भारत 'या' देशाला देणार कापूस उत्पादकतावाढीचे धडे

India will give Azerbaijan lessons on cotton productivity
India will give Azerbaijan lessons on cotton productivity

नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील कापूस उत्पादकतावाढीसाठी मार्गदर्शक म्हणून केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. डॉ. वाघमारे यांनी या देशाला नुकतीच भेट देत तेथील संशोधन संस्थांशी संवाद साधला. 

सोव्हिएत रशियापासून स्वतंत्र झालेल्या अझरबैजान या देशाची लोकसंख्या एक कोटीच्या घरात आहे. त्यामध्ये ९६ टक्‍के लोकसंख्या ही मुस्लिम असून उर्वरित चार टक्‍क्‍यांमध्ये ख्रिश्‍चन व इतर धर्मीयांचा समावेश होता. या देशात सध्या कापसाची उत्पादकता हेक्‍टरी १.७ टन इतकी आहे. कापसाची ही उत्पादकता पाच टनापर्यंत वाढविण्याचे या देशाने प्रस्तावित केले आहे. त्यानुसार सर्वाधिक कापूस लागवड आणि तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या भारताची मदत घेतली जात आहे. 

भारत सरकारच्या एका मिशनअंतर्गत अझरबैजान या देशाला कापूस उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांची निवड केली. अझरबैजान देशाच्या भेटीत डॉ. वाघमारे यांनी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख रफायल गुलीव्ह, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख इमरान जिमशुडो, उपप्रमुख फरमान केरीमोव्ह, जेनेटीक संशोधन संस्थेचे झेनेयाल ऐकेप्रोव्ह यांची भेट घेतली. 

या भेटीत त्या देशातील संशोधित वाण, त्यांची उत्पादकता, वाण ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच उत्पादकतावाढीसाठी पूरक तंत्रज्ञान या विषयावर चर्चा करण्यात आली. डॉ. वाघमारे यांनी अझरबैजान देशातील विविध संशोधन संस्था तेथील प्रयोगशाळांना भेट देत विकसित वाण तसेच इतर कृषिविषयक संशोधनाची माहिती घेतली. भारतातील कापूस उत्पादकता आणि शेतकऱ्यांव्दारे अवलंबिल्या जाणारे तंत्रज्ञान विषयीचे सादरीकरण डॉ. वाघमारे यांनी या वेळी केले. अझरबैजानमधील कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com