नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
कृषी पदवी प्रवेशात एकाही विद्यार्थ्यावर अन्याय नको
“कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एकाही विद्यार्थ्याची तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या,” अशा कडक सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
पुणे : “कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एकाही विद्यार्थ्याची तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्या; पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी जे काही लागेल ते करा. यामुळे प्रवेश प्रक्रियेला पाच-सहा दिवसांचा उशीर झाला तरी चालेल,” अशा कडक सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
कृषी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरने घोळ केला आहे. त्यातून उद्भवलेल्या अडचणींचा फटका राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत हजारो ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत.
विद्यार्थांना मदत करा
अर्ज भरून देखील यादीत नावे दिसत नसल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे पवार यांनी मंगळवारी (ता. १२) बैठक घेत सरकारी यंत्रणेला सूचना दिल्या. उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे यांनीही विद्यार्थ्यांची बाजू समजावून घेतली आहे. “ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाचीही पात्रता डावलली जाणार नाही, असे नियोजन करायला हवे. प्रणालीत काही त्रुटी असल्यास दूर कराव्यात. या त्रुटींमुळे कोणताही विद्यार्थी अपात्र होता कामा नये. अशा विद्यार्थ्यांना आपण मदत करायला हवी. त्याच्या तक्रारीबाबत उत्तराचा निरोप पाठवा,”असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी, सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे नावनोंदणी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज भरता आलेला नसल्याचे बैठकीतच स्पष्ट केले. यामुळे आता तक्रार नोंदविलेल्या हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे. बारामती अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी पदवी प्रवेशांबाबत राज्य शासनासमोर वस्तुस्थिती मांडली.
अर्ज भरण्यासाठी आज रात्रीपर्यंत संधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी) आयुक्त चिंतामणी जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल केले आहेत. ‘कॅपसाठी अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थी व पालकांनी आता आज (ता. १४) रात्री ११.५९ मिनिटापर्यंत आपला अर्ज दाखल करावा,” असे आवाहन सीईटीने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शंका
काय आहेत?
- सीईटीच्या ‘अॅग्री कॅप पोर्टल’वर यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कॅपसाठी अर्ज सादर करण्याची वेळ कधीपर्यंत?
- १४ जानेवारीच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत
- यानंतर संकेतस्थळावर अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्धी केव्हा होईल?
- १८ जानेवारीला ५.३० वाजेनंतर
- ऑनलाइन तक्रार स्वीकारणीचा कालावधी काय आहे?
- १९ जानेवारीपासून पुढे २१ जानेवारीला ५.३० वाजेपर्यंत
- विद्यार्थ्यांना प्रवेशाची नेमकी माहिती कुठे मिळेल?
- https://cetcelladmissions.mahait.org या संकेतस्थळावर
- सीईटीसंबंधी नोटिसा किंवा बदलती माहिती कुठे मिळेल?
- www.mahacet.org या संकेतस्थळावर
- 1 of 657
- ››