ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज'चा पुढाकार

ग्रामविकासाबाबत बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन
ग्रामविकासाबाबत बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन

मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी १९९६ मध्ये खोज या स्वयंसेवी संस्थेची सुरवात झाली. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, आचलपूर आणि धारणी तालुक्यातील दुर्गम भागातील सुमारे चाळीस गावांमध्ये संस्था ग्रामविकास, शेती, आरोग्य आणि शिक्षण विषयक विविध उपक्रम राबवित आहे. या माध्यमातून परिसरातील चित्र बदलू लागले आहे.

आपण घेत असलेल्या शिक्षणाचा ग्रामीण भागामध्ये काही उपयोग होईल का ? असा विचार करत मित्र-मैत्रिणींच्या एक समूहाने अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने मेळघाट परिसरात काम करून पाहायचे ठरवले. या गटाच्या उपक्रमातून १९९६ मध्ये खोज या स्वयंसेवी संस्थेची सुरवात झाली. संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे आदिवासी समुदायाला त्यांच्या हक्कांची कायदेशीर माहिती देऊन त्यांना व त्यांच्या ग्रामसभांना सक्षम करणे हा होता. समुदायाची शेती, जल, जंगल, शिक्षण, आरोग्य, आदिवासींच्या शेतीचे हस्तांतर, अवैध सावकारी व वन विभागाच्या अन्यायाला बळी पडणाऱ्या विविध अडचणींना समोर ठेऊन संस्थेने लोकांच्या समवेत कामाला सुरवात केली.    आदिवासींसाठीचा स्वशासन कायदा (पेसा) यासाठी जागृती करणे, योजनांची अंमलबजावणी, न्यायासाठी वेळप्रसंगी मोर्चे काढणे, पदयात्रा करणे, उपोषण करणे, कायद्याचा अभ्यास करून जनहित याचिका करणे इत्यादी माध्यमातून आदिवासी विकासासाठी संस्थेने काम सुरू केले. शासनाच्या योजनांचा लाभ आदिवासी समुदायासाठी व्हावा, यासाठी बंद शाळा सुरू करणे, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक, तलाठी व शासनाचे सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करणे याचबरोबरीने रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. या समुदायाकडे असलेल्या चढ-उताराच्या जमिनीत रोजगार हमीच्या माध्यमातून जल-मृद संधारणाच्या उपाययोजना करून जमीन लागवडीखाली आणण्यात आली. अजूनही विविध कामे संस्थेतर्फे सुरू आहेत.

आरोग्य सुविधांवर भर  राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून लोकाधारित देखरेख करणे, आरोग्य सेवा ही आपल्या हक्काची सेवा आहे, यासाठी प्राथमिक स्वास्थ केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय सारख्या केंद्रावर या समुदायाला चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी काम केले जाते. याच भागातील आरोग्य समुपदेशकाची निवड करून कोरकू भाषेच्या संभाषणातून मार्गदर्शन व सेवा मिळावी म्हणून जिल्हा परिषेदेसोबत आणि संस्थेच्या पुढाकाराने ३० आरोग्य समुपदेशक तयार झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून लोकांना समुपदेशन केले जाते. यात मेळघाटातील ११ प्राथमिक स्वास्थ केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. त्यामुळे आदिवासी लोक उपचारासाठी रुग्णालयात येऊ लागले आहेत. 

वनहक्काबाबत जागृती     २००६ सालच्या वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात ग्रामसभा घेतल्या. ग्रामसभा सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुर्गम भागातील गावामध्ये होणाऱ्या  ग्रामसभांमध्ये वनहक्क कायद्याची माहिती देणे, त्यांचा अर्ज भरणे, त्यासाठी योग्य पुरावे गोळा करण्यात आले. पुराव्यासाठी लोकांकडे असलेल्या दंड पावती, न्यायालयीन पुरावे, वनविभागाच्या मिळालेली नोटीस, जनावरे चराईची पावती इत्यादी शोधणे हे अतिशय अडचणीचे काम होते. तरीही व्यक्तीगत लाभ म्हणून लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करून शेती करत असलेल्या सुमारे ३०० शेतकऱ्यांना जमिनीवर हक्क मिळवून दिले.

जंगलांचे पुनःनिर्माण  लवादा (वन), जांभळा (नयाखेडा), पायविहीर, नवलगाव या गावात परिसर पुर्ननिर्माण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जंगलाची घनता स्थानिक प्रजातींना लावून वाढविणे, जंगलाला उत्पादनक्षम बनविणे सुरू आहे. या जंगलावर स्थानिक प्रजातीचे १,५०,००० रोपवन करण्यात आले आहे. सर्व प्रकारची मृदा व जलसंधारणाची कामे मग्रारोह योजनेतून करून जंगलांचे पुर्ननिर्माण करण्यात येत आहे.

सौर ऊर्जेचा वापर 

 संस्थेकडून माडीझडप, खडीमल, रायपूर, लवादा या गावात सौर ऊर्जेवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. माडीझडप येथे ५ सौर पंप आणि कूपनलिकेच्या माध्यमातून २० शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत आहे.

ग्रामपरिवर्तन अभियान  

  • महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानसुद्धा संस्थेमार्फत १० ग्राम पंचायतींमार्फत ३५ गावांमध्ये सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून शासन व लोकांचा सहभागातून वाचनालये, शेती अवजारे, शुद्ध पिण्याचे पाणी, दुग्धव्यवसायासाठी दुधाळ जनावरे, कुक्कुटपालन, शाळा व अंगणवाडी साहित्य पुरवठा, भिंती रंगचित्रे, व्यवसाय प्रशिक्षण यासारख्या कार्यक्रमातून ग्रामसभांचे सक्षमीकरण होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती होण्यास मदत मिळत आहे.
  •   संस्थेच्या माध्यमातून चार ग्रामसभांनी सीताफळाचे व्यवस्थापन केले आहे. तीन महिला बचत गटांनी गावातच रेशन दुकानांना सुरवात केली आहे. पाच गावांनी मत्स्यपालनामध्ये पुढाकार घेतला आहे. 
  •   राणामालुर गावाने ग्रामसभेच्या उत्पन्नातून पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. 
  •   नयाखेडा, उपातखेडा, पायविहीर, खतिजापूर या गावात दूध संकलनाचे काम सुरू झाले आहे. पायविहीर गावास २०१४ चा राष्ट्रीय जैवविविधता पुरस्कार मिळाला आहे. या ग्रामसभेने जिल्हा विकास निधीतून प्रशिक्षण केंद्र बांधले आहे. ग्रामसभेच्या उत्पन्नातून दळण केंद्र सुरू केले आहे. 
  •   नयाखेडा, पायविहीर, खतिजापूर येथे वनीकरणाच्या माध्यमातून गावशिवारात वन्यप्राणी पुन्हा दिसायला लागले आहेत.  उपातखेडा ग्रामसभेने सामाजिक वनीकरण विभागाकडून जैवविविधता उद्यान उभारण्याचे काम सुरू केले आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामसभांच्या सहकार्यातून व संस्थेच्या तांत्रिक व कायदेशिर मार्गदर्शनात ग्रामसभा पुढे मार्गक्रमण करीत आहेत.
  • - महादेव गिल्लुरकर, ९१३०९९३०२९  ( लेखक खोज संस्थेचे समन्वयक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com