मोताळा खरेदी केंद्रावर मका नोंदणीत अनियमितता : तक्रार

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील मका खरेदी केंद्रावर ऑफलाइन नोंदणीत अनियमितता झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले.
मका नोंदणीत अनियमितता Irregularities in maize registration
मका नोंदणीत अनियमितता Irregularities in maize registration

बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा येथील मका खरेदी केंद्रावर ऑफलाइन नोंदणीत अनियमितता झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी तहसिलदारांना निवेदन दिले. ही नोंदणी रद्द करून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती प्रकाश बस्सी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी  केली. 

मोताळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली होती. तालुक्यातील शेकडो शेतकरी मका नोंदणीसाठी रांगेत ठाण मांडून होते. एका शेतकऱ्याकडून रक्ताच्या नात्यातील पाच सातबाराची नोंदणी घेण्याचे ठरले होते. शनिवारी सकाळी नोंदणी सुरू झाली.

यावेळी जवळपास १६ शेतकऱ्यांचा नंबर लागल्यावर नोंदणीतील सातबाराचा आकडा दोनशेच्या घरात पोचला. ही तफावत पाहता शेतकऱ्यांचा संताप वाढला. तहसिलदारांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त शेतकरी नोंदणीत अनियमितता झाल्याच्या आरोपावर ठाम राहिले.  

दरम्यान, तहसीलदारांनी ऑनलाइन नोंदणी बंद करून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी घेण्याचे संबंधितांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी जमा केलेले सातबारा व टोकण पावत्या रद्द केल्यानंतर नव्याने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी. संबंधित शेतकऱ्यांचा मका पेरलेला आहे की नाही याची तलाठ्यामार्फत खात्री केल्यावर ऑनलाइन नोंदणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर पंचायत समिती सभापती प्रकाश बस्सी, अरविंद चोपडे, राजेंद्रकुमार बस्सी, संध्या बस्सी, बनाबाई बस्सी, गीता बस्सी, वैभव रोठे, हेमचंद्र चोपडे, मनोज चोपडे, सुनील पाटील, डिगंबर चौधरी, गोविंदा दिवाने, गजानन फिरके यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com