सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळा'ची मंत्र्यांच्या चष्म्यातून पाहणी

जिल्ह्यातील ‘दुष्काळा'ची मंत्र्यांच्या चष्म्यातून पाहणी
जिल्ह्यातील ‘दुष्काळा'ची मंत्र्यांच्या चष्म्यातून पाहणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती वरचेवर गडद होत असताना, शासनाच्या नियम, निकषाच्या लालफितीच्या कारभारामुळे दुष्काळाच्या घोषणेसाठी विलंब होत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना आपापल्या भागातील परिस्थिती पाहून अहवाल देण्याचे आदेश दिल्याने सोलापुरातही पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यासाठी खास कार्यक्रम आखला आहे. हे दोन्ही मंत्री आता थेट बांधावर जाऊन त्यांच्या चष्म्यातून दुष्काळाची पाहणी करुन अहवाल देणार आहेत.

दर दोन-तीन वर्षानी दुष्काळाची छाया जिल्ह्यावर पडते. यंदा पुन्हा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावणार आहे. तातडीने यावर उपाययोजना केल्या नाहीत, तर नियोजनाअभावी दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात पडणाऱ्या एकूण पावसापैकी केवळ ३८ टक्‍क्‍यांपर्यंतच यंदा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. त्यात दुष्काळासाठी नियम, निकष आणि अटी वाढवण्यात आल्याने तो नेहमीप्रमाणे ‘सरकारी कागदा''त अडकला आहे. आता मंत्र्यांनाच थेट पाहणी करुन गावपातळीवरची परिस्थिती पाहण्याचे आदेश दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने सर्व मंत्री कामाला लागले आहेत. त्यात सोलापुरातही मंत्र्यानी चांगलीच तयारी केली आहे. स्वतः पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाच तालुक्‍यातील गावांची, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख सहा तालुक्‍यांची पाहणी करतील.

सहकारमंत्री देशमुख हे आजपासून (ता.१२) दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील चार गावांची पाहणी करुन या कार्यक्रमाची सुरवात करणार आहेत. पालकमंत्री देशमुख हे शनिवारपासून दुष्काळाची पाहणी करणार आहेत. ते अक्कलकोट, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा व पंढरपूर, तर सहकारमंत्री करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावांची पाहणी करतील. गावांची निवड जिल्हाधिकारी करणार असून दौऱ्यात संबंधित तालुक्‍याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व इतर यंत्रणा असणार आहे. प्रामुख्याने खरिप पिकांची स्थिती, रब्बीची तयारी, पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याची सोय, या अनुषंगाने मंत्री त्यांच्या चष्म्यातून हा दुष्काळ पाहतील. त्याशिवाय चारा उपलब्धतेची स्थिती, पाणीपुरवठ्याच्या योजना, त्यांची स्थिती आदींबाबतही ते आढावा घेतील. त्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल पुन्हा मुख्यमंत्री पाहणार आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com