`सूक्ष्म सिंचनातून सिंचन क्षेत्र, उत्पादनात वाढ शक्य`

increase production, Irrigation area through micro irrigation
increase production, Irrigation area through micro irrigation

नांदेड : ‘‘पाणी वापरताना चंगळपणा टाळून काटकसरीची जीवनशैली आत्मसात करावी. पारंपरिक प्रवाही पध्दत बंद करून आधुनिक ठिबक, तुषार आदी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा सिंचनासाठी अंगीकार केल्यास सिंचन क्षेत्र, शेतमालाच्या उत्पादनात वाढ होईल. त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे,’’ असा सूर सिंचन दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांमध्ये सिंचनविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांचा स्मृतिदिन सिंचन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त बुधवारी (ता. २६) नांदेड येथे विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, महाजन, उप्पलवाड, सूर्यवंशी, प्रा. संतोष देवराये, डॉ. बालाजी कोंपलवार, डॉ. शिवाजी शिंदे, प्रगतिशील शेतकरी नीलेश देशमुख, रामराव कदम, रंगनाथराव कदम, गोपळ पाटील इजळीकर, राम कदम, भाग्यश्री कदम आदी उपस्थित होते.

सब्बीनवार म्हणाले, ‘‘काटकसरीने पाणी वापराची आवश्यकता आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची गरज आहे.’’ 

पहिल्या सत्रात देवराये यांनी (कै.) शंकरराव चव्हाण यांचे मराठवाड्यातील जायकवाडी, विष्णुपुरी, पैनगंगा आदी पाटबंधारे प्रकल्पाच्या निर्मितीतील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये लाभधारक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने सिंचन पूर्व शेती आणि सिंचन नंतरच्या शेतीबद्दल सविस्तर चर्चा झाली. 

सिंचनाचे फायदे, समृद्धी, ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक बदल, यावर शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सूक्ष्म सिंचनाचा वापर करून उत्पादन वाढ शक्य आहे. शेतमालावर प्रक्रिया केल्यास अधिक फायदा होतो, असेही या वेळी सांगण्यात आले. 

तिसऱ्या सत्रात भविष्यातील सिंचनविषयक आव्हानांची  सविस्तर उकल करण्यात आली. प्रा. डॉ. शिंदे आणि प्रा. डॉ. कोंपलवार यांनी याबाबत काळानुसार पीक पद्धती राहणीमान, आहाराच्या पद्धती बदलण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी, शेतीसाठी उद्योगासाठी नसून दैनंदिन वापराच्या जवळपास ८० टक्के वस्तूंची निर्मिती पाण्यापासून होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एस. डी. पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com