शेतीमध्ये वाढवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर

शेतीमध्ये वाढवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर
शेतीमध्ये वाढवा सेंद्रिय निविष्ठांचा वापर

सातत्याने रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे अनुक्रमे जमीन आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हे कमी करण्यासाठी संपूर्ण सेंद्रिय पद्धतीचा आग्रह जागतिक पातळीवर वाढत आहे. महाराष्ट्रामध्येही सेंद्रिय शेतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सेद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा शेतावरच तयार केल्यास फायदेशीर राहू शकते. जागतिक पातळीवर सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढत आहे. भारतातही सन १९६० पर्यंत शेतकरी सेंद्रिय पद्धतच वापरत असे. मात्र, त्यानंतर झालेल्या हरितक्रांतीच्या टप्प्यामध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. पुढे त्यासोबत कीडनाशके, तणनाशके, संजीवके यांचाही वापर होऊ लागला. पुढे जनावरांची संख्या कमी होत गेली. परिणामी सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला. सेंद्रिय खताच्या वापराकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होऊन, पिकाच्या उत्पादन आणि प्रतीवर झाला. अधिक उत्पादनाच्या आशेने पोटी ऊस, कापूस, गहू, केळी, भाजीपाला पिके आणि फळबागांमध्ये शिफारशीपेक्षा अधिक रासायनिक खतांचा व पाण्याचा वापर झाला. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली. तसेच जमिनीची रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणवता कमी होत गेली. त्यातच महाराष्ट्रातील उष्ण हवामानामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे. सध्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२ ते ०.५ % इतके दिसून येते. या समस्येवर मात करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करणे हाच पर्याय उपलब्ध आहे.  सातत्याने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिके वर्षानुवर्ष त्याच जमिनीत घेतली गेली. परिणामी रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढला. रोग, किडींच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा वापर वाढला. अनेक वेळा नियंत्रणासाठी एकाच प्रकारच्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा वापर वाढला. परिणामी रोग, किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढत गेली. यासाठी सेंद्रिय पद्धतीने पीक संरक्षणाच्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील.  सेंद्रिय अन्नद्रव्य व्यवस्थापन

  • सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोस्टखत, कोंबडीखत, हिवालीचेखत, गांडूळखत या भरखतांचा आणि अखाद्य पेंडींचा जोरखत म्हणून वापर करता येतो. 
  •     उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझेटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलियम, अॅसीटोबॅक्टर, पीएसबी या जिवाणू खतांचा बीजप्रक्रिया व पूरक खते म्हणून वापर करावा. यामुळे उत्पादनात ८ ते १० % वाढ होते. 
  •     सेंद्रिय शेतीत पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. त्याचबरोबर बायोडायनॅमिक, जीवामृत, बीजामृत, पंचगव्य अशा निविष्ठांचा वापर करता येतो. या निविष्ठा तयार करण्याची पद्धती समजून घेऊ. 
  •  बीजामृत (बीज प्रकियेसाठी)

  • बीजामृत तयार करण्यासाठी गाईचे शेण १ किलो + गोमूत्र १ लिटर + दूध १०० मिली + चुना ५० ग्रॅम + पोयटा माती ५० ग्रॅम + ट्रायकोडर्मा व्हिरिडी १०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाणी.
  • वापर : हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरता येते.
  •  जीवामृत

  • शेण १० किलो (गाय अथवा बैलाचे) + १० लिटर गोमूत्र + २ किलो गूळ + बेसनपीठ २ किलो + १ किलो वनातील माती + २०० लिटर पाणी.
  • वापर : हे मिश्रण प्लॅस्टिक ड्रममध्ये ५-७ दिवस आंबू द्यावे. दररोज ३ वेळा मिश्रण ढवळून घेणे. सदरचे मिश्रण १ एकर क्षेत्रासाठी वापरता येते.
  • अमृतपाणी

  • गाईचे शेण १० किलो + गाईचे तूप २५० ग्रॅम + गूळ ५०० ग्रॅम + २०० लिटर पाणी.
  • वापर : हे तयार केलेले अमृत पाणी ३० दिवसांच्या अंतराने एक एकर क्षेत्रासाठी पाण्याद्वारे द्यावे. त्यानंतर एक महिन्याने झाडाच्या दाेन ओळींमध्ये पाण्यातून देता येते.
  •  दशपर्णी अर्क

  • १० वनस्पतींचा २०-२५ किलो पाला + २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा + २५० ग्रॅम लसूण + ३ किलो शेण + ५ लिटर गोमूत्र + २०० लिटर पाणी.
  • वापर : हे मिश्रण एक महिना आंबू द्यावे. या दरम्यान दररोज तीन वेळा ढवळत राहावे. या द्रावणाची पिकावर फवारणी करता येते. फवारणीसाठी २०० लिटर अर्कामधून गाळून ५ लिटर दशपर्णी अर्क  + गोमूत्र प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. विविध किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. 
  •   संजीवक

  • गाईचे शेण १०० किलो + गोमूत्र  २०० लिटर + ५०० ग्रॅम गूळ + ३०० लिटर पाणी.
  • वापर : हे मिश्रण प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये १० दिवस आंबू द्यावे. द्रावणाच्या २० पट पाणी मिसळून १ एकर क्षेत्रावर पाण्यावाटे पिकास द्यावे. 
  •  पंचगव्य
  • शेण ५ किलो + नारळाचे पाणी /गोमूत्र ३ लिटर + गाईचे  दूध २ किलो.
  • वापर : हे मिश्रण ७ दिवस आंबू द्यावे. या दरम्यान दिवसातून २ वेळा हलवावे. तयार झालेले पंचगव्य १० लिटर पाण्यात मिसळून  जमिनीवर पाण्यावाटे सोडावे. एकरी २० लिटर पंचगव्य वापरता येते.
  •  टीप : तज्ज्ञांच्या शिफारशी नुसार निविष्ठांचा वापर करावा. शिफारस ः 

  • सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन आणि कांदा लागवड
  • सोयाबीन (खरीप) कांदा (रब्बी) या पीक पद्धतीमध्ये  सेंद्रिय शेतीसाठी नत्र व स्फुरदयुक्त जिवाणू खताची बीजप्रक्रिया करून, सोयाबीन पिकास हेक्टरी ५० किलो आणि कांदा पिकास १०० किलो नत्राची मात्रा प्रत्येकी एक तृतीयांश नत्र अन्नद्रव्य आधारित प्रमाणानुसार शेणखत, गांडूळखत आणि निंबोळी पेंड या सेंद्रिय खताद्वारे देण्याची करण्यात शिफारस आली आहे. ​
  • १. सेंद्रिय खताची मात्रा (कि/हे.)

    सेंद्रिय खताची मात्रा सोयाबीन कांदा
    शेणखत २५०० कि/हे. ५००० कि/हे.   
    गांडूळखत १००० कि/हे. २००० कि/हे.
    निंबोळी पेंड ४०० कि/हे. ८०० कि/हे.
    रायझोबियम (जॅपोनिकम.) २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे --
    पीएसबी २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे ४ किलो २५ किलो शेणखतासोबत
    अॅझेटोबॅक्टर -- ४ किलो २५ किलो शेणखतासोबत

    जैविक नियंत्रण         सोयाबीन    

  • पाने खाणारी अळी (शा. नाव : Spodoptera litura.)
  •     पेरणीनंतर ४५ - ५० दिवसांनी एस. एल. एन. पी. व्ही. १० मिलि. प्रति १० लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी
  • ​पेरणीनंतर ७० - ७५ दिवसांनी न्यूमोरिया रिलेयी जैविक बुरशी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून दुसरी फवारणी करावी.
  • कांदा

  • फूलकिडे (शा. नाव : Bemisia tabaci.)
  •     लागवडीनंतर ३०-३५ दिवसांनी व्हर्टिसिलीयम लेकॅनी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी.       
  •     लागवडीनंतर ५५-६० दिवसांनी मेटॅरायझीम ॲनासोप्ली ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून दुसरी फवारणी करावी. 
  • जांभळा करपा (शा. नाव : Alternaria porri.)
  • लागवडीनंतर जांभळा करपा दिसून येताच नियंत्रणासाठी सुडोमोनास फ्ल्युरोसन्स ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.  
  • ः अंबादास मेहेत्रे (आचार्य पदवी विद्यार्थी), ९५४५३२३९०६  ः डॉ. उल्हास सुर्वे, ९८२२६०६५११ (कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com