जुन्नर हापूसच्या ‘जीआय’साठी प्रयत्न

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः देवगड, रत्नागिरी हापूसनंतर आता जुन्नर हापूसला स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी आंबा उत्पादकांसह खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जुन्नर हापूसच्या जीआय मानांकनासाठीच्या न्यायालयीन लढ्यासाठी शास्त्रोक्त माहिती संकलित करण्यासाठीचे पत्र आढळराव यांनी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने जीआयसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार आढळराव यांनी कृषिमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे, की राज्याच्या कृषी हवामान विभागानुसार प्रत्येक विभागातील फळ व पिकांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. फळांमध्ये विशेष असणाऱ्या आंब्यांच्या वाणांमध्ये कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केसर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जुन्नरचा हापूसदेखील प्रसिद्ध असून, या आंब्याला मुंबईमध्ये मोठा ग्राहक आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम घाट परिसरातील काही शेतकऱ्यांनी १०० वर्षांपूर्वी हापूस आंब्याची लागवड केली आहे. यामध्ये येणेरे, काले, दातखिळवाडी, निरगुडे, बेलसर, राळेगण, शिंदे, कुसूर, माणिकडोह या गांवाचा समावेश आहे. या परिसरातील पोषक हवामानामुळे हापूसचे दर्जेदार उत्पादन होत असून, वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी तो प्रसिद्ध आहे. मुंबई बाजारपेठेत जुन्नर हापूस म्हणून त्याची विक्री होत आहे. यामुळे जुन्नर हापूसला स्वतंत्रपणे भौगोलिक निर्देशांक मिळणे गरजेचे आहे. यामुळे शासनाच्या वतीने या परिसरातील हापूस आंबा उत्पादन आणि उत्पादकांचे सर्वेक्षण करून, शास्त्रोक्त माहिती आकडेवारीसह संकलित करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावी.

देवगड, रत्नागिरीबरोबर आम्ही मुंबई बाजार समितीमध्ये जुन्नर हापूस म्हणून जुन्नरच्या आंब्याची विक्री करत आहे. कोकण हापूसपेक्षा जास्त दराने त्याची विक्री होत आहे. यामुळे जुन्नर हापूसची विशेष ओळख बाजारपेठेमध्ये निर्माण झाली असल्याने स्वतंत्र जीआय मिळावा. केसरलादेखील गुजरात आणि मराठवाडा स्वतंत्र जीआय आहे. त्या धर्तीवर आम्हालाही जीआय मिळावा, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे माजी संचालक आणि फळ अडतदार संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी केली आहे. जुन्नर हापूसच्या प्रमोशनसाठी पणन मंडळाच्या वतीने मुंबई आणि पुण्यात स्वतंत्र महोत्सव आयोजन करण्यात येणार असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी जाहीर केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com