धान खरेदी केंद्र वाढवा; छत्रपती शेतकरी संघटनेची मागणी

Increase the shopping center; Demand for Chhatrapati shetkari sangatana
Increase the shopping center; Demand for Chhatrapati shetkari sangatana

भंडारा : मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झालेल्या जिल्ह्यात या वर्षी अपुऱ्या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेत जिल्ह्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, त्यासोबतच इतर शेतीविषयक समस्यांचे निराकरण करावे आदीचे निवेदन छत्रपती शेतकरी संघटनेतर्फे आमदारांना देण्यात आले.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, आशिष जयस्वाल, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली. जिल्ह्यातील शेतीविषयक समस्यांच्या सोडवणूकीची मागणी त्यांच्याकडे केली.

संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्‍कम मिळाली असली, तरी बॅंका ही रक्‍कम कर्ज खात्यात वळती करीत आहेत. परिणामी, या रक्कमेचा विनियोग देणेदारांची देणी देण्यासाठी करणे शक्‍य होत नाही. त्यांना पुन्हा खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.`` 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमा रक्‍कमेतून कोणत्याही प्रकारची वसुली न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही बॅंकांकडून कर्ज खात्यात पैसे वळते करण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. 

धानाच्या दरात २५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे शासकीय केंद्रावरच धान विक्रीकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल वाढीस लागला आहे. परंतु केद्रांची संख्या मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याची दखल घेत धान विक्री केंद्राच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली.

धानाचे वजन करताना सदोष वजनकाट्यांद्वारे शेतकऱ्यांच्या लुबाडणुकीचे प्रकार काही ठिकाणी घडत आहेत. जलसंवर्धन व उपसा सिंचन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करचखेडा उपसा सिंचन, धारगाव टप्पा दोनचे तसेच सालेभाटा उपसा सिंचनचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. धानाला ७०० रुपये बोनस, दोन लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल संघटनेने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आभार मानले.

या वेळी संघटनेचे अशोक पटले, संदीप क्षीरसागर, नुतन ठाकरे, नंदु काडगावे, धनलाल बोपचे, मोरेश्‍वर वंजारी, प्रमोद कापगते, योगेश रहांगडाले, कृष्णा खंडाईत, सहदेव मांढरे, राकेश भोस्कर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com