बांबूविषयक संशोधनाला प्रोत्साहनासाठी उपाययोजना आवश्यक ः राज्यपाल

बांबू प्रक्रिया यंत्रणेची पाहाणी
बांबू प्रक्रिया यंत्रणेची पाहाणी

पुणे  ः बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण कारागीरांसह आदिवासी आणि शेतकरी तरुण राेजगारनिर्मितीतून आर्थिक समृद्ध होईल. या क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्र आणि ग्रंथालय इमारतीच्या विस्तारित इमारतीचे शुक्रवारी (ता. ५) उद्‍घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. या वेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम उपस्थित होते.

यावेळी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, की बांबू हा खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष असून सामान्य माणसाला समृद्ध करण्याची ताकद यामध्ये आहे. रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी या क्षेत्रात कौशल्यवृद्धी करणे आवश्यक असून त्या दृष्टीने राज्य सरकार आणखी प्रयत्न करत आहे.

या वेळी पुणे विद्यापीठाबराेबर अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राचे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‍घाटन करण्यात आले. तसेच राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठ, अमरावती व राहुरी विद्यापीठांबरोबर बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राशी सामंजस्य करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

या वेळी प्रशिक्षण केंद्रातून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण केंद्राच्या वतीने विविध वस्तूंच्या प्रदर्शनाची पाहणी या वेळी श्री. राव यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com