अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढ

अंदरसूल (ता. येवला) उपबाजार आवारात कांदाआवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मजूर टंचाई असल्याने नियोजन बिघडले. तर दरात थोडी घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले.
Increase in summer onion imports in Andarsul sub-market
Increase in summer onion imports in Andarsul sub-market

नाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज २९ जून ते ८ जुलै दरम्यान म्हणून बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी इतरत्र जावे लागत आहे. अंदरसूल (ता. येवला) उपबाजार आवार जवळ असल्याने येथे आवक वाढली. मजूर टंचाई असल्याने नियोजन बिघडले. तर दरात थोडी घसरण होत असल्याचे पाहायला मिळाले.

वैजापूर बाजार समितीमध्ये सरासरी ७ हजार क्विंटल आवक होत असते. मात्र, आवारात एका कांदा व्यापाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने हमाल, मापारी यांच्या मागणीनुसार बाजार समितीचे कामकाज बंद करण्यात आले आहे. परिणामी, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजारामध्ये ही आवक वळाली आहे. या ठिकाणी १५ च्या आसपास व्यापारी कार्यरत आहेत. तर दैनंदिन होणारी आवक ही ४००० क्विंटलच्या आसपास असते.

वैजापूर तालुक्यातील काही शेतकरी नगर जिल्ह्यातील घोडेगाव बाजारास दर चांगले असल्याने पसंदी देतात. मात्र, गोणी पद्धतीने लिलाव असल्याने ते गणित जमत नसल्याने खुल्या पद्धतीने लिलावसाठी अंदरसूल येथे पसंदी देत आहेत.

वैजापूर बाजार बंद झाल्याने गत सप्ताहात शुक्रवारी (ता. ३) १५४०४ क्विंटल इतकी आवक झाल्याने नियोजनात गोंधळ निर्माण झाला. जुलैच्या सुरुवातीला आषाढी एकादशी (ता. १), गुरुवार (ता. २) आठवडे बाजार व रविवारी (ता. ५) बाजार समितीचे कामकाज बंद होते. त्यामुळे आवक वाढल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

आवकेची स्थिती
तारीख आवक किमान कमाल सरासरी
२७ जून ४३२० २०० ८२६ ७००
२९ जून ९५८५ २०० ८०० ७००
३० जून ६१७८ २०० ८३७ ७२५
३ जुलै १५४०४ २०० ८१७ ७०१
४ जुलै ५५६५ २०० ७६९ ६५०
६ जुलै ११८३४ २०० ७७६ ६५०

वैजापूर (जि. औरंगाबाद) बाजार व कोपरगाव (जि. नगर) बाजार समिती व शिरसगाव उपबाजार बंद असल्याने पर्यायी अंदरसुल येथे आवक वाढत आहे. मजूर कमी असल्याने अडचणी आल्या. - सचिन पैठणकर, कांदा व्यापारी, अंदरसूल उपबाजार

शेजारील बाजार समित्यांचे काम चालू बंद होत आहे. त्यामुळे बाजार समित्यांचे कामकाज बिघडते. शासनाने बाजार सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न करावे. - मकरंद सोनवणे, सभापती, अंदरसूल बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com