गहू, हरभरा, कांदा पिकासाठी विमा योजना

गहू, हरभरा, कांदा पिकासाठी विमा योजना
गहू, हरभरा, कांदा पिकासाठी विमा योजना

अकोला ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगामासाठी राबवली जाणार असून, याअंतर्गत गहू, हरभरा व कांदा पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. रब्बी पिकांसाठी ३१ डिसेंबर; तर उन्हाळी पिकांसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत सहभाग घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा बंधनकारक असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक आहे.

अकोला जिल्ह्यात पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरंन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, सचिव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ आहेत. श्री. वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजनेत समाविष्ट केलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना वेगवेगळा विमा हप्ता भरावा लागणार आहे. गहू (बागायती) पिकासाठी शेतकऱ्याला हेक्टरी ५२५ रुपये, हरभरा पिकासाठी ३६० रुपये, रब्बी कांद्यासाठी ३६५० रुपये; तर उन्हाळी भुईमुगासाठी हेक्टरी ५७० रुपये भरावे लागणार आहेत. गहू व हरभरा पिकाला जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांत पीकविमा लागू करण्यात आला आहे. 

कांदा पिकासाठी बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोला, अकोट, तेल्हारा; तर भुईमुगासाठी अकोट, पातूर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान भरपाई, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्‍चित करणे, काढणीपश्‍चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या परिस्थितीत विमासंरक्षण मिळणार आहे.योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी नजीकच्या उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वाघ यांनी केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com