केम गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गणेश चौधरीची चौकशी

केम गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गणेश चौधरीची चौकशी
केम गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गणेश चौधरीची चौकशी

अमरावती ः समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन संचालक गणेश चौधरीची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी केली जात आहे. सहा कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या गैरव्यवहाराचा गणेश चौधरीवर आरोप असून उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समृध्दी नांदावी या हेतूने तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या केम प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चर डेव्हल्पमेंट (इफाड) कडून यासाठी निधीची उपलब्धता झाली. परंतु, हा प्रकल्प शेतकऱ्यांपेक्षा या प्रकल्पातील संचालक तसेच कर्मचाऱ्यांचेच जीवन अधिक समृध्द करण्यात पूरक ठरल्याचा आरोप आहे. प्रकल्पातील निधीतून भरभक्‍कम पगाराची तरतूद स्वतःकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. त्यासोबतच कार्यालयात अनावश्‍यक सोयीसुविधांच्या उपलब्धतेवरही पैशाची उधळपट्टी केली गेली.   मोठ्या निधीची तरतूद असतानाही गणेश चौधरी अपवाद वगळता प्रकल्पाकरिता पूर्णवेळ संचालकांची नियुक्‍ती केली गेली नाही. त्याच गणेश चौधरींनी आपल्या कार्यकाळात ६ कोटी १२ लाख ३९ हजार ९३५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. १ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१७ या कालावधीत हा गैरव्यवहार करण्यात आला. याप्रकरणी लेखाधिकारी दिगंबर नेमाडे यांनी ३ जुलै २०१९ रोजी गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करुन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.  या काळात गणेश चौधरींनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली. त्याठिकाणी जामीन फेटाळण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायायालच्या नागपूर खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला. त्याठिकाणी देखील त्यांना दिलासा न मिळाल्याने त्यांनी सोमवारी (ता. २३) आर्थिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले.  न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता शुक्रवार (ता. २७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान शेगाव, वाशीम येथे झडती घेत त्यांनी केलेल्या कामाची पाहणी व संबंधितांची चौकशी करण्यात आली. गणेश चौधरी यांच्या पुणे येथील घराची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी करण्यात आली. चौकशीत नेमके काय समोर आले, याचा खुलासा मात्र गुन्हे शाखेने केला नाही.  दरम्यान, त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने ती वाढविण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com