खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ
खानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ

जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. अनेक मोठ्या गावांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कुठलेही पाण्याचे स्रोत नाहीत, अशा गावांमधून टॅंकरसंबंधीचे प्रस्ताव वाढू लागले आहेत. सद्यःस्थितीत खानदेशात सुमारे ५८ टॅंकर सुरू असल्याची माहिती आहे. 

जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्येही यंदा टंचाई स्थिती आहे. शिवारात व गावात पाण्याची समस्या वाढत असल्याने शेतकरी, ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्यासंबंधी अडचणी येत असल्याने ग्रामपंचायतींनी तात्पुरत्या योजनांची मागणी केली. सुमारे ४३ गावांमध्ये तात्पुरत्या योजनांबाबत काम झाले. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तात्पुरत्या योजनांसाठी सर्वत्र कार्यरत आहे. परंतु भूगर्भात पाणी नसल्याने विहीर खोलीकरण, कूपनलिका तयार करूनही पाणी मिळत नसल्याची अडचण आहे. यामुळे टॅंकरशिवाय पर्याय नसल्याची स्थिती अमळनेर, पारोळा, जामनेर व बोदवडमधील काही गावांमध्ये आहे. 

जळगाव जिल्ह्यात २८ टॅंकर मागील आठवड्यापर्यंत सुरू होते. त्यांची संख्या पुढे वाढेल. कारण टॅंकरचे प्रस्ताव अमळनेर व पारोळामधील काही गावांमधून आले आहेत. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्‍यात पाण्याची समस्या तीव्र होत आहे. तापी काठावरच्या गावांत स्थिती बरी असली तरी, पांझरा काठावरील २३ गावांमध्ये पाण्याचे संकट आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती प्रशासनाने मंजूर केली नाही. 

धुळे, नंदुरबारही तहानले

धुळे जिल्ह्यात सुमारे १३, नंदुरबारातही सुमारे १७ टॅंकर सुरू असल्याची माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग व नंदुरबार तालुक्‍यात टंचाई वाढली आहे. नंदुरबारमधील ३१ गावांमध्ये टंचाई स्थिती तीव्र असून, त्यात अगदी नंदुरबार शहरापासून नजीक असलेल्या पळाशी, धमडाई, कोळदे, बामडोद, लहान शहादे, भालेर, रनाळे, तिसी, नाशिंदा आदी गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com