सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या संकटात वाढ

Increase in water shortage crisis in Solapur district
Increase in water shortage crisis in Solapur district

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट वाढले असून, पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्ह्यात सध्या १० गावे आणि ७२ वस्त्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय ११ खासगी विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या ३८ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढते आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच या झळा बसायला सुरवात झाली आहे. पण त्याची तीव्रता वाटत नव्हती, आता मात्र ती जाणवत आहे. डिसेंबर महिन्यातच जिल्ह्यात ८ टँकरद्वारे १० गावे आणि ७२ वाड्यावस्त्यांवरील १७ हजार ७५८ लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरबरोबरच जिल्ह्यात ११ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पाण्याची तीव्रता वाढत जाताना येत्या जानेवारी महिन्यात टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाच्या उपाययोजना करण्यात शासनाकडून अद्यापही ठोस पावले उचलली जात नसली, तरी नियम, अटी आणि निकषाचा नुसता डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे उपाययोजनांना उशीर होतो आहे.टँकर मंजुरीचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे. मागणी आल्यानंतर तपासणी करून तत्काळ टँकर देण्याची सोय करण्यात आली आहे. पण त्यातही चालढकल होतेच आहे. सध्या माढा तालुक्यातील जाधववाडी आणि बैरागवाडी दोन्ही गावांसाठी एक, तुळसी, पडसाळी गावांना स्वतंत्र टँकर आहेत. करमाळा तालुक्यातील फिसरे व शेलगाव या गावासाठी एक आणि पांडे, गोटी या गावांना स्वतंत्र टँकर, सांगोला तालुक्यातील गळवेवाडी, इटके प्रत्येकी एक असे एकूण ८ टँकर सुरू आहेत. 

चारा-पाण्याकडे दुर्लक्षच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत असली, तरी जनावरांच्या चारा-पाण्यासाठी मात्र अद्यापही काहीच पावले उचलली गेली नाहीत. मंगळवेढा, सांगोला, उत्तर सोलापूर, अक्कलकोट भागातून शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होते आहे. पण त्याबाबत अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com