भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच

भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप प्रतिक्षाच

भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंडअळीप्रति निष्प्रभ झाले आहे. शेतकरी आणि कापूस उद्योगाला ‘बीजी थ्री’ किंवा तत्सम तंत्रज्ञानाची प्रतीक्षा आहे. अमेरिका, आॅस्ट्रेलियासारख्या कापूस उत्पादक देशांमध्ये असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. अळीवर्गीय किडी, तणनाशके, सूत्रकृमी आदींना प्रतिकारक असे विविध गुणधर्म एकाच वाणात आणून पीक संरक्षणाचे संपूर्ण पॅकेजच देण्याचे दावे किंवा प्रयत्न नव्या तंत्रज्ञानातून केला जात आहे.

सन २००२ मध्ये ‘बीटी काॅटन’च्या रूपाने भारतीय शेतकऱ्यांना जैवतंत्रज्ञानाचे (जीएम) दरवाजे खुले झाले. त्या वेळी बोंड अळ्यांनी बाजारातील बहुतेक सर्व कीटकनाशकांप्रति प्रतिकारक्षमता विकसित करून त्यांना पुरते नामोहरम केले होते. वारेमाप फवारण्या आणि खर्च यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला होता. अशावेळी संकरित बीटी कपाशी तंत्रज्ञानाचा हुकमी पर्याय त्याला मिळाला. हळूहळू ‘नाॅन बीटी’ कपाशीला मागे सारून बीटी कपाशीखालील भारतातील क्षेत्र ९० टक्क्यांपर्यंत पोचले. काही वर्षे बीजी वन (बोलगार्ड) वाणाने हुकमत गाजवली. बोंड अळ्या त्यालाही प्रतिकारक्षम होण्याचा धोका तयार झाला. मग कंपन्यांनी हुशारीने बीजी टू वाण बाजारपेठेत दाखल केले. त्यानेही २०१५, २०१६ पर्यंत आपला डंका वाजवला. गुलाबी बोंड अळीपुढे त्यानेही नांगी टाकली. आज ते पूर्ण निष्प्रभ होऊन नावालाच ‘बीटी’ वाण उरले आहे. शेतकरी आणि समस्त कापूस उद्योगाला आता प्रतीक्षा आहे केवळ त्यापुढील तंत्राची.

‘बीजी थ्री’ वा तत्सम तंत्रज्ञान काय आहे? केवळ ‘बीजी’ म्हणण्यापेक्षा बीजी व तत्सम तंत्र असे म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. कारण बोलगार्ड हे नाव केवळ मोन्सॅन्टोपुरतेच मर्यादित आहे. विविध बोंड अळ्या व त्यातही अमेरिकी बोंड अळी (हेलिकोव्हर्पा) ही भारतासह जगातील प्रमुुख कापूस उत्पादक देशांतील सर्वांत भयंकर कीड आहे. परदेशांत शेतकऱ्यांकडील कापसाचे क्षेत्रही विस्तीर्ण असल्याने रूंद व गवती पानांच्या तणांची समस्याही मोठी आहे. कीड किंवा तणे दोन्हीही घटक रसायनांप्रति प्रतिकारक होत आहेत. त्यामुळे जीएम तंत्रज्ञान दीर्घकाळ चालावे यावर लक्ष केंद्रित करून कापूस वाणांची निर्मिती केली जात आहे. संशोधन, चाचण्या व शेतकऱ्यांसाठी उपलब्धता अशा विविध टप्प्यांवर नवे तंत्रज्ञान आहे. अमेरिका व आॅस्ट्रेलियातील कापूस उत्पादक त्यातील काहींचा लाभ घेऊ लागले आहेत.

तंत्रज्ञान- ‘बीजी वन ते बीजी थ्री’

  • बॅसिलस थुरिनजीयांसीस (बीटी) या मातीतील जिवाणूच्या जनुकांचा वापर
  • हा जिवाणू स्फटिकरूपी (क्रिस्टल) विषारी प्रथिनांची निर्मिती करतो. ज्यामुळे अळ्या मरतात.
  • या क्रिस्टल नावावरूनच ‘क्राय वन, टू, थ्री, फोर तसेच ‘व्हीआयपी’ अादी विविध गुणधर्मांच्या प्रथिनांचा शोध घेतला जात अाहे. त्यांचे पिकात प्रत्यारोपण करण्याचे काम जगभरात खाजगी व सार्वजनिक संस्थांमध्ये सुरू आहे. विविध कुळातील किडी (उदा. लेपिडोप्टेरा, डिप्टेरा), सूत्रकृमी आदीं विविध किडींच्या नियंत्रणासाठी ही प्रथिने उपयोगी असल्याचे पुढे येत आहे. साहजिकच त्या गुणधर्मांनी युक्त कापूस वाण येत्या काळात दिसून येतील.
  • सध्याचे चित्र बीजी वन-  बीटी जिवाणूचे एक जनुक प्रत्यारोपित- क्राय वन एसी- हे तंत्रज्ञान आता निष्प्रभ हे केवळ बोंड अळ्यांचे नियंत्रण करते. बीजी टू-  बीटी जविाणूची दोन जनुके - क्राय वन एसी व क्राय टू एबी- हे तंत्रज्ञानही निष्प्रभ. हे देखील केवळ बोंड अळ्यांचे नियंत्रण करते.  

    सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान बीजी टू अधिक एचटी

  • भारतात उपलब्ध नाही.
  • बोंड अळ्यांचे नियंत्रण- त्यासाठाी जनुके
  • क्राय वन एसी, क्राय टू एबी
  • तणांचे नियंत्रण- ग्लायफोसेट किंवा ग्लुफोसीनेट तणनाशक यापैकी कोणतेही तणनाशक वापरण्याचा पर्याय
  • केवळ तणांचे नियंत्रण करते. पिकासाठी सुरक्षित.
  • ग्लायफोसेट फवारल्यास त्याला प्रतिकार करण्याचे काम हे प्रथिन करते.  यात मातीतील जिवाणूतील ‘सीपी४ इपीएसपीएस’ हे सुधारित प्रथिन कापसात प्रत्यारोपित.
  • बीजी थ्री  

  • बीजी टूमधील दोन जनुकांसह व्हीआयपी ३ ए या तिसऱ्या जनुकाचा समावेश
  •  म्हणजेच कपाशीचे झाड तीन जनुकांसह बोंड अळ्यांशी लढते.
  • किडींवर तीन प्रकारे हल्ला करण्याची कार्यपद्धती
  • बीटी वाणाविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित होऊ नये हा उद्देश  
  • बीजी थ्री किंवा तत्सम- ‘मोस्ट ॲडव्हान्स’ यापूर्वीच्या जीएम वाणात एखादाच गुणधर्म असायचा. म्हणजे एकतर ते केवळ अळ्यांचे नियंत्रण करायचे किंवा तणनाशकाला सहनशील असायचे. आता हा ट्रेंड बदलला आहे. शेतकऱ्यांना एकाच वाणात पीक संरक्षणाचे पॅकेज देण्यात येत आहे.

  • बीजी टूमधील क्राय वन एसी अधिक क्राय टू एबी अधिक व्हीआयपी ३ ए
  • वेगळ्या जनुकांचा पर्याय
  •  किंवा

  • क्राय वन एबी अधिक क्राय टू एई
  • अधिक व्हीआयपी थ्रीए १९
  • (वेगळ्या जनुकांचा पर्याय)  
  • लक्ष्य किडी
  • हेलिकोव्हर्पा
  • गुलाबी बोंड अळी
  • लष्करी अळी
  • बीट आर्मीवर्म  
  • तीन तणनाशकांना सहनशील  -
  • ग्लायफोसेट
  • ग्लुफोसीनेट
  • डिकांबा
  • म्हणजे तीनपैकी कोणतेही वापरण्याचा पर्याय
  • उद्देश- तणांतील प्रतिकारता कमी करणे
  • एका तणनाशकाला प्रतिकारक झालेली तणे दुसऱ्या तणनाशकामुळे नियंत्रित व्हावीत. ही तणनाशके अशी.
  •   सूत्रकृमींचे नियंत्रण सूत्रकृमी हे जमिनीखाली मुळांच्या कक्षेत राहात असल्याने त्यांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करणे अवघड असते. त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचा विचार

    विविघ जनुके प्रत्यारोपित करून विकसित केलेले वाण

  • अधिक उत्पादनक्षमतेचे
  • कमी कालावधीचे
  • उच्च दर्जाच्या धाग्यांची प्रत असलेले
  • बीजी थ्री वाणांबाबतचे प्रमुख दावे

  • लावणीपासून ते काढणीपर्यंत दीर्घकाळ किडी व तणांपासून संरक्षण
  • रासायनिक फवारण्यांची संख्या कमी करणारे
  • मित्रकीटकांना सुरक्षित
  • पाणी, माती, हवा या घटकांचे कमी प्रदूषण
  •  पांढऱ्या माशीविरुद्ध लढणारा कापूस रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हीदेखील संकरित बीटी कपाशीतील महत्त्वाची समस्या झाली आहे. त्या अनुषंगाने भारतातील ‘नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटूट’ या संस्थेने सर्वांत उपद्रवी पांढरी माशी या किडीला प्रतिकारक जीएम कापूस वाणाची निर्मिती केल्याचा दावा केला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या चाचण्याही यशस्वीपूर्ण ठरल्याचे संस्था म्हणते. यासंबंधीचे संशोधन ‘नेचर’मध्ये प्रकाशित झाले आहे. विशेष म्हणजे ‘जीएम’ पीक विकसित करताना बहुतांश ठिकाणी ‘बीटी जिवाणू’चा आधार घेतला जात असताना या भारतीय शास्त्रज्ञांनी नेचे (फर्न) वर्गातील खाद्य वनस्पतीतील जनुकाचा (टीएम१२) आधार घेतला आहे. या कापसाचे वाण बाजारपेठेत केव्हा येईल, याबाबत भाष्य करणे कठीण अाहे. मात्र येत्या काळात विविध रसशोषक किडींना प्रतिकारक वाणांच्या निर्मितीसाठी हे संशोधन निश्चितच पथदर्शक ठरणारे आहे.

    ग्लायफोसेटचे वर्चस्व जागतिक बाजारपेठेत ग्लायफोसेट तणनाशक प्रतिकारक जीएम वाणांचे वर्चस्व आहे. त्याला कारणही तसेच आहे. जैवतंत्रज्ञानात जगात आघाडीवरील मोन्सॅन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीचा हा स्वसंशोधीत ‘माॅलीक्यूल’ आहे. साहजिकच त्याचा जगभर व्यापार वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार. पीक व तण असा कोणताही भेद न करता हिरव्या वनस्पतीला समूळ नष्ट करण्याचा गुणधर्म या तणनाशकात आहे. मग ग्लायफोसेट प्रतिकारक जनुक शोधायचा, तो कापूस किंवा अन्य पिकात प्रत्यारोपित करायचा. म्हणजे एकीकडे पीक ग्लायफोसेटला सुरक्षित झाले व दुसरीकडे त्याचा वापरही वाढला, असे हे तंत्र आहे. बायर ही बहुराष्ट्रीय कंपनीदेखील या तंत्राच्या वापरात पिछाडीवर नाही. त्यांच्याकडेही ग्लायफोसेटसारखा स्वसंशोधित बिनानिवडक ग्लुफाॅसीनेट हा ‘माॅलिक्यूल’ आहे. त्याचेही कापूस, सोयाबीन, मोहरी आदींचे जीएम वाण उपलब्ध झाले आहेत. मध्यंतरी भारतात ‘जीएम मोहरी’च्या संशोधनाची मोठी चर्चा घडली त्यात याच तणनाशकाचा समावेश आहे.

    ...आणि गंडांतरही ग्लायफोसेट प्रतिकारक वाणांचा वापर प्रमुख कापूस उत्पादक देशांत होतो. तरीही कर्करोगाचा धोका व पर्यावरणाला बाधा या मुद्द्यांवरून ग्लायफोसेटवर बंदी आणण्याची मोठी आक्रमक मोहीम युरोपीय देशांतील नागरिकांकडून चालविली जात आहे. फ्रान्सनेही नागरिकांच्या बाजूने कौल दिला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये युरोपीय महासंघाने पाच वर्षांसाठी या तणनाशकाच्या पुनर्नोंदणीला संमती दिली. मात्र या निर्णयापर्यंत येण्यासाठी सदस्य देशांची अनुमती, मते अजमवणे, संशोधन अहवाल आदी दिव्यांमधून जाताना युरोपीय महासंघाची कसोटी लागली. आजही ग्लायफोसेटवरून तेथे संघर्ष सुरू आहे.   एकूण जीएम पिके व कापूस- दृष्टिक्षेपात (२०१६ पर्यंत)

  • एकूण जीएम पिकांखालील जागतीक क्षेत्र - १८५. १ दशलक्ष हेक्टर
  • १९९६ मध्ये जगात पहिल्या जीएम पिकाचे व्यावसायिक प्रसारण. त्यानंतर २०१६ पर्यंत तब्बल ११० पटीने जीएम पीक क्षेत्रात वाढ.
  • जीएम पिकांची लागवड करणारे देश- २६
  • कापूस, मका, सोयाबीन आणि कॅनोला ही चार मुख्य पिके
  • यात सोयाबीनखाली सर्वाधिक म्हणजे ९१.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्र.
  • सोयाबीन (७८ टक्के) पाठोपाठ कपाशीचा वाटा ६४ टक्के.
  • एकूण १८५.१ दशलक्ष हेक्टरपैकी ४७ टक्के म्हणजे ८६. ५ दशलक्ष हेक्टरवर तणनाशक सहनशील पिकांची लागवड
  • जीएम पिकांतील आघाडीच्या पाच देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, कॅनडा व भारत यांचा क्रमांक.
  • अमेरिकेचे क्षेत्र ७२. ९ दशलक्ष हेक्टर तर भारताचे १०.८ दशलक्ष हेक्टर. भारतात केवळ एकमेव कापूस व त्यातही केवळ बीटी वाण आहे.
  • स्रोत- ‘आयएसएएए’ संस्था, आकडेवारी २०१६ पर्यंतची
  • संपर्कः मंदार मुंडले - ९८८१३०७२९४

    (लेखक अॅग्रोवन, पुणे येथे संपादकीय विभागात कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com