कुलसचिवांच्या चौकशीला सुरुवात

कुलसचिवांच्या चौकशीला सुरुवात
कुलसचिवांच्या चौकशीला सुरुवात

पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या वादग्रस्त कुलसचिवांची गोपनीय चौकशी सोमवारपासून (ता. २४) सुरू करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विद्यमान शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.  राहुरी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांची निवड झाल्यापासून कायम वाद उद्भवत आहेत. मंत्रालयात तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वीच या कुलसचिवांची चौकशी करण्याचे आदेश कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांना देण्यात आले. “श्री. माने यांनी ही चौकशी डॉ. कौसडीकर यांच्याकडे सोपविली आहे. त्यांनी सोमवारपासून चौकशीला सुरुवात केली असून काही तक्रारदारांनी पुराव्यांसहित लेखी म्हणणे मांडले,” अशी माहिती सूत्रांनी दिली.  “नाशिकच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारीपदी कार्यरत असलेल्या कासार यांच्यावर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने दोनदा लाचखोरीची कारवाई केली आहे. लाचखोर कर्मचारी विद्यापीठाचा कुलसचिव म्हणून नियुक्त केला जात नाही. त्यामुळे परिषदेने आधी या कुलसचिवांना मुदतवाढ मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यानंतर चौकशीची कार्यवाही कितीही दिवस सुरू ठेवावी,” असे एका तक्रारदाराने स्पष्ट केले.   कृषी विद्यापीठांमध्ये कुलगुरूनंतर सर्वात महत्त्वाचे पद कुलसचिवांचे समजले जाते. त्यामुळे या पदासाठी मंत्रालयातून लॉबिंग करण्यात महसूल विभागाचे अधिकारी आघाडीवर असतात. कुलसचिवपद ताब्यात घेतल्यानंतर पदोन्नत्या, बदल्यांमध्ये आणि बांधकामांमध्ये रस घेत महसूल विभागाचे अधिकारी निघून जातात, असा विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांची तक्रार आहे. कृषी विद्यापीठांमध्ये महसूलऐवजी कृषी विभागातील चांगल्या अधिकाऱ्यांना संधी द्यावी, असाही मतप्रवाह आहे.  आधी कृषी परिषदेचा कारभार तपासा दरम्यान, कुलसचिवांची निवड हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय असताना कृषी परिषदेमार्फत सुरू असलेल्या चौकशीबाबत कुलसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. “कुलसचिव सोपान कासार यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने सर्व कागदपत्रे तपासूनच झाली आहे. त्यांच्याविरोधात कुभांड रचले जात आहे. मुळात चौकशीचा तोरा मिरवणाऱ्या कृषी परिषदेमधील  नियुक्त्या तरी कायद्याच्या चौकटीत झालेल्या नाहीत. मंत्रालयाने परिषदेतील भानगड दडपली आणि कासार यांची फाइल पुढे सरकवली आहे. त्यामुळे शासनाने आधी परिषदेचे आधी आपला कारभार तपासावा; मग कुलसचिवांच्या भानगडी पाहाव्यात,” असा टोला विद्यापीठातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लगावला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com