रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळ

लोहयुक्त तांदूळ
लोहयुक्त तांदूळ

नाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह मिळत असल्यामुळे महिला व बालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तक्षय (अॅनेमिया) आजार दिसत आहे. या आजारावर उपाय शोधण्यासाठी खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) तज्ज्ञांनी लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात देवळे (जि. नाशिक) येथील  युवा संशोधक चंद्रकांत दालभगत यांचा समावेश आहे.  खरगपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून चंद्रकांत दालभगत कार्यरत आहेत. या विभागातील तज्ज्ञांनी लोहयुक्त तांदूळ निर्मितीबाबत संशोधन प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पातील संशोधनाबाबत माहिती देताना चंद्रकांत दालभगत म्हणाले, की महिला आणि लहान मुलांच्यामधील रक्तक्षय व हिमोग्लोबिन कमतरतेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोहयुक्त तांदूळ हा एक पर्याय असल्याने केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या शिफारशीनुसार हे संशोधन करण्यात आले. यासाठी चांगल्या दर्जाचा तांदूळ दळून त्यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी-१२ यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करण्यात आले. त्यानंतर एक्सट्रूडर यंत्रामध्ये या मिश्रणावर प्रक्रिया करून पुन्हा तांदळासारखे दाणे बनविण्यात आले. आमच्या प्रयोगशाळेत सरासरी शंभर किलो प्रतिदिन उत्पादनक्षमतेचा लोहयुक्त तांदूळ निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून लोहयुक्त तांदूळ निर्मिती प्रकल्पासाठी देशी बनावटीची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.  लोहयुक्त तांदूळ निर्मितीसाठी प्रत्येकी १०० ग्रॅम तांदळामध्ये लोह ४२५ मिलिग्रॅम, फॉलिक ॲसिड १२५० मायक्रोग्रॅम आणि जीवनसत्त्व बी१२  हे १२.५ मायक्रो ग्रॅम असे प्रमाण ठेवले आहे. एक किलो तांदूळ बनविण्यासाठी प्रति किलो ५० रुपये खर्च येतो.  साधारणपणे ९९ किलो साध्या तांदळामध्ये एक किलो लोहयुक्त तांदूळ एकत्र करून मानवी आहारात याचा वापर करण्याची शिफारस संस्थेतील तज्ज्ञांनी केली आहे. कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ संशोधक डॉ. एच. एन. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत दालभगत आणि जयश्री मजुमदार यांनी लोहयुक्त तांदळाबाबत संशोधन पूर्ण केले आहे. यासाठी आवश्यक असणारे विविध प्रयोग संस्थेच्या अन्न रसायन आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात सध्या देशात ५० टक्के महिला आणि बालकांच्या आहारात लोह कमतरतेमुळे रक्तक्षय आजार तसेच हिमोग्लोबिन कमी प्रमाणात दिसून आले आहे. त्यामुळे हे संशोधन मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे. संशोधनाबद्दल झाला गौरव  नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते चंद्रकांत दालभगत यांना लोहयुक्त तांदळाच्या संशोधनासाठी ‘गांधीवादी युवा प्रोद्योगिकी आविष्कार २०१९’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाषणात या संशोधनाबाबत गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला डॉ. रघुनाथ माशेलकर, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप, प्रा. अनिल गुप्ता, वडील गेणू दालभगत, मार्गदर्शक डॉ. एच. एन. मिश्रा, माजी सभापती रघुनाथ तोकडे, पोलिस पाटील वाळू ठवळे उपस्थित होते. लोहयुक्त तांदळाची वैशिष्ट्ये 

  • नैसर्गिक तांदळासारखा दिसतो.
  • चांगली टिकवण आणि शिजवण क्षमता.
  • शरीरासाठी आवश्यक घटकांचा समावेश.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com