वऱ्हाडात बहुतांश मतदारसंघात बंडाळीची लागण

वऱ्हाडात बहुतांश मतदारसंघात बंडाळीची लागण
वऱ्हाडात बहुतांश मतदारसंघात बंडाळीची लागण

अकोला  ः विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळीचे ‘तण’ उगवले आहे. नाराजी असलेल्यांनी थेट आपल्याच पक्षाच्या उमेदवारांनाच आव्हान दिले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी काही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठबळ दिले आहे. काही दिग्गज अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आहेत. ते आता सोमवारी (ता. ७) उमेदवारी मागे घेतात की रिंगणात राहतात हे स्पष्ट होईल. बंडखोर रिंगणात राहिल्यास धक्कादायक निकालाची शक्यता मतपेटीतून बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला जिल्हा या निवडणुकीत कधी नव्हे इतके ‘उभेच्छुक’ तयारीत होते. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाले तर या पक्षाने त्यांच्याकडे असलेल्या जागांवर विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे अकोला पश्चिम, मूर्तिजापूरमध्ये भाजपमध्ये बंडखोरीचा झेंडा रोवण्यात आला. भाजपचे माजी महानराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी अकोला पश्चिममध्ये तर राजकुमार नाचणे यांनी मूर्तिजापूरमध्ये अर्ज दाखल केला. अकोटमध्ये भाजप उमेदवाराविरुद्ध काही दिवसांपूर्वीचं शिवसेनेत प्रवेश केलेले अनिल गावंडे यांनी उमेदवारी दाखल केली. अकोटमध्ये वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला. अकोला पश्चिममध्येही काँग्रेसचे मदन भरगड वंचितकडून उभे राहिले. येथेही वंचितने आधी जाहीर केलेला उमेदवार बदलून भरगड यांना एबी फॉर्म दिला. बाळापूर मतदारसंघात महायुतीचा घटक असलेल्या शिवसंग्रामतर्फे संदीप पाटील, भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. संतोष हुशे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. 

बुलडाणा जिल्हा बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडीत दाखल झाले व उमेदवारी भरली. पाचवर्षे भाजपकडून तयारी करीत असलेले योगेंद्र गोडे हे युतीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष रिंगणात उतरले. जळगाव जामोद मतदारसंघात आघाडीकडून बंडाचे झेंडे उभे राहिले. काँग्रेसने हा मतदारसंघ स्वाती वाकेकर यांना सोडल्याने पक्षातून इच्छुक असलेले प्रसेनजित पाटील समर्थक नाराज झाले. त्यामुळे पाटील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचितकडून उमेदवारी दाखल केली. 

वाशीम जिल्हा या जिल्ह्यातसुद्धा बंडखोरीची लागण झालेली आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. येथे काँग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. येथे भाजपचे माजी आमदार विजय जाधव यांनी बंडाचा झेंडा उभा केला. कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून येथे माजी आमदार प्रकाश डहाके यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे येथे चक्क जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीच अपक्ष अर्ज भरला. युतीकडून कारंजा मतदारसंघ भाजपकडे आहे. येथे शिवसेनेचे डॉ. सुभाष राठोड यांनी मनसेकडून उमेदवारी आणत बंड उभे केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com