ऊस पाचटातून वाढवा सेंद्रिय घटक

increase organic matter by using sugarcane trash
increase organic matter by using sugarcane trash

ऊस पाचटापासून कंपोस्ट खत तयार करता येते. ऊस तुटून गेल्यानंतर त्याच्या वजनाच्या १० ते १२ टक्के पाचट मिळते. एकरी ५० टन ऊस निघाल्यास त्यापासून ५ ते ६ टन पाचट मिळते. अशा पाचटापासून शेतामध्येच सेंद्रिय खत तयार केले तर जमीन सुपीकतेसाठी फायदेशीर ठरते. 

  • उसाच्या चांगल्या वाळलेल्या पाचटामध्ये शर्करायुक्त पदार्थ, अमिनो ॲसिड, ऑरगॅनिक ॲसिड, फेनॉलिक ॲसिडसारख्या पाण्यात सहज विरघळणाऱ्या पदार्थाचे २० टक्के प्रमाण असते. राहिलेला ८० टक्के भाग हा सेल्यूलोज, हेमी सेल्यूलोज, लिग्निन, नत्र, स्फुरद, पालाश अशा घटकांचा असतो. हे पदार्थ पाण्यात सहज विरघळणारे नाहीत.   
  • पाचटाचा पाण्यात अर्क केला तर ऑरगॅनिक ॲसिड आणि फेनॉलिक ॲसिडमुळे त्याचा सामू ४.३ म्हणजेच ॲसिडिक होतो. उष्ण पाण्यात पाचटाच्या चोथ्याचा अर्क केला तर त्यातील नत्राचे प्रमाण २८ टक्क्यांनी, स्फुरद ४२ टक्क्यांनी आणि पालाशचे प्रमाण ५६ टक्यांनी कमी होते. 
  • शेतामध्ये पाचटाचे व्यवस्थापन 

  • उसाचे पाचटाचे ढीग करून किंवा खड्ड्यामध्ये साठवून त्याचे कंपोस्ट करण्याची पद्धत शेतकरी सहसा वापरत नाही. शेतामध्ये पाचट कुजण्याची क्रिया ही पाचट अखंड ठेवले आहे की, तुकडे केले आहेत, पाचटाच्या थराभोवती आर्द्रता किती आहे आणि पाचटाच्या थरात उष्ण तापमान किती आहे यावर अवलंबून असते.   
  • ट्रॅक्टरचलित पालाकुट्टी करण्याचे यंत्र उपलब्ध झाले आहे. अशी पालाकुट्टी किंवा अखंड पाचट प्रत्येक सरीत किंवा एक सरी आड दाबावे. त्यावर एकरी एक लिटर कंपोस्टिंग जिवाणू संवर्धक प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.   
  • पाचटावर एकरी एक गोणी युरिया आणि एक गोणी सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. यामुळे पाचट कुजण्यास मदत होते. उपयुक्त जिवाणूंना नत्र आणि स्फुरद ही अन्नद्रव्ये मिळतात.   
  • सरीमध्ये जमेल त्या प्रमाणे पाणी द्यावे. पाचटावर माती पडेल या पद्धतीने बगला फोडाव्यात. माती आणि पाण्यामुळे आर्द्रता वाढते. पाचटामध्ये उष्णता असते. यामुळे उपयुक्त जिवाणूंचे कार्य चांगले होते. जिवाणूंना कार्बन, नाट्रोजन, सल्फर मिळते. पाचट कुजण्याची क्रिया जलद होते.   
  • साधारणपणे चार ते पाच महिन्यात प्रत्येक सरी कुजलेल्या पाचटाच्या कंपोस्टने भरून जाते.   
  • उन्हाळ्यात पाचट आच्छादनामुळे पाणी बचत आणि तण नियंत्रण होते. त्यामुळे पाचट विघटनाची क्रिया जेवढी मंद गतीने होईल तेवढे फायद्याचे ठरते. पावसाळ्याची सुरवात होताच पाचटावर ट्रायकोडर्मा आणि सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा देऊन पाचट विघटनाची क्रिया वाढविता येते. 
  • पाचटाचे विघटन 

  • पाचटामध्ये असलेले जलविद्राव्य‌ घटक जिवाणूंमुळे लगेच विघटित होतात. अविद्राव्य घटक मात्र सावकाश कुजतात.   
  • सुरवातीला पाचटातील नत्र, स्फुरद, पालाश अशी अन्नद्रव्ये वाहून जातात. त्यामुळे वजनात घट येते. त्यानंतर जिवाणूंच्या प्रक्रियेवेळी सेल्यूलोज, हेमि सेल्युलोज हे घटक कुजण्यास सुरवात होते. पाचटाचा सी:एन रेशो ९५ ते १२५:१ असा असतो. त्यामुळे कार्बन सहज मिळतो. बाहेरून नत्रयुक्त खते (युरिया) दिली तर सेल्युलोजसारख्या घटकांचे सावकाश विघटन होते. अन्नद्रव्ये धीम्या गतीने उपलब्ध होत राहतात.   
  • सुरवातीच्या दीड महिन्याच्या काळात पाचटातून ३० टक्के नत्र मिळते. पुढे साधारणपणे एक वर्षापर्यंत प्रति किलो पाचटापासून ३.५ ते ३.७ ग्रॅम नत्र मिळत राहाते. साधारणपणे ४ ते ४.५ महिन्यात पाचट कुजते. पूर्ण पाचट कुजण्यासाठी ९ ते १० महिने लागतात. ताज्या पाचटाचा सी:एन रेशो ९५:१ असतो. पूर्णपणे कुजल्यावर २०:१ इतका कमी होतो. शेतातच पाचट कुजवून तयार झालेले कंपोस्ट खत काळ तपकिरी रंगाचे असते. त्याला मातीसारखा वास येतो. याचा सामू सातच्या दरम्यान असतो. या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 
  • पाचटातील विविध घटकांचे प्रमाण

    घटक     प्रमाण 
    अ) सेंद्रिय पदार्थ 
    शर्करायुक्त पदार्थ     १.२ टक्के 
    सेल्यूलोज     ४२ ते ४६ टक्के 
    लिग्निन      २३ ते २७ टक्के
    ब) असेंद्रिय पदार्थ 
    राख     ६.९ टक्के 
    क) मुख्य अन्नद्रव्ये 
    नत्र     ०.४५ ते ०.५० टक्के 
    स्फुरद      ०.१२ ते ०.१५ टक्के
    पालाश    ०.५२ ते ०.६० टक्के
    कॅल्शिअम      ०.४२ ते ०.५४ टक्के
    मॅग्नेशिअम     ०.१२ टक्के
    सिलिकॉन      ३.४० ते ६.७० टक्के
    ड) सूक्ष्म अन्नद्रव्ये 
    कॉपर    १६.८ पीपीएम 
    झिंक     २५.७ पीपीएम 
    मॅंगेनीज    २३६ पीपीएम 
    लोह      २०४५ पीपीएम

    संपर्कः डॉ. अशोक पिसाळ, ९९२१२२८००७  (विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com