बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे.
self help group
self help group

मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाइन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले. ‘माविम’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले. राज्यातील सर्व जिल्ह्यांत मिळून 'माविम'चे एकूण १ लाख ३७ हजार स्वयंसहायता बचत गट आहेत. त्यापैकी ९७ हजार ४९९ ग्रामीण ३९ हजार ५९१ शहरी गट आहेत. 'माविम'चे ३६१ लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचतगटांशी ११ लाख ८१ हजार ग्रामीण तर ४ लाख २८ हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत. ‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील भरण्यात आली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील 'माविम'च्या बचत गटाच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे या महिलांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने अधिक बाजारभाव मिळणार आहे.  ‘ई-बिझनेस’ उपक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला कार्यकर्ती राहणार असून या महिलेकडे स्मार्ट फोनवरील 'ई-बिझनेस' ॲपव्दारे ऑनलाइन आणि ऑफलाइनमध्ये गावातील विविध उत्पादनांची माहिती या मध्ये भरण्यात येणार आहे. बाजाराच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे तसेच कोणते विक्रेते किंवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत याची माहिती माविम जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात येईल. थोडक्यात  गावातील महिला प्रत्यक्षपणे जगातील बाजारपेठेशी या माध्यमातून जोडण्याचा 'माविम'चा मानस आहे.

प्रतिक्रिया ई- बिझनेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती उत्पादनाचे बाजारपेठेशी ई-लिंकेज झाल्यामुळे बचत गटाच्या शेतकरी महिला सदस्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनांना अधिक बाजारभाव मिळणार असून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. - ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

 वेळोवेळी अद्ययावत माहिती या ई- प्लॅटफॉर्मवर भरण्यात येणार असल्याने उत्पादनांना वेळेत बाजारपेठ आणि योग्य दर मिळू शकणार आहे. यापुढील काळात बचत गटांकडून उत्पादित कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे ई- व्यासपीठ निर्माण करण्यात येईल. - ज्योती ठाकरे, अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com