोकांना बदल रुचत नाही, पण आपण लक्ष न देता सकारात्मक काम करत राहायचं. भविष्यातही गावाच्या विकासासाठी जी काही मदत लागेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.’’

७०० कुटुंबांना कचराकुंड्या

ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ कारंबा, सुंदर कारंबा या थीमखाली आगामी काळात स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी या कार्यक्रमात गावातील प्रत्येक कुटुंबाला कचराकुंडी देण्यात आली. जमा होणारा हा कचरा घंटागाडीद्वारे गावाबाहेर एका ठिकाणी साठवला जाणार आहे. गावातील जवळपास ७०० कुटुंबांना या वेळी कचराकुंड्यांचे वाटप झाले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com