उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची सिद्धी भारताने बुधवारी (ता.२७) साध्य केली. याद्वारे अंतराळातील महासत्ता' हा किताब दिमाखात पटकावला. अशी कामगिरी करणारा भारत हा केवळ चौथा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच मोहीम फत्ते झाल्याची घोषणा केली. भारताची अवकाशातील सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून ‘मिशन शक्ती' या नावाने ही मोहीम आखण्यात आली होती. ‘लो अर्थ ऑर्बिट'मध्ये फिरणारा, ३०० किलोमीटर अंतरावरील उपग्रह उपग्रहभेदी क्षेपणास्त्राद्वारा (ए-सॅट) केवळ तीन मिनिटांत पाडण्यात आला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संशोधकांनी ही फत्ते केली. अशा प्रकारे उपग्रह पाडण्याची क्षमता मिळविणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा चौथा देश ठरला आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळाले,’ हे विशेष. उपग्रहभेदी यंत्रणा संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणारे किंवा किंवा भारताची टेहळणी करण्याच्या दुष्ट उद्देशाने वापरील जाणारी विमाने पाडण्याचे उपग्रह तंत्रज्ञान विकसित झाले असले, तरी त्यांचे उपग्रह पाडण्याचे सामर्थ्य भारताने कमावले आहे. ‘डीआरडीओ'ने आज सकाळी ११ च्या सुमारास हे यश मिळविले. ‘इस्त्रो'ने २००८ पासून या मोहिमेची तयारी सुरू केली होती व २०१२ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी या मोहिमेला गती दिली. त्याची सफळ निष्पत्ती झाली. पृथ्वीच्या कक्षेत सुमारे ३०० ते ५०० किलोमीटर अंतरावर असलेले हेरगिरी करणारे उपग्रह पाडणे आता भारतालाही शक्‍य झाले आहे. पृथ्वीच्या केंद्रापासून साधारणतः दोन हजार किलोमीटर किंवा १२०० मैलांपर्यंतच्या अंतराला ‘लो अर्थ ऑर्बीट' असे म्हणतात. या कक्षेमध्ये साधारणतः हवामानावर देखरेख ठेवणारे उपग्रह स्थापित केले जातात. मात्र, काही खोडसाळ देश हेरगिरी करणारे उपग्रही अंतराळात पेरून ठेवतात व इतर देशांतील खडानखडा माहिती-छायाचित्रे मिळविण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी जगाच्या अनेक भागांत अनेक उपग्रहांचे जाळे निर्माण करून ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) सारख्या यंत्रणा तयार झाल्या. त्याने स्मार्ट शस्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आदींच्या विकासाला चालना मिळाली. युद्धकाळात हे उपग्रह भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे शत्रूची संपर्कयंत्रणा आणि निर्णयप्रणाली उद्‌ध्वस्त करण्यासाठी प्रथम त्याचे उपग्रह नष्ट करण्यास आधुनिक युद्धात महत्त्व असणार आहे, हे ओळखूनच भारताने गेले दशकभर चाविलेल्या या संशोधन मोहिमेला आज यश मिळाले. केवळ तीन मिनिटांत ‘मिशन शक्ती’ यशस्वी ‘मिशन शक्ती' यशस्वी झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात केली. देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच पंतप्रधानांनी सकाळी "ट्‌विट' करून राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपूर्ण देशात उत्सुकता निर्माण झाली होती. निवडणूक असल्याने कोणतीही धोरणात्मक घोषणा करता येणार नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संरक्षणविषयक काही माहिती पंतप्रधानांकडून सांगितली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. यापूर्वी पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाला उद्देशून भाषण केले होते. त्या वेळी त्यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ‘मिशन शक्ती'च्या यशाबद्दल डीआरडीओचे माजी प्रमुख डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी आनंद व समाधान व्यक्त केले. सारस्वत यांच्या कार्यकाळातच या मोहिमेला गती आली होती. कोणत्याही देशासाठी उपग्रह विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकसित व यशस्वी होणे हे फार मोठे यश आहे. यामुळे देशाची सुरक्षा आणखी मजबूत होईल. जर दुसऱ्या देशाने भारताच्या अंतराळ क्षेत्रात घुसखोरी केली, तर त्याला वेळीच रोखण्यासाठी ही अतिशय उपयुक्त प्रणाली ठरणार आहे. - डॉ. डी. के. सारस्वत, डीआरडीओचे माजी प्रमुख ‘‘अवकाश संशोधनात भारताने आज आपला झेंडा फडकविला आहे. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राद्वारे अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्यात संशोधनांनी यश मिळविले. ‘‘फिरणारा उपग्रह पाडण्यासाठी अत्यंत उच्च तंत्रज्ञानाची आवश्‍यकता होती. ती ‘मिशन शक्ती’ अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी पूर्ण केली. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे,’’  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com