असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

integrated management of Rougos spiriling white fly
integrated management of Rougos spiriling white fly

थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाल्यावर रुगोज चक्राकार माशीचा प्रादुर्भाव वाढतो. थंडी कमी होत जाताना किडीचा प्रादुर्भावही कमी होताना दिसतो. सध्या वाढत असून, किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.  नारळ पिकावर रुगोज चक्राकार माशीचा प्रादुर्भाव सद्यःस्थितीमध्ये सर्वत्र दिसून येत आहे. या किडीची नोंद महाराष्ट्रामधील कोकण भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. नारळासोबत अन्य पिकांवरही ती आढळली असली, तरी तिचा जीवनक्रम फक्त नारळ व केळी या पिकांवर पूर्ण होताना दिसून येत आहे. रुगोज चक्राकार पांढरी माशी (शा. नाव ः Aleurodicus rugioperculaturs) या किडीचा प्रादुर्भाव नारळावर २०१६ मध्ये पोलाची (तमिळनाडू) व पोलाक्कड (केरळ) या राज्यांत प्रथम आढळला. त्यानंतर गत दोन वर्षांत कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात व महाराष्‍ट्र या राज्यांतही किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले. या किडीचा प्रसार बागेशेजारून रस्त्यावरून वाहनाद्वारे, वाऱ्यामार्फत, प्राणी, पक्ष्यांमार्फत होतो. फळांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक आणि आयात निर्यातीतून होतो. किडीची ओळख

  • रुगोज चक्राकार पांढरी माशी ही रसशोषक कीड आहे. ही माशी २.५ मिमी लांबीची; परंतु कपाशी पिकावरील पांढऱ्या माशीपेक्षा आकाराने मोठी असते. माशीच्या पंखाच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे असून, डोळे राखाडी असतात. नर आकाराने मादीपेक्षा लहान असतो.  
  • अंडी लंबवर्तुळाकार, पिवळसर रंगाची ०.३ मिमी लांबीची असतात. चक्राकार घातलेली ही अंडी मेणचट पांढरट आवरणाने झाकलेली असतात. म्हणून तिला ‘चक्राकार पांढरी माशी’ म्हणतात.  
  • या किडीच्या प्रथमावस्थेला पाय असून, ती हालचाल करू शकते.  
  • प्रौढावस्था अंडाकृती असून, पांढरट पिवळसर रंगाची असते. त्यावर पांढरे मेणासारखे आवरण दिसून येते. प्रौढ माशीच्या शरीराच्या खालील बाजूच्या ग्रंथीमधून स्राव बाहेर येत असतो.  
  • कोष १ मिमी लांबीचा असतो. प्रौढ माशी साधारणतः ३२ अंडी देते.  
  • अंडीवस्था ७ दिवसांची असते. पिले १२-१४ दिवस, तर प्रौढ १३ ते २२ दिवस जगतात.
  • नुकसान करण्याची पद्धत  

  • या किडीची पिले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूस रस शोषतात.  
  • चक्राकार पांढरी माशीच्या शरीरातून स्रवणाऱ्या गोड चिकट स्रावाकडे मुंग्या आकर्षित होतात. त्यांच्यामुळे स्राव सर्वत्र पानावर पसरतो. पानावरील स्रावावर कालांतराने काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. किडीच्या अधिक तीव्र प्रादुर्भावामध्ये नारळ फळांवरसुद्धा ‘चक्राकार आवरणात अंडी’ व प्रौढ दिसून येतात.  
  • कीटकनाशकाच्या अवाजवी वापरामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे पोलाची (तमिळनाडू) येथे आढळले आहे.
  • प्रादुर्भाव ओळखण्यासाठी 

  • अपरिपक्व झावळ्यांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.  
  • पानाच्या खालील बाजूस चक्राकार अंडी आढळतात.  
  • पानांवर काळ्या बुरशीची वाढ दिसून येते.  
  • मेणासारख्या चिकट आवरणात पिले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूस दिसून येतात.
  • पर्यायी खाद्य वनस्पतीवर नोंद: या किडीची नोंद ४३ कुळातील ११८ वनस्पतीवर दिसून आली आहे. त्यात केळी, पेरू, सीताफळ, आंबा, काजू, कोको यासह काही शोभिवंत वनस्पतीवरसुद्धा प्रादुर्भाव दिसून आला आहे. व्यवस्थापन

  • चक्राकार रुगोज माशी प्रादुर्भावग्रस्त बागेमध्ये नैसर्गिकरीत्या परोपजीवी कीटक उदा. इन्कार्सिया, मिरीड ढेेकूण, क्रायसोप्रीड; डायक्रोकायसा, ढाल किडा, क्रिप्टोलिमस दिसून येतात. हे आढळल्यास कीटकनाशकांची फवारणी टाळावी. त्याऐवजी फक्त पाण्याची फवारणी किंवा डिटर्जंट किंवा स्टार्च सोल्यूशन फवारावे.  
  • प्रादुर्भावित रोपे, फळे व शहाळे इत्यांदीची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू नये.  
  • प्रादुर्भावित पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. प्रादुर्भावानुसार वेळीच उपाययोजना करता येतात.  
  • चक्राकार पांढऱ्या माशीच्या बंदोबस्तासाठी नियमित पिकावर पाण्याची फवारणी करावी.  
  • अन्य क्षेत्रामध्ये इनकार्सिया परोपजीवी कीटक आढळत असल्यास ते गोळा करून प्रादुर्भावित बागेत सोडावेत. इन्कार्सिया हा परोपजीवी मित्र कीटक संवर्धनातून रुगोज चक्राकार पांढरी माशीचे व्यवस्थापन प्रभावीपणे होते.  
  • या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमध्ये अधिक असल्यास अन्यत्र प्रसार टाळण्यासाठी तिथे फवारणी करावी. फवारणी प्रति १० लिटर पाणी  
  • इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस. एल.) ३ मिली किंवा
  • निम ऑईल ३० मिली.  
  • पानावरील काळ्या बुरशीच्या व्यवस्थापनासाठी स्टार्च सोल्यूशन (०१ टक्के) फवारावे.
  • चक्राकार पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे माडांच्या खोडाला बांधावेत.  
  • पानावरील काळ्या बुरशीवर लेइओचिनस निलगिरीॲनस उपजीविका करतात. त्यांचे संवर्धन बागेत करावे.  
  • जास्त पाऊस व कमी तापमान असलेल्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळून येते.  
  • या किडीच्या व्यवस्थापनासाठी कोणतेही कीटकनाशक फारसे प्रभावी ठरत नाही. कारण, या किडीच्या वर्षामध्ये अनेक पिढ्या, उपलब्ध असलेली पर्यायी पिके आणि झाडांवर फवारणी करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. हे गरजेचे आहे.  
  • कीटकनाशकमुक्त क्षेत्र’ या तंत्रामुळे गतवर्षीच्या ८० टक्के प्रादुर्भावाच्या तुलनेमध्ये या वर्षी केवळ ४६.४१ टक्के इतकी कमी नोंद झल्याचे आढळले आहे.  
  • १५ दिवसांच्या अंतराने निंबोळी तेल (०.५ टक्के प्रवाही) ३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने प्रेशर पंपाने तीन फवारण्या कराव्यात. त्यासोबत बागेत पिवळे चिकट सापळे वापरल्यास या किडीचे ५० टक्क्यांपर्यंत व्यवस्थापन झाल्याचे दिसून आले आहे.
  • नोंद इमिडाक्लोप्रीड व निमऑईल या घटकांना लेबलक्लेम नाही. तथापि आयसीआर ची शिफारस आहे.  इमिडाक्लोप्रीड चा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा. फवारणीनंतर किमान ४५ दिवस फळे/शहाळे खाण्यासाठी काढू नयेत. संपर्क ः डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२ ०२३५२-२५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com