रावेरात हतनूर बॅकवाटरने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू

‘ॲग्रोवन’ने हतनूर बॅकवाटरने नुकसान झालेल्या क्षेत्राचा व नुकसानीचे पंचनामे करताना झालेल्या धरसोडीचा प्रकार समोर आणल्याने पंचनामे व्यवस्थित होत आहेत. कर्मचाऱ्यांनी थेट शेतात शेतकऱ्यांशी चर्चा करून पंचनामे केले आहेत. नुकसानभरपाई लवकर मिळावी, अशी अपेक्षा आहे. - विकास महाजन, नुकसानग्रस्त केळी उत्पादक, ऐनपूर, (जि. जळगाव)
केळी नुकसान
केळी नुकसान

जळगाव ः रावेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील हतनूर धरणाच्या बॅकवाटरने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. तलाठी थेट शेतात जाऊन नुकसानीची माहिती घेत असून, बुधवारी (ता. ७) नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती आहे. 

नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करताना धरसोड केली जात असल्याचा मुद्दा ‘ॲग्रोवन’ने समोर आणला होता. या संदर्भात ४ ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे हाती घेतले आहेत. रावेरातील ऐनपूर, खिरवड, निंबोल, विटवा, निंभोरासीम आदी नऊ गावांमधील केळी, पेरू व इतर बागांचे हतनूर धरणाच्या बॅकवाटरचे पाणी शिरल्याने नुकसान झाले होते. मागील आठवड्यात सतत तीन-चार दिवस पाणी बागांमध्ये शिरले. रावेरातील सुमारे ७०० ते ८०० एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान त्यात झाल्याचे शेतकरी, जाणकारांचे म्हणणे होते. परंतु तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्र हे प्रकल्पासाठी संपादित केल्याचे दावे पंचनामे करण्यापूर्वीच केले होते. तर काही ठिकाणी तलाठ्यांनी गावात बसून नुकसानग्रस्त क्षेत्राची माहिती तयार करायला सुरवात केली होती. 

याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ऐनपूर येथील शेतकऱ्यांनी प्रकल्पाखालील क्षेत्राव्यतिरिक्त इतर भागातही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत शनिवारी (ता. ३) रावेर तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनही सादर केले होते. प्रशासनाने शेतकऱ्यांची नाराजी व तक्रारी लक्षात घेता पंचनामे सोमवारी (ता. ५) हाती घेतले. मंगळवारी (ता. ६) देखील काही भागांत पंचनामे झाले. यात पिकांचे नुकसान, बंद झालेले शेतरस्ते या संदर्भातील मुद्दे घेतले जात आहेत. शेतकऱ्यांशीदेखील प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी चर्चा केली व शेतात जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानीसंबंधी आपल्याशी संपर्क साधण्याच्या सूचनाही विविध गावांमध्ये कर्मचाऱ्यांनी दिल्या. नुकसानीचा अहवाल बुधवारी प्रशासनाकडे प्राप्त होईल, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com