विमा परताव्याप्रश्‍नी द्राक्ष बागायतदार आक्रमक

विमा परताव्याप्रश्‍नी द्राक्ष बागायतदार आक्रमक
विमा परताव्याप्रश्‍नी द्राक्ष बागायतदार आक्रमक

जालना : विमा परताव्याप्रश्‍नी जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार आक्रमक झाले आहेत. विमा रक्‍कम भरून घेताना परतावा हेक्‍टरी ३ लाख ८ हजार प्रतिहेक्‍टर कबूल केला. परंतु प्रत्यक्षात खात्यात हेक्‍टरी ४ हजारच जमा करून फसवणूक केल्याचा आरोप बागायतदारांनी केला. या प्रकरणी न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

या संदर्भात शेतकऱ्यांनी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्याकडे बुधवारी (ता. २८) निवेदन सादर केले. त्यानुसार, जालना जिल्ह्यात सतत दुष्काळ पडत असल्याने फळबागा वाचविणे व उत्पादन काढणे अवघड झाले आहे. अशातच २०१८-१९ मध्ये द्राक्ष पिकाला संरक्षण मिळावे म्हणून विमा उतरविला.

पाण्याअभावी द्राक्ष बागांचे शंभर टक्‍के नुकसान झाले. या पीकविम्यामध्ये हेक्‍टरी शेतकरी व शासन अशी ५० हजार ८२० रुपये एवढी रक्‍कम विमा कंपनीने वसूल केली. त्या वेळी विमा नुकसानभरपाई ३ लाख ८ हजार रुपये देणे असे पावतीवरती कबूल केले. परंतु विमा परतावा देताना हेक्‍टरी ४ हजार रुपये खात्यावर जमा केले. 

ही रक्‍कम म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असून, अन्याय करणारी आहे. दुष्काळाने हैराण असताना कंपन्या स्वतःचे फायदे करून शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून न्याय द्यावा. येत्या आठवडाभरात न्याय न दिल्यास उपोषणाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

विमा परताव्याप्रकरणी अन्याय झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नंदापूर, कडवंची, धारकल्याण, वरूड, रामनगर, बठाण, सावरगाव, गोलापांगरी,  नाव्हा, वडगाव, वखारी आदी गावांतील जवळपास ४०० ते ५०० शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती निवेदनकर्ते शेतकरी ज्ञानेश्‍वर उबाळे यांनी दिली. 

निवेदन देतेवेळी नकुल उगले, संतोष उबाळे, रामेश्‍वर उबाळे, अरुण उबाळे, भानुदास उबाळे, लक्ष्मण चव्हाण, अमोल खरात आदींची उपस्थिती होती. निवेदनावर जवळपास ४० द्राक्ष उत्पादकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. द्राक्ष उत्पादकांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित विमा कंपनीने येत्या ४ व ५ सप्टेंबरला प्रत्येक तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या तक्रारीवर प्रलंबित दाव्यांप्रकरणी फेरतपासणी शिबिर आयोजित केल्याची माहिती निवेदनकर्त्या शेतकऱ्यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com