सोयाबीन पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या वेगवगेळ्या किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये मोठी घट होते. या किंडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.
pest on soybean crops
pest on soybean crops

सोयाबीन पिकात ९० ते ११० दिवसात येणाऱ्या  वेगवगेळ्या किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये मोठी घट होते. या किंडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. सोयाबीन हे एक मुख्य तेलबिया पीक असून, खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एकूण तेल उत्पादनापैकी सुमारे ५८% वाटा हा सोयाबीन तेलाचा असून, एकूण प्रथिनांपैकी ६०% प्रथिने सोयाबीनमधून उपलब्ध होतात. ९० ते ११० दिवसात येणाऱ्या या पिकांवर वेगवगेळ्या किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये मोठी घट होते. या किंडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. तंबाखूवरील पानें खाणारी अळी  शास्त्रीय नाव - स्पोडोप्टेरा लिट्युरा. ही कीड बहुभक्षी असून अनेक पिकांवर प्रादुर्भाव दिसून येतो. प्रौढ पतंग २-३ सें.मी.असून फिकट भुरकट रंगाचा असतो, त्याच्या पंखांवरील पांढऱ्या रंगाच्या वेड्या-वाकड्या रेषा असतात. खालच्या बाजूचे पंख पांढरे असतात. नुकसानीचा प्रकार आणि जीवनक्रम 

  • प्रौढ मादी तिच्या आयुष्यात १२०० ते २००० अंडी २०० ते २५० च्या पुंजक्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूस घालते. त्यावर गुलाबी रंगाची तंतुमय लव आच्छदलेली असते.
  • अंड्यातून निघालेल्या लहान अळ्या एका पानावर १०० ते १५० इतक्या समूहाने पानातील हरितद्रव्ये खातात. पातळ कागदासारखी जाळी झालेली पाने शेतात दिसू लागतात. अशी जाळीदार पाने दिसताच या किडीचा प्रादुर्भाव असल्याचे ओळखावे.
  • पूर्ण विकसित झालेल्या अळ्या हिरवट, भुरकट, मळकट केशरी रंगाच्या असतात. या अळीच्या शरीरावर दोन फिक्कट पट्टे असून शरीराच्या प्रत्येक खंडावर दोन्ही बाजूंनी काळ्या रंगाचे ठिपके दिसतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब असते. मोठ्या अळ्या स्वतंत्रपणे पाने खात केवळ शिरा शिल्लक ठेवतात.
  • या किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना, शेंगा तयार होताना झाल्यास फुले व शेंगा खाऊन नुकसान करतात.
  • या किडीचा कोष जमिनीवर पडलेल्या पानांमध्ये तयार होतो.
  • आर्थिक नुकसान पातळी  १० अळ्या प्रति मीटर फुले येण्याच्या आधीच्या अवस्थेत व ३ अळ्या प्रति मीटर शेंगा लागण्याच्या वेळी आढळल्यास. व्यवस्थापन

  • या किडीच्या अळ्या सुरवातीला पानांवर समूहाने राहतात. अशी पाने त्याचवेळी तोडून नष्ट करावीत.
  • या किडीचे नर पतंग आकर्षित करण्यासाठी एकरी चार कामगंध सापळे लावावेत.
  • रासायनिक नियंत्रण

  • स्पिनेटोरॅम (११.७% एस. सी.) ४५० मि. लि. प्रती हेक्टर किंवा
  • क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (२० एस. सी.) १०० मि. लि. प्रती हेक्टर.
  • खोडमाशी  ही प्रौढ माशी घरमाशी सारखी मात्र, आकाराने लहान (फक्त २ मि. मी.) व चमकदार काळ्या रंगाची असते.

  • प्रौढ मादीमाशी झाडाच्या देठावर व पानावर पिवळसर रंगाची अंडी घालते.
  • अंड्यातून २-५ दिवसांनी पाय नसलेली अळी बाहेर पडते. त्या अळीचा रंग पांढरा असतो. अळी बाहेर पडताच ती पानाच्या देठात शिरकाव करते. आतील भाग पोखरून खाते. या किडीचा पादुर्भाव रोपावस्थेत झाल्यास रोपांच्या संख्येत घट होते. तीव्र प्रादुर्भावामुळे दुबार पेरणीची वेळ येते. अन्यथा उत्पादनात मोठी घट होते.
  • नुकसानीचा प्रकार व जीवनक्रम 

  • उगवणीपासून ७-१० दिवसापर्यंत या किडीचा पादुर्भाव अधिक दिसून येतो. प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडतात, सुकतात आणि मरून जातात. -पिकांच्या नंतरच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास पिके पिवळी पडत नाहीत. मात्र, शेंगाच्या संख्येत घट होते. दाणे व वजन कमी भरते. उत्पादनात घट होते.
  • या किडीचा जीवनक्रम १०-११ दिवसांत पूर्ण होतो. त्याअगोदर सोयाबीनच्या झाडाला पाडलेल्या छिद्रामध्ये कोषात जाते. थोड्या दिवसानंतर कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते. आपला जीवनचक्र सुरु करते.
  • रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रती लीटर पाणी )

  • इथिऑन (५० इ. सी.) ३ मि. लि. किंवा
  • इन्डोक्झाकार्ब (१५.८ इ. सी.) ०.६६६ मि. लि. किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी. एस.) ०.६ मि. लि.
  • पांढरी माशी 

  • पांढरी माशी साधारणतः ०.८-१.० मि. मि लांबीची असते. शरीर व दोन्ही पंखांच्या जोड्या पांढऱ्या ते पिवळसर रंगाच्या भुकटी सारख्या मेणाच्या स्रावाने आच्छादलेले असते. त्या बहुदा पानाच्या खालच्या बाजूला आढळतात. झाड हलवल्यास पांढरी माशी थव्याने उडते.
  • माशी पानाच्या खालील बाजूला अंडी घालते.
  • पिल्ले पिवळी ते पांढरी रंगाची चपटी आकाराची असते. पिकाशिवाय अन्य यजमान वनस्पती किंवा तणांवर अन्य वेळी उपजीविका करते. त्यामुळे योग्य प्रकारे तणनियंत्रण केल्यास प्रादुर्भाव आटोक्यात ठेवणे शक्य होते.
  • नुकसानीचा प्रकार व जीवनक्रम या किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडतात. पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची पाने गोळा होतात किंवा वाटीसारखी होऊन विकृत होतात. झाडाच्या पानावर व खोडावर बुरशींची वाढ होते. पांढऱ्या माशीने झाडातील रस शोषून घेतल्याने झाडाची वाढ खुंटते. नियंत्रण 

  • एकरी २० याप्रमाणे पिवळे चिकट सापळे सोयाबीन शेतात लावावेत.
  • पांढऱ्या माशीला आकर्षित करणारी किंवा प्रतिबंध करणारी सापळा किंवा आश्रय पिके लावावीत.
  • मका, ज्वारी आणि बाजरी या सारखी उंच पिके पिकाच्या कडेने दाट लावावीत.
  • कोवळ्या रोपांवर पांढऱ्या माशीचा लवकर प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कोवळ्या रोपांचे जास्त निरीक्षण करावे.
  • चक्री भुंगा  प्रौढ किड ही नारंगी रंगाची असून, पंखांच्या खालील भाग काळा असतो. अँटेना शरीराच्या लांबीइतक्याच व मागच्या बाजूला वळलेल्या असतात. भुंगे गर्द भुरकट काळ्या पंखांमुळे लगेच ओळखता येतात. पूर्ण विकसित अळी ही २ सें. मी. लांबीची असते. या किडीची अळी पाय विरहित व पिवळ्या रंगाची असते. नुकसानीचा प्रकार व जिवनक्रम  यामध्ये मादी तीन छिद्रे करते. एकामध्ये ती अंडी घालते. किडीचा मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्राकार भाग तयार करते. थोड्या दिवसानंतर अळी अंड्यातून बाहेर निघून पानाच्या देठात शिरते. आतील भाग खाऊन झाड पोकळ बनवते. अळी १९-२२ मि. मि. लांब गुळगुळीत पिवळसर रंगाची असते. नियंत्रण  आर्थिक नुकसानीची पातळी - फुलोऱ्यापूर्वी ३-५ चक्रीभुंगे प्रति ओळीत आढळल्यास. फवारणी प्रती लीटर पाणी

  • प्रोफेनोफॉस (५० इ. सी.) २ मि. लि. किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० झेडसी) ०. २५ मि. लि.
  • संपर्क-   डॉ. संदीप आगळे, ८२०८९४३४५९ (लेखक संशोधन व सल्ला विषयक खासगी कंपनीमध्ये नागपूर येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com