भ्रष्टाचार लपवण्यासाठी वाढीव बिले  : प्रताप होगाडे 

शेतकऱ्यांना दिलेली ९९ टक्के वीजबिले ही खोटी आणि दुप्पट आहेत. शेतकऱ्यांची दाखवलेली थकबाकी खोटीच आहे. त्यामुळे बिले दुरुस्त होणार नाहीत, तोपर्यंत थकबाकी शून्यावर आणणारी योजना यशस्वी होणार नाही. वीज गळती, चोऱ्या आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी शेतकऱ्यांची बिले वाढवली आहेत.
Increased bills to cover up corruption: Pratap Hogade
Increased bills to cover up corruption: Pratap Hogade

सांगली : शेतकऱ्यांना दिलेली ९९ टक्के वीजबिले ही खोटी आणि दुप्पट आहेत. शेतकऱ्यांची दाखवलेली थकबाकी खोटीच आहे. त्यामुळे बिले दुरुस्त होणार नाहीत, तोपर्यंत थकबाकी शून्यावर आणणारी योजना यशस्वी होणार नाही. वीज गळती, चोऱ्या आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी शेतकऱ्यांची बिले वाढवली आहेत. त्यामुळे बिले दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने तक्रार अर्ज दाखल करावेत, असे आवाहन वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी येथे केले. 

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, जिल्हा इरिगेशन फेडरेशन आणि अखिल भारतीय वीरशैव माळी समाजोन्नती परिषद यांच्या वतीने माळी मंगल कार्यालयात शेतकरी वीज ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. वीज ग्राहक संघटनेचे मुकुंद माळी, जाविद मोमीन, विक्रांत पाटील, माळी समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष विजय धुळबुळू, एम. के. माळी, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अॅड. के. डी. शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, प्रदीप माने, पुजारी आदी उपस्थित होते.  होगाडे म्हणाले, ‘‘बोगस वीज थकबाकी व खोट्या बिलांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड ओझे आहे. सध्या खोट्या थकबाकीपोटी वीज जोडणी तोडण्याची मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी डीपी बंद केले जातात. अधिवेशनामुळे वीज तोडणीची मोहीम थंडावली होती. आता ती पुन्हा सुरू होईल. त्यामुळे आतापासूनच सावध राहा. कायद्यानुसार १५ दिवसांची लेखी किंवा मोबाइलवर संदेशाद्वारे नोटीस दिल्याशिवाय वीज तोडता येत नाही. सध्या ९९ टक्के ग्राहकांना नोटिसाच दिल्या जात नाही. तसेच थकबाकीबाबत वाद असेल, तर निकाल लागेपर्यंत वीज तोडता येत नाही. वीजबिल दुरुस्तीसाठी तक्रार नोंदवली असेल, तर बिल दुरुस्त होत नाही तोपर्यंत वीज तोडता येत नाही. तसेच वीजबिलासाठी डीपी बंद करता येत नाही. डीपीवरील एका जरी ग्राहकाने शंभर टक्के बिल भरले तरी डीपी बंद करता येत नाही.’’ 

होगाडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांची ९९ टक्के वीजबिले बोगस आहेत. थकबाकी वसुलीसाठी २००४, २०१४, २०१७ व २०२०मध्ये योजना आल्या. परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांच्या बिलाकडे प्रामाणिकपणे बघून दुरुस्त करण्याचे काम केले नाही. त्यामुळे जोपर्यंत बिले दुरुस्त होणार नाहीत, तोपर्यंत योजना वाया जाईल. वीज गळती, चोऱ्या, भ्रष्टाचार लपवण्यासाठी शेतकऱ्यांची बिले वाढवली जात आहेत. वीज गळती कमी दाखवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली सरकारला कंपनी लुबाडत आहे. वीज चोऱ्यांना संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट बिले जातात. आता शेतकऱ्यांनी बिले दुरुस्तीसाठी तक्रारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल करावेत.’’  एम. के. माळी, फराटे, अॅड. शिंदे, विजय धुळबुळू, पुजारी, प्रदीप माने आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याच्या शेवटी होगाडे यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com