पुणे जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रात वाढ

पुणे जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रात वाढ
पुणे जिल्ह्यात कांदा लागवड क्षेत्रात वाढ

पुणे : पुणे विभागात यंदा कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी हंगामात ९४ हजार ९५ हेक्टरवर त्याची लागवड झाली आहे. आगामी काळात कांद्याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. 

दरवर्षी खरीप, लेट खरीप (रांगडा कांदा) आणि रब्बी हंगामात (उन्हाळी कांदा) कांद्याची लागवड करतात. बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामातील कांद्याला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरीप हंगामातील कांद्याची ऑगस्टमध्ये, लेट खरीप हंगामातील सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात, तर उन्हाळी कांद्याची डिसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड करतात. त्यासाठी बहुतांशी शेतकरी एक ते दीड महिना अगोदर गादीवाफ्यावर रोपे तयार करतात. लागवड केलेल्या कांद्याची साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी काढणी करतात. काही शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. चांगला भाव आल्यानंतर त्याची विक्री करतात. परिणामी शेतकऱ्यांना हंगामात भेटणाऱ्या दरापेक्षा अधिक दर नंतरच्या कालावधीत मिळतो. नगर, पुणे आणि सोलापूर भागात हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी त्याची लागवड करतात. 

पुणे जिल्ह्यातील पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यात दरवर्षी कमी पाऊस पडतो. त्यामुळे बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची व शाश्वत उत्पन्न देणारी पिके घेतात. या भागातील सर्वाधिक लागवड शिरूर तालक्यात होते. नगर जिल्ह्यातही शेवगाव, नेवासा, संगमनेर, श्रीगोंदा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात, तर  नगर, श्रीरामपूर, अकोले, जामखेड, राहुरी या तालुक्यात अत्यल्प लागवड आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, माढा तालुक्यांत सर्वाधिक लागवड आहे.

जिल्हानिहाय कांदा लागवड (क्षेत्र, हेक्टरमध्ये)

जिल्हा   कांदा लागवड 
नगर  ५५,१५५
पुणे  ३०,४०० 
सोलापूर   ८५४० 
एकूण   ९४,०९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com