मराठवाड्यात मोसंबी, संत्र्यांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

परभणी : मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा आदी लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
Infestation of spider mites on citrus and oranges in Marathwada
Infestation of spider mites on citrus and oranges in Marathwada

परभणी :  मराठवाड्यातील अनेक भागात मोसंबी, संत्रा आदी लिंबूवर्गीय फळपिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीमुळे फळांचे नुकसान होऊन विकृत फळे तयार होतात. कोळीचा प्रादुर्भाव वर्षभर असला तरी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान जास्त असतो. विक्री योग्य, चांगला बाजाभाव मिळावा, यासाठी उत्पादनाच्या दृष्टीने फळांवरील या किडीच्या नियंत्रणास विशेष महत्त्व आहे. या किडीची ओळख करुन वेळीच योग्य व्यवस्थापन केल्यास भविष्यात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

जालना, औरंगाबाद या जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक आहे. परभणी जिल्ह्यात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. अन्य जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा बागातील फळांवर या किडीचा प्राद्रुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून तत्काळ व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे तज्ज्ञांनी सूचविले.

किडीची ओळख

कोळी ही अष्टपाद वर्गातील महत्त्वाची कीड आहे. ती आकाराने अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे साध्या डोळ्याने दिसणे कठीण जाते. पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात या कीडीद्वारे अंडी घातली जातात. प्रौढ लांबट, पिवळे असून पिल्ले फिक्कट पिवळसर असतात. पिल्ले व प्रौढ कोळी आकाराचा फरक सोडल्यास सारखेच दिसतात. 

प्रादुर्भावाची लक्षणे

कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढूरके चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्टयाचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरुपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. तपकिरी लालसर किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. याला शेतकरी लाल्या म्हणून ओळखतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास अनियमित आकाराची फळे तयार होतात. आतील फोडींची वाढ बरोबर होत नाही. फळांची प्रत खालावते. 

असे करा व्यवस्थापन

कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणी तसेच नंतर उद्भवणाऱ्या लाल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मिली किंवा विद्राव्य गंधक ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे देण्‍यात आली. अधिक माहितीसाठी (०२४५२) २२९००० दुरध्‍वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

कोळी किडीचा प्राद्रुर्भाव प्रामुख्याने मोसंबी, संत्रा या लिंबूवर्गीय पिकांच्या फळावर होतो. प्राद्रुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. त्यामुळे बाजारात कमी भाव मिळतो. प्रादुर्भाव चटकन लक्षात येत नाही. शेतकऱ्यांनी बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावे. - प्रा. डी. डी. पटाईत, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com