‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके धोक्यात येणार

काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यामुळे तणनाशक वापराकडे शेतकरी वळतील. अशा वेळी कपाशीमधील आंतरपिके धोक्यात येऊ शकतात.
cotton inter crop
cotton inter crop

पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (एचटीबीटी) बियाण्यामुळे तणनाशक वापराकडे शेतकरी वळतील. अशा वेळी कपाशीमधील आंतरपिके धोक्यात येऊ शकतात. त्याचा सर्वांत मोठा फटका तूर उत्पादनाला बसेल, असा इशारा बियाणे उद्योगाने दिला आहे. यंदा काळ्याबाजारातून ‘एचटीबीटी’ची ५० लाख पाकिटे शेतकऱ्यांच्या हातात पडल्याचा अंदाज भारतीय बियाणे संघटनेने (एनएसएआय) व्यक्त केला आहे. मूळ संकरित कपाशीच्या बियाण्यांमध्ये ‘एचटीबीटी’ची मोठ्या प्रमाणात भेसळ झाली आहे. ही भेसळ जितकी वाढेल तितका भविष्यात ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर अपरिहार्य ठरणार आहे. मात्र, तणनाशकामुळे कपाशीतील आंतरपीक शेती आपोआप संपुष्टात येईल, असा शास्त्रीय मुद्दा संघटनेने मांडला आहे. केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांना बियाणे संघटनेने एका पत्रात ‘एचटीबीटी’च्या संकटाची माहिती दिली आहे. ‘एचटीबीटी’मुळे सर्वांत जास्त धोका आंध्र प्रदेशातील बियाणे कंपन्यांसमोर उभा राहिला आहे. तेथे बीटी संकरित कपाशीचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात होते. बीजोत्पादन किंवा विक्रीचा परवाना न घेता आंध्र प्रदेशसहीत काही राज्यात ‘एचटीबीटी’ बियाणे विकले जात आहे. ‘‘आंध्रमधील चांगल्या कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ‘एचटीबीटी’ आढळते आहे. संकरित बीटी कपाशीचे बीजोत्पादन करणाऱ्या दर्जेदार कंपन्यांच्या बियाण्यात ही भेसळ नैसर्गिक परागीभवन किंवा इतर कारणांमुळे होते आहे. भेसळ आढळली तरी शेतकऱ्याला तणनाशक मारण्याचा सल्ला कंपन्यांना देता येणार नाही. कारण, त्यामुळे कपाशीचे इतर पीक नष्ट होऊन हानी होण्याचा धोका आहे,’’ असे बियाणे उद्योगाने केंद्राला कळविले आहे. भारतीय बियाणे संघटनेने केंद्राला याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, उपाय न केल्याने ‘एचटीबीटी’चे संकट आता प्रथम आंध्रात उफाळून आले आहे. ‘‘आंध्र प्रदेशात दोन प्रकारचे वर्ग दिसत आहेत. चांगल्या कंपन्यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल न करता फक्त बियाणे जप्त करून ते नष्ट करावे. बियाणे उद्योगातील चांगल्या कंपन्यांची बदनामी टाळ्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक बियाणे प्लॉटचे नमुने विक्रीपूर्वी तपासावेत,’’ असे संघटनेचे म्हणणे आहे. बियाणे उद्योगात तयार झाले दोन गट बीटी कपाशीच्या वाणात हेतूतः ९० टक्के एचटी बियाणे टाकून अनधिकृतपणे बीजोत्पादन करणारा एक  छुपा गट व त्याच्या विरूध्द चांगल्या दर्जाचे संकरित कपाशी बीजोत्पादन करणारा नामांकित कंपन्यांचा गट असा सामना सुरू झाला आहे. यातील ‘‘दुसऱ्या गटातील कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये भेसळीचे प्रमाण नगण्य असल्यास संबंधित कंपनीला व्यावसायिक भूमिकेतून ‘एचटीबीटी’ बियाणे विकायचे नव्हते; तर अपघाताने ही भेसळ होत असल्याची भूमिका शासनाने घ्यावी व गुन्हा दाखल करू नये. कारण परपरागीभवन, बीजप्रक्रियेत किंवा जिनिंगमध्ये चुकून एकत्रीकरण होणे किंवा इतर कारणांमुळेही भेसळ आढळू शकते,’’ असे बियाणे उद्योगाचे म्हणणे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com