अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

ज्वारी, मका पिकांवर अमेरिकन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही कीड अल्प कालावधीत पिकाचे मोठे नुकसान करते. सध्या पेरणी झालेल्या काही भागात या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
fall Army worm
fall Army worm

मागील दोन वर्षांपासून ज्वारी, मका पिकांवर अमेरिकन  लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही कीड अल्प कालावधीत पिकाचे मोठे नुकसान करते. सध्या पेरणी झालेल्या काही भागात या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  अमेरिकन लष्करी अळी  (फॉल आर्मी वर्म) शास्त्रीय नाव : स्पोडोप्टेरा फ्रुगीपेर्डा ओळख 

  • अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांमधून जातो. 
  • मादी पानाच्या खालील बाजूस मळकट पांढरी घुमटाच्या आकाराची पुंजक्यामध्ये १००-२०० अंडी घालते. 
  • अळी - ही अवस्था सहा अवस्थांमधून पूर्ण होते. प्रथम अवस्थेतील अळ्या हिरव्या व डोके काळ्या रंगाचे असून, अंगावर वरच्या बाजूने तीन पिवळ्या रंगाच्या रेषा असतात. डोक्याच्या पुढील बाजुस उलट इंग्रजी ‘Y’ आकाराची खूण व शरीराच्या शेवटी आठव्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारात चार ठिपके असतात. त्यात केसही आढळतात. अळीचा जीवनक्रम ३२ ते ४६ दिवसांत पूर्ण होतो.
  • कोष - पूर्ण वाढ झालेली अळी ६ ते ८ सेंटिमीटर जमिनीत जाऊन मातीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ ते १२ दिवसांत पूर्ण होते.
  • पतंग - नर पतंग राखाडी ते तपकिरी, पुढील पंखांच्या वरच्या कडेला त्रिकोणी आकारात पांढरा ठिपका, मादी पतंगाचे पुढील पंख राखाडी असतात. नर व मादीमध्ये मागील पंख सोनेरी पांढऱ्या रंगाचे असतात. पतंग अवस्था चार ते सहा दिवसांची असते.
  • नुकसानीचा प्रकार 

  • रोपावस्थेत पहिल्या दोन अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात, त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. नंतरच्या अवस्थेतील अळ्या पोंग्यामध्ये प्रवेश करून पाने खातात. पाने कुरतडल्यासारखी दिसतात. अळी पानाच्या खाली चिकट धाग्याच्या साह्याने लोंबकळते व वाऱ्याने उडून नजीकच्या झाडावर पोहोचते, याला बलूनिंग (Balloning) असे म्हणतात. 
  • पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची आहेत. 
  • शेतात निरीक्षण कसे करावे?

  • शेताचे दररोज निरीक्षण करावे. 
  • बाहेरील बाजूच्या ३ ते ४ ओळी सोडून शेतातून इंग्रजी डब्ल्यू (W) आकारात चालावे. या आकारातील प्रत्येक ओळीतील पाच अशी एकूण वीस झाडे निवडावीत. त्यापैकी किती झाडांवर प्रादुर्भाव आहे, याची नोंद घ्यावी. 
  • वीस झाडांपैकी दोन झाडे प्रादुर्भावात असल्यास, नुकसान पातळी १० टक्के आहे असल्याचे समजावे.
  • एकात्मिक व्यवस्थापन मशागतीय पद्धती

  • एकाच वेळी पिकाची पेरणी करावी. टप्प्याटप्प्याने पेरणी करणे टाळावे.
  • बीजप्रक्रिया :  सायॲन्ट्रानिलीप्रोल (१९.८ टक्के) अधिक थायामिथोक्झाम (१९.८ एफएस) ६ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
  • पिकाची फेरपालट करावी. एकाच शेतात वारंवार मका पीक घेण्याचे टाळावे.
  • पिकाभोवती नेपियर गवताच्या ३ ते ४ ओळी लावाव्यात. 
  • मित्र कीटकांना आकर्षित करण्यासाठी शेताच्या बांधावर झेंडू, कोथिंबीर, सूर्यफूल व तीळ या पिकांची लागवड करावी.
  • रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा अतिरिक्त वापर टाळावा.
  • यांत्रिक पद्धती

  • पेरणीनंतर त्वरित एकरी दहा पक्षी थांबे उभारावेत.
  • पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील मोठ्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
  • किडीच्या सर्वेक्षणासाठी एकरी पाच, नियंत्रणासाठी १५ कामगंध सापळे लावावेत. 
  • जैविक पद्धती

  • सुरुवातीच्या वाढीच्या काळात निंबोळी अर्क (५ टक्के) ५ मि.लि. किंवा ॲझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) २.५ मि.लि. प्रति लिटर पाणी फवारणी करावी. 
  • प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक नोमुरिया रिलाई ४ ग्रॅम किंवा मेटाऱ्हाझिम ॲनिसोपली ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • ट्रायकोग्रामा प्रिटीओसम परोपजिवीग्रस्त ५० हजार अंडी प्रति एकर या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने तीन वेळा सोडावीत.
  • रासायनिक नियंत्रण 

  • प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास कीटकनाशकाची द्रावण पोंग्यात जाईल, अशा प्रकारे फवारणी करावी. 
  • १०-२० टक्के नुकसान असल्यास (फवारणी प्रमाण ः प्रति लिटर पाणी)
  •  इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ४ ग्रॅम किंवा 
  • थायामिथॉक्झाम (१२.६ टक्के) अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि किंवा 
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) ०.४ मि.लि. किंवा
  • स्पायनेटोरम (११.७ एससी) ०.९ मि.लि.
  • संपर्क ः डॉ. संजोग बोकन (संशोधन सहयोगी), ९९२१७५२००० डॉ. बसवराज भेदे, (सहायक प्राध्यापक), ७५८८०८२०२८ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com