पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा 

राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी सरकारी अंदाज अद्याप हाती आलेला नाही.
crop insurance
crop insurance

पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी सरकारी अंदाज अद्याप हाती आलेला नाही. दरम्यान, पिकाचे वैयक्तिक नुकसान होताच ७२ तासांत विमा कंपनीला विमाधारक शेतकऱ्याने स्वतः सूचना (इंटिमेशन) द्यावी, आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

राज्यात जोरदार पाऊस सुरू असून, कोकण व इतर भागांमधील काही तालुक्यांमध्ये पेरण्या वाया जाण्याची चिन्हे आहेत. एक जूनपासून २३ जुलैपर्यंत राज्यात सरासरी ४५३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा तो ६०३ मिलिमीटर (१३३ टक्के) झालेला आहे. जुलैत राज्याच्या ३५३ तालुक्यांपैकी २५३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ‘‘पावसाचा जोर असाच चालू राहिल्यास काही तालुक्यांमधील खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो’’, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

नदीकाठच्या शेतीची चिंता  ‘‘राज्यात सर्वत्र होत असलेला पाऊस सध्यातरी सर्वसाधारणपणे खरिपासाठी पोषक आहे. कारण कपाशीला बोंड निघणे किंवा सोयाबीन, तुरीला शेंगाची अवस्था प्राप्त झालेली नाही. भाताची पुनर्लागण झालेली नाही. त्यामुळे या पिकांना अजून धोका नाही. मात्र कोणत्याही भागात ३-४ दिवस सतत पाऊस असल्यास पिके संकटात सापडू शकतात. तूर्त कोकण व कोल्हापूर भागातील तसेच ओढे, नदी, नाल्यांच्या काठी असलेल्या शेतीमधील पिकांची चिंता आहे. मात्र नुकसानीची अचूक माहिती हाती आलेली नाही,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

चिपळूणमध्ये सरकारी कर्मचारी घरातच अडकून पडलेले आहेत. त्यामुळे तेथील नुकसान कळू शकलेले नाही. ‘‘रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, अकोला, वाशीम, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत मात्र काही गावांमध्ये दोन दिवसांच्या संततधारेमुळे पिकाचे नुकसान झालेले आहे. १० ते १५ हजार हेक्टरपर्यंत नुकसान असू शकते,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

सूचनेनंतर कागदपत्रांचीही जबाबदारी  कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, ‘‘विमा योजनेत ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ ही जोखीम समाविष्ट आहे. त्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन पिकाचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. सध्या राज्याच्या काही भागांत अतिवृष्टी तसेच पूरसदृश स्थिती आहे. त्यामुळे पिकाचे नुकसानदेखील झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला सूचना देणे गरजेचे आहे.’’ 

नुकसानीची माहिती संबंधित शेतकऱ्याने क्रॉप इंश्युरन्स ॲपवर, विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांकावर, बँका, कृषी विभाग किंवा महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका ठिकाणी कळविता येईल. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र याचा तपशील कळविणे बंधनकारक असेल. ‘‘पीक नुकसानीची तोंडी सूचना दिली तरी इतर कागदपत्रे पुरवावी लागतात. ती जबाबदारीदेखील शेतकऱ्यांची असते,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

कोठे द्याल नुकसानीची सूचना?  पिकाचे नुकसान झाल्यास अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यांतील शेतकरी नुकसानीची सूचना ‘भारती एक्सा’ विमा कंपनीला (टोल फ्री क्रमांक 18001037712) देऊ शकतात. परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार या जिल्ह्यांमधील शेतकरी ‘रिलायन्स’ कंपनीला (18001024088) कळवू शकतात. नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांतील शेतकरी ‘इफ्को टोकिओ’ कंपनीकडे (18001035490) संपर्क करू शकतात. औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्याकरिता ‘एचडीएफसी इर्गो’ (18002660700) कंपनीकडे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी ‘बजाज अलियांन्झ’ (18002095959) कंपनीकडे माहिती देऊ शकतात. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकाच्या ‘एआयसी’ (18004195004) या भारतीय कृषी विमा कंपनीशी संपर्क करता येईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com