agriculture news in marathi, India to launches Chandrayan 2 mission for Moon | Agrowon

भारताची चंद्राला पुन्हा गवसणी; चांद्रयान-२ची अवकाशात यशस्वी झेप (सविस्तर)

वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताच्या चांद्रयान-२ ने सोमवार  (ता. २२) दुपारी २.४३ मिनिटांनी अवकाशात यशस्वी झेप घेतल्यानंतर देशभर एकच जल्लोष झाला. भारताने दुसऱ्यांदा चंद्राला गवसणी घातली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने मानाचा तुरा रोवला आहे.  'बाहुबली' म्हणजेच, जीएसएलव्ही एमके-३ हा प्रक्षेपक भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या 'चांद्रयाना'ला अवकाशात कक्षेत सोडणार आहे.

श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताच्या चांद्रयान-२ ने सोमवार  (ता. २२) दुपारी २.४३ मिनिटांनी अवकाशात यशस्वी झेप घेतल्यानंतर देशभर एकच जल्लोष झाला. भारताने दुसऱ्यांदा चंद्राला गवसणी घातली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने मानाचा तुरा रोवला आहे.  'बाहुबली' म्हणजेच, जीएसएलव्ही एमके-३ हा प्रक्षेपक भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या 'चांद्रयाना'ला अवकाशात कक्षेत सोडणार आहे.

या मोहिमेद्वारे चंद्राच्या आतापर्यंत संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवून अभ्यास केला जाणार आहे. येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण केले गेल. प्रक्षेपणानंतर हळूहळू कक्षा वाढवत यानातील "विक्रम' लॅंडर ५४ दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. यानातून "प्रग्यान' ही बग्गी बाहेर येऊन चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. "इस्रो'ची ही आतापर्यंतची सर्वांत महत्त्वाची मोहीम मानली जात असून, ती यशस्वी झाल्यास चंद्राला "स्पर्श' करणारा भारत चौथा देश असेल. आतापर्यंत ही कामगिरी अमेरिका, रशिया आणि चीनने साध्य केली आहे. "चांद्रयान-२' हा भारताच्या तांत्रिक क्षमतेचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

यांनी सांभाळली "चांद्रयान-२'ची धुरा
चांद्रयान-२ या मोहिमेची धुरा दोन महिलांच्या हाती आहे. एम. वनिता या प्रकल्प संचालक (प्रोजेक्‍ट डायरेक्‍टर) आहेत, तर रितू करिधल या मिशन डायरेक्‍टर आहेत.
"आम्ही महिला व पुरुष असा भेदभाव करत नाही. इस्रोमध्ये सुमारे ३० टक्के महिला कार्यरत आहेत,'' असे चांद्रयान-२ ची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी म्हटले होते. महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. इस्रोच्या यापूर्वीच्या मंगळ मोहिमेवेळी आठ महिलांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या.

प्रकल्प संचालक एम. वनिता ः उपग्रहांविषयीच्या प्रकल्पावर या बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत. इलेक्‍ट्रॉनिक्‍स सिस्टिम्स इंजिनिअर असलेल्या वनिता यांनी डिझाईन इंजिनिअरिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने त्यांचा २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला आहे. चांद्रयान-२च्या प्रकल्प संचालक असल्याने या मोहिमेची सर्व कामे त्यांच्याच देखरेखीखाली पार पाडली जाणार आहेत. या इस्रोमधील एकमेव प्रकल्प संचालक आहेत. चांद्रयान-१ मोहिमेतही वनिता यांनी प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती. "डेटा हॅंडलिंग' या क्षेत्रातील त्या तज्ज्ञ आहेत. भारताच्या दूरसंवेदन उपग्रहांच्या "डेटा हॅंडलिंग सिस्टिम्स' सांभाळण्याचे काम त्या करत होत्या. प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी घेण्यास त्यांनी सुरवातीला नकार दिला होता. परंतु, इस्रो उपग्रह केंद्राचे तत्कालीन संचालक एम. अण्णादुराई यांच्या आग्रहामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. "नेचर' या नियतकालिकाने या वर्षातील दहा प्रमुख महिला शास्त्रज्ञांमध्ये वनिता यांच्या नावाचा समावेश केला आहे.

रितू करिधल ः रितू यांनी लखनौ विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मंगळ मोहिमेवेळी त्यांनी डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्‍टर म्हणून काम केले होते. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना २००७ मध्ये यंग सायंटिस्ट ऍवॉर्डनेही गौरविण्यात आले आहे. रितू यांना लहानपणापासून विज्ञानाची आवड होती. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो यांच्याबाबतच्या बातम्यांची कात्रणे त्या शालेय वयापासून जमवत असत. विज्ञानाशी संबंधित सर्व लहान-मोठ्या गोष्टी समजून घेण्याचा त्यांचा लहानपणापासून प्रयत्न होता. भौतिकशास्त्र आणि गणित हे त्यांचे आवडीचे विषय. चंद्राच्या कलांबाबत त्यांना नेहमीच उत्सुकता वाटत असे, तसेच अवकाशातील अंधाराच्या पलीकडे काय आहे? असा प्रश्नही त्यांना पडत असे. विज्ञानाबद्दलच्या आवडीमुळेच त्या इस्रोमध्ये आल्या. बंगळूर आयआयटीमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी इस्रोमध्ये काम करण्यासाठी अर्ज केला होता. अनेक उमेदवारांमधून त्यांची निवड झाली. गेल्या २०-२१ वर्षांपासून त्या इस्रोमध्ये काम करत आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले आहे. त्यात मंगळ मोहीम खास आहे.
आई-वडिलांनी माझ्यावर २०-२५ वर्षांपूर्वी जो विश्‍वास दाखविला, त्यामुळेच या टप्प्यापर्यंत मजल मारू शकले, असे रितू यांचे म्हणणे आहे.

"चांद्रस्वारी'साठी पाऊल
"चांद्रयान २' या भारतीय अवकाश मोहिमेंतर्गत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात प्रथमच यान उतरविण्यात येणार आहे. कोणत्याही देशाने दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेतून फक्त भारतच नाही, तर चंद्राविषयी संपूर्ण मानव जातीला असणारे ज्ञान वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे.

भारताची दुसरी चांद्रमोहीम सोमवारी (ता.२२) सुरू झाली. जगभरातील अवकाश संशोधन क्षेत्रासाठी या मोहिमेचे महत्त्व मोठे आहे. भारताच्या या आधीच्या 'चांद्रयान - १' आणि 'मंगळयान' या अवकाश मोहिमा भारताची या क्षेत्रातील तंत्र सिद्धता तपासणाऱ्या होत्या. 'चांद्रयान -२' या मोहिमेतून सूर्यमालेसंबंधी अनुत्तरीत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करणार आहेत.

चंद्रावर स्वारी कशासाठी?
चंद्र हा पृथ्वीला सर्वांत जवळचा अवकाशातील घटक आहे. प्रत्यक्ष यान पाठवून त्याचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो. दूर अवकाशातील मोहिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तपासणीसाठीही चंद्रावरील मोहीम उपयुक्त ठरते. चांद्रमोहिमेचा उपयोग भविष्यातील अवकाश संशोधनासाठी, नव्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठीही होईल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचीच निवड का?
चंद्राच्या अभ्यासातून आपल्याला पृथ्वीच्या भूतकाळाविषयीही माहिती मिळू शकते. चंद्राच्या पृष्ठभागावर कोट्यवधी वर्षांमध्ये मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे सूर्यमालेत सूर्याजवळच्या भागात गेल्या कोट्यवधी वर्षांमध्ये घडलेल्या अनेक घटनांचे पुरावे चंद्राच्या पृष्ठभागावर मिळू शकतात. चांद्रभूमीवरील विविध मूलद्रव्ये, खनिजे यांचे नेमके मापन करूनच चंद्राच्या निर्मितीचे रहस्य उलगडू शकते.

"चांद्रयान-१' या मोहिमेतून चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचे पुरावे मिळाले होते. चंद्राच्या विविध भागांमध्ये, तसेच जमिनीच्या आणि मातीच्या विविध स्तरांमध्ये पाण्याचे वितरण कसे आहे, याची सखोल माहिती जमा करणे आवश्‍यक आहे. चंद्रावरील पाण्याचा उगम शोधण्यासाठी त्याच्या जमिनीचा, तसेच अत्यंत विरळ असणाऱ्या वातावरणाचा अभ्यास आवश्‍यक आहे.

चंद्राचा दक्षिण ध्रुव हा उत्तर ध्रुवाच्या तुलनेत जास्त काळ अंधारात असतो. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण ध्रुवावर आजही मोठ्या प्रमाणात पाण्याचे अस्तित्त्व असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. याच भागात सूर्यमालेच्या जडण-घडणीच्या काळातील अनेक गुपिते दडल्याचाही शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

"चांद्रयान-२' मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण गोलार्धात ७० अक्षांशांवर "मॅन्झीनस सी' आणि "सिम्पेलिअस एन' या दोन विवरांच्या दरम्यान असणाऱ्या मैदानी प्रदेशात "विक्रम' हा लॅंडर आणि त्याच्यासोबत असणारी "प्रग्यान' ही बग्गी उतरविण्यात येईल.

"चांद्रयान-२'ची वैशिष्ट्ये-
१) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारी जगातील पहिली अवकाश मोहीम.
२) मोहिमेसाठी संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर.
३) चंद्राच्या पृष्ठभागाचा वेध घेणारे पहिले भारतीय पूर्णपणे स्वदेशी यान.
४) चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद यान उतरविणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

प्रक्षेपक (रॉकेट)
- भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक मार्क ३ - जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लॉंच वेहिकल मार्क-३ (जीएसएलव्ही मार्क-३).
- तीन भागांचे भारताचे सर्वात मोठे रॉकेट.
- पहिला भाग- एस २०० ः घन इंधनाचा समावेश असणारे दोन रॉकेट बूस्टर.
- दुसरा भाग - एल ११० ः द्रवरूप इंधनाचा टप्पा.
- तिसरा भाग - सी २५ ः सर्वांत वरचा, क्रायोजेनिक इंजिनाचा टप्पा (या भागात यान असते).

चंद्राभोवती फिरणारे यान (ऑर्बिटर)
वजन - २३७९ किलो
वीज निर्मिती क्षमता - १००० वॅट
हे यान चंद्राभोवती १०० बाय १०० च्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. यानावर बसविलेल्या आठ वैज्ञानिक उपकरणांच्या साह्याने चंद्राच्या भूमीचा, तसेच बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल. चंद्राभोवती फिरणाऱ्या या यानाचा चंद्राच्या भूमीवर उतरलेल्या "विक्रम' लॅंडरशी, तसेच पृथ्वीवरील केंद्राशी संपर्क असेल.

विक्रम (लॅंडर)
वजन - १४७१ किलो
वीज निर्मिती क्षमता - ६५० वॅट
विक्रम हा लॅंडर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरेल. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ लॅंडरचे नामकरण विक्रम असे करण्यात आले आहे. लॅंडर एकाच वेळी पृथ्वीवरील केंद्राशी, चंद्राभोवती फिरणाऱ्या यानाशी, तसेच चांद्रभूमीवर फिरू शकणाऱ्या बग्गीशी संपर्क साधू शकते. चंद्रावर अलगद उतरण्याची यंत्रणा यावर बसविण्यात आली असून, एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस इतका त्याचा कार्यकाळ असेल.

प्रग्यान (रोव्हर)
वजन - २७ किलो
वीज निर्मिती क्षमता - ५० वॅट
सहा चाकांची ही छोटी बग्गी असून, ती चंद्राच्या पृष्ठभागावर साधारणतः ५०० मीटर पर्यंत संचार करू शकेल. "प्रग्यान'वर सौरपत्रे बसविण्यात आले असून, ही बग्गी फक्त विक्रम लॅंडरशी संपर्क करू शकते.

वैज्ञानिक उपकरणे
"चांद्रयान-२'वर १४ वैज्ञानिक उपकरणे असून, त्यात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था "नासा'च्या उपकरणाचाही समावेश आहे.

ऑर्बिटरवरील उपकरणे
१) टेरेन मॅपिंग कॅमेरा २ (टीएमसी २) : "चांद्रयान-१'वर बसविण्यात आलेल्या "टीएमसी'चेच हे छोटे रुप आहे. "टीएमसी २'च्या साह्याने चंद्राच्या जमिनीचे पाच मीटर रिझोल्युशपर्यंत छायाचित्रण करण्यात येईल. चंद्राचा त्रिमितीय नकाशा बनविण्यासाठी, तसेच चंद्राच्या निर्मितीविषयीची माहिती जमा करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होईल.
२) लार्ज एरिया सॉफ्ट एक्‍स रे स्पेक्‍ट्रोमीटर (क्‍लास) : एक्‍सरे फ्लूरोसन्स (एक्‍सआरएफ) तंत्राचा उपयोग करून "क्‍लास' हे उपकरण चंद्राचा वर्णपट (स्पेक्‍ट्रम) नोंदवेल. सूर्यावरून आलेले क्ष-किरण चंद्राच्या जमिनीवरील मॅग्नेशियम, ऍल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, टायटेनियम, लोह, सोडियम आदी मूलद्रव्यांवर पडतील, तेव्हा त्यांच्यापासून उत्सर्जित झालेले किरण हे उपकरण अभ्यासेल. चंद्राच्या जमिनीवरील मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होईल.
३) सोलार एक्‍स रे मॉनिटर (एक्‍सएसएम) : सूर्याच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून उत्सर्जित झालेल्या क्ष-किरणांच्या नोंदी घेण्याचे काम हे उपकरण करेल. "क्‍लास' या उपकरणाशी सुसंगत आणि त्याला पूरक "क्ष-किरण' नोंदी घेण्याचे काम हे उपकरण करेल.
४) ऑर्बिटर हाय रिझोल्युशन कॅमेरा (ओएचआरसी) : चंद्राच्या भूभागाचे उच्च प्रतीचे छायाचित्रण करण्याचे काम "ओएचआरसी' करेल. या उपकरणाचे मुख्य काम "विक्रम' लॅंडरला चंद्रावर उतरवण्यासाठी योग्य जागेची निवड करणे हे आहे. "ओएचआरसी'द्वारे चंद्राच्या जमिनीचे दोन वेगवेगळ्या कोनातून छायाचित्रण केले जाईल. त्यातून "विक्रम'ला उतरवण्यात येणाऱ्या जागेवर असणारे खड्डे, दगड-धोंडे यांची नेमकी कल्पना येईल. "ओएचआरसी'द्वारे ०.३२ मीटर (सुमारे एक फूट) इतक्‍या रिझोल्युशनने १२ बाय ३ किलोमीटरच्या क्षेत्राची छायाचित्रे घेता येतील. "विक्रम'ला विलग केल्यानंतरही या उपकरणाचा चांद्रभूभागाचा अभ्यास करण्यासाठी उपयोग करण्यात येईल.
५) इमेजिंग आयआर स्पेक्‍ट्रोमीटर (आयआयआरएस) : याच्या साह्याने चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावरील खनिजे, तसेच अस्थिर वायूंचे हाय रिझोल्युशनने मापन करण्यात येईल. चंद्राच्या जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या अंशाचे मापन, तसेच चंद्राच्या जमिनीवरून उत्सर्जित झालेल्या सौरऊर्जेचे प्रमाण तपासण्याचे कामही हे उपकरण करेल.
६) ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक ऍपर्चर रडार (सार) : हे "एल' आणि "एस' असे दोन्ही बॅंडचे रडार ऑर्बिटरवर बसविण्यात आले आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशाचे हाय रिझोल्युशन मापन करण्याचे काम सार करेल. त्याचप्रमाणे चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशातील पाण्याचे नेमके प्रमाण शोधणे, चंद्राची वैशिष्ट्यपूर्ण माती असणाऱ्या रिगोलीथच्या थरांचे प्रमाण अभ्यासणे, हेही मुख्य उद्दिष्ट असेल.
७) ऍटमॉस्फेरिक कंपोझिशनल एक्‍सप्लोरर २ (एस २) : "एस २' हे चांद्रयान १ मोहिमेतील "एस' या उपकरणाचेच काम पुढे सुरू ठेवेल. चंद्राच्या बाह्य वातावरणात होणारे बदल टिपण्याचे काम हे उपकरण करेल.
८) ड्युएल फ्रिक्वेन्सी रेडिओ सायन्स (डीएफआरएस) एक्‍सप्रिमेंट : चंद्राच्या आयनांबरामध्ये (आयनोस्फिअर) बदलणारे इलेक्‍ट्रॉनचे प्रमाण तपासण्याचे काम या प्रयोगातून केले जाईल. एकाच वेळी "एक्‍स' आणि "एस' बॅंडवर रेडिओ संदेश प्रसारित केले जातील. या संदेशाच्या बदलत्या दर्जावरून चंद्राच्या आयनांबरातील बदल टिपले जातील.

"विक्रम'वरील उपकरणे
१) रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ऍटमॉसफिअर (रंभा) : चंद्राचे आयनांबर हे सतत बदलणाऱ्या "प्लाझ्मा'पासून बनलेले आहे. "रंभा'च्या माध्यमातून चंद्राच्या जमिनीपासून बदलत जाणारी इलेक्‍ट्रॉनची घनता आणि बदलत्या तापमानाची नोंद घेण्यात येईल. सौरवादळांच्या बदलत्या प्रमाणानुसार चंद्राच्या जमिनीजवळच्या भागात "प्लाझ्मा'चे प्रमाण कसे बदलते हेही प्रथमच या उपकरणामुळे समजू शकणार आहे.
२) चंद्राज सरफेस थर्मो- फिजिकल एक्‍सप्रिमेंट (चास्ते) : या उपकरणामध्ये एक सेन्सर आणि हिटरचा समावेश असून, हे उपकरण चंद्राच्या जमिनीत १० सेंटिमीटर खोलीपर्यंत रोवण्यात येईल. चंद्राच्या मातीमध्ये उष्णतेचे वहन कसे होते, पृष्ठभागापासून आत तापमान कसे बदलत जाते ते यामुळे समजू शकेल.
३) इन्स्ट्रुमेंट फॉर ल्यूनार सिझमिक ऍक्‍टिव्हिटी (इल्सा) : हे उपकरण चंद्राच्या जमिनीवर बसणाऱ्या अतिसूक्ष्म हादऱ्यांचीही नोंद घेऊ शकते.

"प्रग्यान'वरील (रोव्हर) उपकरणे
१) अल्फा पार्टिकल एक्‍सरे स्पेक्‍ट्रोमीटर (एपीएक्‍सएस) : चंद्राच्या ज्या भागामध्ये यान उतरले आहे, त्या भागातील जमिनीमध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी हे उपकरण वापरण्यात येईल. या उपकरणाच्या माध्यमातून चंद्राच्या जमिनीवर उच्च ऊर्जेच्या अल्फा कणांचा मारा करण्यात येईल. त्यामुळे जमिनीला धडकून उत्सर्जित झालेले क्ष-किरण जमिनीतील मूलद्रव्यांची माहिती देतील. या उपकरणाच्या साह्याने खडकांच्या निर्मितीत समाविष्ट असणाऱ्या सोडियम, मॅग्नेशियम, ऍल्युमिनिअम, सिलिका, कॅल्शियम, टायटेनियम, आयन, तसेच स्ट्रॉन्टीयम, झिरकोनियम आदी घटकांचे अस्तित्व तपासता येईल.
२) लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्‍ट्रोस्कोप (लिब्स) : चंद्राच्या जमिनीजवळील मूलद्रव्यांचे प्रमाण तपासण्याचे काम याद्वारे होईल. यातून शक्तिशाली लेझरचे झोत मारून त्या वेळी "प्लाझ्मा'कडून होणाऱ्या उत्सर्जनाच्या नोंदी घेतल्या जातील.

नासाचे उपकरण
१) लेझर रेट्रो रिफ्लेक्‍टर ऍरे (एलआरए) : पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर अचूकपणे मोजण्यासाठी "नासा'ने हे उपकरण विकसित केले आहे. "प्रग्यान'वर ते बसविण्यात आले आहे.

"चांद्रयान-२'चा असा असेल प्रवास

 • १५ जुलै २०१९ रोजी पहाटे ०२.५१ ः श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून "जीएसएलव्ही मार्क ३'द्वारे प्रक्षेपण.
 • यान पृथ्वीभोवती १७० किलोमीटर बाय ४०,४०० किलोमीटरच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल.
 • यानाची पृथ्वीभोवतीची कक्षा पुढील १६ दिवसांमध्ये पाच टप्प्यांमध्ये चंद्राच्या कक्षेपर्यंत विस्तारण्यात येईल.
 • चांद्रयान-२ ला चंद्राभोवती १०० किलोमीटर बाय १०० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल.
 • ६ सप्टेंबर २०१९ रोजी लॅंडर आणि बग्गी मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर लॅंडरवर बसविण्यात आलेल्या इंधन यंत्रणेच्या साह्याने त्याची चंद्राभोवतीची कक्षा १०० बाय ३० किलोमीटरची करण्यात येईल.
 • याच कक्षेत चंद्राच्या जमिनीपासून ३० किलोमीटरवर असताना "विक्रम' आणि "प्रग्यान' चंद्राच्या दक्षिण गोलार्धात ७० अक्षांशांवर उतरविण्याची प्रक्रिया साधली जाईल.
 •  "विक्रम' आणि "प्रग्यान' यांचा चंद्रावरील कार्यकाळ एका चांद्रदिवसाचा म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवसांचा असेल. या १४ दिवसांच्या काळात "विक्रम' आणि "प्रग्यान'ला सूर्यप्रकाशामुळे ऊर्जा मिळू शकेल.
 • "विक्रम' लॅंडर चंद्रावर उतरल्यावर त्याचे दार उघडेल. त्यानंतर चार तासांनी त्यातून "प्रग्यान' बग्गी बाहेर येईल.
 • चंद्राच्या जमिनीवर सेकंदाला एक सेंटिमीटर या गतीने "प्रग्यान' साधारणपणे ५०० मीटर अंतर कापेल.
 • पुढील १४ दिवसांत विविध शास्त्रीय नोंदी घेण्यात येतील.
 • सात वैज्ञानिक उपकरणांसह चंद्राभोवती १०० किलोमीटरच्या कक्षेतून फिरणारे यान पुढील एक वर्ष नोंदी घेईल.

चांद्रयान २ मोहिम खर्च
६०३ कोटी रुपये - निर्मितीसाठी
३७५ कोटी रुपये - प्रक्षेपणासाठी

चांद्रयान २ मोहिम सहभाग
५०० - विद्यापीठे
१२० - कंपन्या

शेवटची १५ मिनिटे जिकिरीची
चांद्रयान-२ प्रक्षेपणानंतर ५३-५४ दिवसांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सहा सप्टेंबरला दाखल होईल. पृष्ठभागावर हे यान सुरक्षित व यशस्वीपणे उतरणे हे अत्यंत जिकिरीचे काम असेल. "चांद्रयान-२' सुमारे ३० किमी उंचीवरून पृष्ठभागाकडे झेपावेल. यासाठी १५ मिनिटे वेळ लागेल. हा कालावधी अत्यंत आव्हानात्मक असेल.

चौथा देश
ही मोहीम पूर्णपणे यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया व चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरविणारा भारत चौथा देश ठरेल.

(संदर्भ व सौजन्य isro.gov.in) 


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...