इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात सुधारणा

इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात सुधारणा
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात सुधारणा

पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यासाठी ही योग्य दरपातळी आहे, किमान निम्मा माल या किमतीला विकून टाकणे शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.  केंद्र सरकारने यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनला प्रतिक्विंटल ३३९९ रुपये किमान आधारभूत किंमत जाहीर केली. परंतु नोव्हेंबरमध्ये राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ३१०० ते ३३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता. दिवाळीच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना मातीमोल भावात सोयाबीन विकावे लागले होते. ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या आशेने माल साठवून ठेवला, त्यांना याचा लाभ होणार आहे.  अमेरिकेने इराणवर निर्बंध घातल्यामुळे इराणने भारताकडून वस्तुविनिमय पद्धतीनुसार तेलाच्या बदल्यात सोयापेंड, साखर, तांदूळ आदी शेतीमालाची खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचा फायदा सोयाबीनला झाला. गेल्या तीन महिन्यांत इराणकडून सोयाबीनची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच दुष्काळ आणि अमेरिकी लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे देशातील मका उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि पशुखाद्य उद्योगाकडून सोयाबीनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनची आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरक थेट शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यांत जमा करण्याची तरतूद असलेली भावांतर भुगतान योजना राबवली होती. त्यामुळे तिथे आवक प्रचंड वाढून भाव कोसळले. त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. या योजनेचे या आठवड्यात सूप वाजणार असून, त्यामुळे बाजारातील फुगवटा कमी होणार आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राज्यात सोयाबीनच्या दरात उसळी आली आहे. ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुकूल घडामोडी आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी यामुळे सोयाबीनचे दर ३७०० रुपयांपर्यंत गेले आहेत. हंगाम संपेपर्यंत या दरात आणखी १०० ते २०० रुपयांची वाढ होऊ शकते, परंतु तोपर्यंत माल साठणवुकीचा खर्च आणि व्याज यांचे गणित केले तर आताच माल विकणे फायदेशीर ठरेल,'''' असे शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले. यंदा मराठवाडा-विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने ताण दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असली तरी अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाच्या गरजेइतका पाऊस झाल्यामुळे उत्पादनात घट अपेक्षित नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सोयाबीन उत्पादनात १३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा राज्यात ४३.८८ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीनची उत्पादकता १० टक्के वाढल्याचे दिसून येते. यंदा पीक चांगले असले तरी सोयापेंडची मागणी व निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असल्याने दरात पडझड होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारने ‘नाफेड''च्या माध्यमातून सुरू केलेल्या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com