मराठवाड्यातील पिकांना कीडरोगांचा फटका

सोयाबीन, मका, मूग पाऊस नसल्याने संपले. बाजरीही केवळ २० टक्‍केच हाती आली. कपाशीला आता पाऊस आला, तरी ६० टक्‍के फटका बसणार आहे. तुरीची वाढ खुंटली आहे. पुन्हा पावसाने दडी मारली, तर तूर व कपाशीही हातची जाईल. मोसंबी व डाळिंबाच्या मृग बहारालाही मोठा फटका बसला आहे. - जयकिसन शिंदे, वरूडी ता. बदनापूर जि. जालना. अतिपावसाने मका सडत असून कणसाला कोंब फुटत आहेत. कपाशीच्या कैऱ्या काळ्या पडून सडत आहेत. हे पीक ९० टक्‍के पिवळे पडले आहे. आल्यामध्ये सडचे प्रमाण वाढले आहे. बाजरी व ज्वारी हवा व पाण्यामुळे खाली पडली आहे. त्यांनाही कोंब फुटत आहेत. वापसा नसल्याने पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. - ईश्‍वर पाटील, तिडका ता. सोयगाव जि. औरंगाबाद
मराठवाड्यातील पिकांना पावसासह कीडरोगांचा फटका
मराठवाड्यातील पिकांना पावसासह कीडरोगांचा फटका

औरंगाबाद : पेरणीलायक न झालेल्या पावसाने मराठवाड्यात उशिराने हजेरी लावली. दडी मारून बसलेला पाऊस थेट ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यातच आला. त्यामुळे मराठवाड्यातील मूग, उडीद, सोयाबीन, मका आदी पिकांना चांगलाच फटका बसला. कापूस अन्‌ तुरीचीही वाढ खुंटली आहे. याशिवाय कीडरोगांमुळेही पिकांचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे.

गतवर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे जवळपास ४७ लाख ८८ हजार ६५९ हेक्‍टरवरील खरीप बुडाला. यंदा पाऊस चांगला येईल, अशी अशा होती. परंतु, पुन्हा एकदा पावसाने आपल्या लहरीपणाचा परिचय दिला.

अपवादात्मक ठिकाणी थोडीबहूत हजेरी लावणाऱ्या पावसाने जवळपास ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुनरागमन केले. ते सार्वत्रिक व समाधानकारक असे नव्हतेच. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात यंदा ४७ लाख ४६ हजार हेक्‍टरवर असलेल्या खरीप पिकांचे भवितव्य धोक्‍यात सापडले. 

लष्करी अळीने चारा व नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या २ लाख ६९ हजार हेक्‍टरवरील मका पिकाचे नुकसान केले. पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्‍टरवरील मूग व १ लाख १३ हजार हेक्‍टरवर उडदाचे पिकंही जवळपास गेल्यात जमा आहे.  १९ लाख ९० हजार हेक्‍टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनला वाढीच्या अवस्थेत पावसाचा फटका बसला. फूलगळ व शेंगा पक्‍व न होण्यासह विविध कीडरोगांमुळे मोठा फटका बसला. 

जवळपास १५ लाख ६५ हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाच्या कायीक वाढीवरही पावसाने गरजेच्या वेळी दडी मारली.  ऑगस्ट अखेरपर्यंत चांगला पाऊस होईपर्यंत बहुतांश भागातील कपाशीने जमिनीच सोडली नव्हती. आता अलीकडे आलेल्या पावसामुळे कपाशी व तुरीने तगण्याचे काम केले.  तरीही त्याचा प्रत्यक्ष उत्पादनात किती लाभ होईल, हे तूर्त स्पष्ट होणे नाही.

पावसाच्या अनियमिततेमुळे जालना, बीड, लातूर वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित क्षेत्रावर लागवड झाली नाही. पावसाच्या अनियमिततेचा नेमका किती फटका प्रत्यक्ष उत्पादनात बसला, याविषयी पीक कापणी प्रयोगाअंतीच माहिती समोर येईल.  एकीकडे पावसाची ओढ, तर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावसारख्या तालुक्‍यात अतिपावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होणे सुरू आहे. 

मक्याचे आधीच लष्करी अळीने पोखरलेले पीक अतिपावसामुळे काळे पडून सडत आहे. कपाशीची बोंडेही काळी पडत असल्याचे चित्र सोयगाव तालुक्‍यात पहायला मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com