तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून 'काउंटर ट्रेड'चा पर्याय

तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून 'काउंटर ट्रेड'चा पर्याय
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून 'काउंटर ट्रेड'चा पर्याय

अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज घसरत चालला आहे. पैशाच्या रूपात व्यवहार करण्याला काही पर्याय सापडतो का हे शोधण्यात सध्या आपले सरकार व्यस्त आहे. पूर्वीच्या काळी लोक वस्तूंची अदलाबदल करत असत (बार्टर सिस्टिम). आधुनिक काळात त्याला `काउंटर ट्रेड` असे म्हटले जाते. बरेचसे देश या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत. डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घसरू नये म्हणून हा पर्याय तितकासा योग्य नसला तरी याचा स्वीकार होताना दिसतोय. भारताने तांदळाच्या रूपात या काउंटर ट्रेडचा करार युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यूएसएसआर) सोबत केला होता. तसेच अलीकडच्या काळात २०१२-२०१५ दरम्यान इराण तेल निर्बंधात अडकलेला होता तेव्हा इराणशीही हा करार करण्यात आला होता. इराणला डॉलरच्या रूपात रक्कम देण्यास अमेरिकेने घातलेल्या बंदीवर मात करून ४ नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत इराणसोबत काउंटर ट्रेडचा नवीन करार करणार आहे. २०१७-२०१८ मध्ये भारताची एकूण तेल आयात ही जवळजवळ १५५ दशलक्ष टन एवढी होती. त्या पैकी इराणकडून १६ % म्हणजेच जवळजवळ २३ दशलक्ष टन आणि व्हेनेझुएलाकडून ११% म्हणजे १८ दशलक्ष टनपेक्षा जास्त तेलाची आयात आपण केली. इराक, सौदी अरेबिया आणि इराण नंतर व्हेनेझुएला हा देश आपल्या देशाची तेलाची गरज भागवतो. या देशाची अर्थव्यवस्था आणि बॉलिवर चलन संपूर्णपणे ढासळले आहे. ते इतक्या मोठ्या प्रमाणात ढासळले की तेथील सरकारने सर्वप्रथम स्वतंत्र असे पेट्रो नावाचे क्रिप्टो-चलन चालू केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) क्रिप्टो-चलनांविरूद्ध आहे आणि भारत अन्न व औषधांच्या बदल्यात तेल पुरवठा करण्यासाठी व्हेनेझुएलाशी देखील करार करू शकतो. भारताने जर दुसऱ्या देशांबरोबर अशाप्रकारचा व्यवहार केला अथवा डॉलरची उपेक्षा केली तर अमेरिका ते कधीही सहन करणार नाही. असे असले तरी आपण आपल्या फायद्याचा विचार करायला हवा. कमजोर देश, विशेषतः भरपूर तेलसाठा असलेले किंवा अमेरिकेच्या मर्जीत नसणारे देश यांच्यासोबत आपण देवाण-घेवाणीचे व्यवहार केले पाहिजेत. रशिया या व्यवहारासाठी सहज तयार होऊ शकतो. परंतु याची काळी बाजू अशी आहे की या सर्व देशांनी तेलाच्या बदल्यात फक्त तांदळाचीच मागणी केली तर आपली अवस्था अक्षरशः आगीतून फुफाट्यात अशी होईल. आम्ही तेलाच्या आयातीसाठी पैशाच्या बदल्यात तांदळाची अदलाबदल केली तर तांदळाच्या किमती आपल्या देशात वाढतील. इराणने तेलाची किंमत वाढवली आहे. त्यामुळे तेलाची आयात करण्यासाठी तांदळाची अदलाबदल ही गोष्ट तशी कठीण वाटतेय. हा व्यवहार आतबट्ट्याचा तर होणार नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) कडे निधीची वानवा आहे. मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन करण्यासाठी सरकार उत्तेजन देऊ शकते. आयओसीला अचानकपणे शेतीमध्ये उडी घेणे अशक्य आहे. त्यासाठी लागणारे कौशल्य, संसाधने आणि जमीन त्वरित मिळणे दुरापास्त आहे. मॅक्डोनाल्डने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांशी बटाटा आणि टोमॅटोची लागवड आणि पुरवठा करण्याचा करार केला आहे त्याप्रमाणे कंत्राटी शेती केली तर तांदळाच्या बाबतीत भारताची स्थिती सक्षम होईल. तेलाची आयात करण्यासाठी निधी म्हणून डॉलरकडे पाहण्यापेक्षा हे जरा सोपे पडेल. जर मॅक्डोनाल्डस अशा कराराद्वारे वेळेवर आणि ठरलेल्या किमतीत माल मिळवू शकतात तर आयओसीसुद्धा असे करार करून डॉलरच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकते. गुणवत्तेचे सर्व निकष लावून या देवाणघेवाणीच्या व्यवहारात इतर अनेक वस्तूंचा सुद्धा सरकारने निश्चित विचार करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com